Advertisement Advertisement

Science of Dreams : स्वप्नांचे विज्ञान : झोपेत घडणाऱ्या अदृश्य प्रक्रिया

Science of Dreams : रात्र होते, शरीर विश्रांती घेते, डोळे मिटतात आणि बाह्य जगाशी आपला संपर्क हळूहळू कमी होतो. पण, या शांततेच्या आड मेंदू मात्र पूर्णपणे निष्क्रिय झालेला नसतो. उलट झोपेच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मेंदूमध्ये विद्युत क्रिया, रासायनिक संदेशांची देवाणघेवाण, स्मृतीशी संबंधित प्रक्रिया आणि चेतनेतील बदल सतत सुरू असतात. याच अदृश्य प्रक्रियांमध्ये कधीकधी एक विलक्षण अनुभव जन्म घेतो-स्वप्न.

आपण एखाद्या स्वप्नात धावत असतो, उडत असतो, परिचित व्यक्तींशी बोलत असतो किंवा अशक्य वाटणाऱ्या घटना प्रत्यक्ष घडत असल्यासारख्या अनुभवत असतो. जागे झाल्यावर काही क्षण ते स्वप्न अगदी खरे वाटते आणि पुढच्याच क्षणी त्यातील बहुतांश तपशील विस्मृतीत जातात. स्वप्नांचे हे गूढ विज्ञान आजही मेंदूविज्ञानातील आकर्षक आणि अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवणारे क्षेत्र आहे.

झोप ही एकसंध अवस्था नसून तिच्या विविध जैविक अवस्था असतात. त्यामध्ये ‘डोळ्यांच्या संथ हालचालींची झोप’ किंवा ‘शांत झोप’ आणि ‘डोळ्यांच्या जलद हालचालींची झोप’ किंवा सोप्या भाषेत ‘स्वप्नांची झोप’ यांचा समावेश होतो. एनआरईएम झोपेतही मेंदूच्या विद्युत क्रियेत विशिष्ट बदल घडतात आणि झोप अधिक सखोल होत जाते. आरईएम अवस्थेत मात्र डोळ्यांची जलद हालचाल, मेंदूतील विशिष्ट प्रकारची सक्रियता आणि स्नायूंच्या हालचालींवरील तीव्र नियंत्रण अशी वैशिष्ट्ये दिसतात. पूर्वी स्वप्ने प्रामुख्याने आरईएम झोपेशी जोडली जात होती; मात्र संशोधनातून आता स्पष्ट झाले आहे की एनआरईएम झोपेतही स्वप्नानुभव होऊ शकतो. दोन्ही अवस्थांतील स्वप्नांच्या स्वरूपात मात्र फरक आढळतो.

आरईएम अवस्थेतील स्वप्ने तुलनेने अधिक जिवंत, दृश्यप्रधान, भावनिक आणि कथानकासारखी असण्याची शक्यता असते.
स्वप्न पडत असताना मेंदूच्या विविध भागांची सक्रियता जागेपणापेक्षा वेगळी असते. विशेषत: दृश्य प्रक्रिया, भावनिक प्रक्रिया आणि स्मृतीशी संबंधित काही मेंदू-जाळ्यांमध्ये बदल दिसतात, त्यामुळे डोळे बंद असूनही आपल्याला स्वप्नात रंग, चेहरे, जागा, हालचाली आणि घटना दिसू शकतात. बाहेरून प्रत्यक्ष दृश्य माहिती येत नसतानाही मेंदू अंतर्गत संकेतांच्या आधारे एक संपूर्ण अनुभव तयार करू शकतो. स्वप्नात आपण एखाद्या ठिकाणी असल्याची जाणीव होणे म्हणजे बाहेरील जगातील दृश्य आपल्या डोळ्यांतून आलेले नसते; ती मेंदूने अंतर्गतरीत्या निर्माण केलेली अनुभूती असते.

स्वप्नातील आणखी एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे त्यातील तर्कशुद्धतेचा अभाव. आपण हवेत उडत असतो, मृत व्यक्तीशी बोलत असतो किंवा काही क्षणांत एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचतो, तरी स्वप्नात हे विचित्र वाटत नाही. जागे झाल्यावर मात्र त्या घटनांची विसंगती जाणवते. यामागे झोपेच्या वेळी मेंदूतील विविध भागांच्या सक्रियतेतील बदल कारणीभूत असू शकतात. विशेषत: उच्चस्तरीय तर्क, नियोजन आणि आत्मनियंत्रणाशी संबंधित काही प्रीफ्रंटल भागांची सक्रियता जागेपणाच्या तुलनेत बदललेली दिसू शकते, तर भावनिक आणि संवेदनात्मक प्रक्रियांशी संबंधित भाग अधिक सक्रिय असू शकतात, त्यामुळे स्वप्नात भावना अत्यंत तीव्र असू शकतात पण त्यांच्यावर तर्कशुद्ध नियंत्रण तुलनेने कमी असते.

स्वप्नांचा स्मृतीशी असलेला संबंध हा संशोधनाचा महत्त्वाचा विषय आहे. दिवसभरात आपण शिकलेल्या गोष्टी, अनुभवलेल्या घटना आणि निर्माण झालेल्या आठवणी झोपेच्या काळात मेंदूमध्ये विविध प्रकारे प्रक्रिया केल्या जातात. झोप स्मृतीच्या दृढीकरणासाठी महत्त्वाची असल्याचे मोठ्या प्रमाणावर संशोधनातून दिसून आले आहे. मात्र, ‘स्वप्न पडते म्हणून स्मृती मजबूत होते’ असे सरळ कारण-परिणामाचे समीकरण अजून सिद्ध झालेले नाही. काही संशोधकांच्या मते स्वप्ने स्मृती आणि भावनिक अनुभवांच्या प्रक्रियेशी संबंधित असू शकतात; परंतु स्वप्नांचे नेमके जैविक कार्य अजून निश्चित झालेले नाही.

भावनांशी स्वप्नांचा संबंधही विशेष लक्षवेधी आहे. दिवसभरातील चिंता, भीती, ताण किंवा भावनिक अनुभव कधी कधी स्वप्नांच्या आशयात प्रतिबिंबित होऊ शकतात, मात्र प्रत्येक स्वप्नाला एखादा निश्चित प्रतीकात्मक अर्थ असतो असे विज्ञान मानत नाही. उदाहरणार्थ, स्वप्नात पाणी दिसले म्हणजे ठरावीक मानसिक अवस्था किंवा भविष्यातील घटना घडणारच असा वैज्ञानिक निष्कर्ष काढता येत नाही. स्वप्नांचा आशय व्यक्तीच्या अनुभवांशी संबंधित असू शकतो; पण त्याचा अर्थ लावण्यासाठी ठोस सार्वत्रिक संकेतशास्त्र उपलब्ध नाही. आधुनिक स्वप्नसंशोधन त्यामुळे स्वप्नांच्या ‘गूढ अर्था’पेक्षा त्यांच्या मज्जासंस्थात्मक यंत्रणेकडे अधिक लक्ष देते. मग आपण रोज स्वप्ने पाहतो का? उपलब्ध संशोधनानुसार स्वप्नानुभव झोपेच्या विविध अवस्थांमध्ये होऊ शकतो. मात्र, स्वप्न पडणे आणि स्वप्न आठवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेकदा जागे झाल्यानंतर काही क्षणांत स्वप्नाची आठवण वेगाने कमी होते, म्हणून ‘मला स्वप्न पडले नाही’ असे वाटणे म्हणजे प्रत्यक्षात स्वप्न आलेच नाही असे आवश्यक नाही. जाग येण्याची वेळ, झोपेची अवस्था आणि त्या क्षणी मेंदूची स्थिती यांचा स्वप्न आठवण्यावर परिणाम होऊ शकतो.

काही व्यक्तींना स्वप्न पाहत असल्याची जाणीव स्वप्नाच्या दरम्यानच होते. या अवस्थेला जाणीवयुक्त स्वप्नावस्था असे म्हणता येते. अशा वेळी व्यक्ती झोपेत असूनही ‘मी स्वप्न पाहत आहे’ याची जाणीव ठेवू शकते. या अवस्थेचा अभ्यास केल्यामुळे झोप, चेतना आणि आत्मजाणीव यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी संशोधकांना एक वेगळे साधन मिळते. मात्र, जाणीवयुक्त स्वप्नावस्थेचे स्वरूप आणि तिच्यामागील मेंदूतील यंत्रणा यांच्यावर अजूनही संशोधन सुरू आहे.

स्वप्नांचे विज्ञान आपल्याला आणखी एका मूलभूत प्रश्नापर्यंत घेऊन जाते – चेतना नेमकी काय आहे? जागेपणी आपण बाहेरील जग पाहतो, ऐकतो आणि त्यावर प्रतिक्रिया देतो. स्वप्नात मात्र बाह्य संवेदनात्मक माहिती अत्यंत मर्यादित असतानाही मेंदू एक संपूर्ण अनुभव निर्माण करू शकतो. म्हणजेच दृश्य, आवाज, हालचाल, भावना आणि स्वत:ची उपस्थिती यांचा अनुभव निर्माण करण्यासाठी बाह्य जगाची प्रत्यक्ष उपस्थिती नेहमीच आवश्यक नसते. स्वप्ने त्यामुळे मानवी चेतनेच्या स्वरूपाचा अभ्यास करण्यासाठी एक नैसर्गिक प्रयोगशाळाच ठरतात. तरीही स्वप्नांचे अंतिम गूढ विज्ञानाने उलगडलेले नाही. स्वप्ने का निर्माण होतात, त्यांचे नेमके जैविक कार्य काय आहे, प्रत्येक स्वप्नाचा अनुभव इतका वैयक्तिक का असतो आणि काही स्वप्ने इतकी जिवंत का वाटतात, यावर अजूनही विविध वैज्ञानिक मते आहेत. काही सिद्धांत त्यांचा संबंध स्मृतीशी जोडतात, काही भावनिक प्रक्रियांशी, तर काही मेंदूतील अंतर्गत सक्रियतेशी. त्यामुळे सध्या सर्वांत वैज्ञानिक निष्कर्ष एवढाच – स्वप्ने ही झोपेत घडणारी वास्तविक मानसिक अनुभूती आहे; परंतु तिचे अंतिम कार्य अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही.

रात्री आपण झोपतो तेव्हा शरीर बाह्य जगापासून काही काळ दूर जाते, पण मेंदूचे जग थांबत नाही. विद्युत संकेतांची देवाणघेवाण, न्यूरॉन्सची सक्रियता, स्मृतीची प्रक्रिया, भावनिक अनुभव आणि चेतनेतील बदल यांच्या गुंतागुंतीतून कधी एखादी कथा जन्म घेते, कधी एखादा चेहरा, कधी एखादी भीती आणि कधी अशक्य वाटणारे संपूर्ण विश्व. सकाळी डोळे उघडल्यावर ते विश्व काही क्षणांत विरून जाते.
स्वप्न म्हणजे झोपलेला मेंदू निष्क्रिय असल्याचा पुरावा नाही; उलट तो स्वत:च्या अंतर्गत जगात किती सक्रियपणे काम करत असतो याची ती एक अद्भुत झलक आहे. विज्ञान त्या झोपलेल्या मेंदूच्या अदृश्य विश्वाचा शोध घेत आहे आणि प्रत्येक नव्या संशोधनासोबत स्वप्नांचे गूढ उलगडण्याऐवजी कदाचित चेतनेचे गूढच अधिक गहिरे होत आहे.

सुजाता बाबर

sumiba_r@yahoo.com