Naraz Foofa : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच उल्लेख केलेल्या ‘नाराज फूफा’ या शब्दावरून राजकारणात माजलेल्या गदारोळामुळे हा शब्द आता अनेक क्षेत्रांतील नाराजांच्या शोधाचे निमित्त होऊन राहणार यात शंका नाही. पंतप्रधानांचा रोख कोणा व्यक्ती किंवा राजकीय पक्षाकडे असो, पण अशा नाराजांच्या फौजा राजकारणापलीकडच्या अनेक क्षेत्रांतही सतत आपल्या मानसिकतेचे प्रदर्शन घडवत असतात. काही सकारात्मक घडू लागते, तेव्हा नाराजांच्या नकारघंटा घणघणू लागतात आणि त्यांच्या निराशावादी मानसिकतेचे सावट सामाजिक सकारात्मकतेवर सहाजिकच दाटून राहते. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ अशी म्हण त्यामुळेच पडलेली असावी. सातत्याने निंदा करत राहणे, नकारात्मकतेचा सूर आळवत राहणे हे निराशावादाचे दुसरे रूप असते.
एक बाजूला प्रोत्साहनाचे प्रवाह भरभरून वाहत असताना दुसरीकडे निराशावादाचे सूर त्यांना बांध घालण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात, हा केवळ राजकारणातील नव्हे तर समाजजीवनाचा सार्वत्रिक अनुभव असतो, म्हणूनच पंतप्रधानांच्या उल्लेखाचा रोख कोठेही असला तरी या मानसिकतेवर बोट ठेवण्याची आणि त्याचा शोध घेण्याची गरज मात्र या निमित्ताने स्पष्ट झाली आहे. कारण नाराज फूफा हा केवळ शब्द नाही, ते एका मानसिकतेचे व्यापक वर्णन आहे. जेव्हा असे काही शब्द राजकारणात येतात, तेव्हा तर ते केवळ शब्द राहत नाहीत; ते एका मानसिकतेचे प्रतीक बनतात. एखाद्या नवीन कामाची सुरुवात झाली, नव्या दिशा उजळताना दिसू लागल्या की समाजामध्ये जेव्हा उत्साहाचे वारे वाहू लागतात, तेव्हा त्यास प्रोत्साहन देण्याऐवजी, ‘याची खरोखरीच गरज आहे का, त्यातून नेमके काय साधणार आहे, काही साधणार असेल तर ते अगोदरच का केले नाही’, असे अनेक नकारात्मक सूर आसपास घुमू लागतात. पंतप्रधान मोदी यांनी वर्णन केलेल्या त्या शब्दाचा एकूणच रोख या मानसिकतेतच असला तरी राजकारणापलीकडच्या नाराज फूफा जमातीची दखल घेणे अगत्याचे ठरते.
या शब्दाचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी वास्तवातील काही उदाहरणे देत त्यांना अभिप्रेत असलेल्या क्षेत्रातील नाराज फूफांची प्रतिमा हुबेहूब उभी केली. प्रत्येक कृतीवर, वक्तव्यावर, प्रकल्पावर आणि परिणामांवरदेखील संशयाची प्रश्नचिन्हे उपस्थित करणाऱ्या नाराज फूफांच्या या मानसिकतेमुळे समाजात नकारात्मकता पसरत असेल, तर नकारघंटा वाजविणाऱ्या मानसिकतेची दखल निश्चितच घ्यावयास हवी. अशा नकारघंटा वाजविणाऱ्यांची वर्णने करताना पंतप्रधानांच्या नजरेसमोर काही व्यक्तिरेखा होत्या आणि समाजासमोरही त्यांची प्रतिमा उभी रहावी असा त्यांचा उद्देश होता यातही शंका नाही. परंतु, पंतप्रधानांनी कोणास नाराज फूफा म्हटले हा मुद्दा महत्त्वाचा नाही. समाजात असे नाराज फूफा निर्माण कसे होतात आणि त्यांचे प्रतिबिंब सामाजिक मानसिकतेत कसे उमटलेले राहते हा कळीचा मुद्दा आहे. प्रश्न विचारणे, उत्तराच्या हक्काचा आग्रह धरणे हा लोकशाहीचा प्राण आहे.
सरकार एखादा मोठा प्रकल्प उभारत असेल तर त्याचा खर्च काय, पर्यावरणावर परिणाम काय, त्याचा फायदा कोणाला, तो वेळेत पूर्ण होईल का, त्यात भ्रष्टाचार तर होणार नाही ना, असे काही प्रश्न विचारले गेलेच पाहिजेत. त्यामुळे असे सवाल उपस्थित करणारा प्रत्येक टीकाकार हा ‘नाराज फूफा’ नसतो. पण, ‘नाराज फूफा’ तेव्हा जन्माला येतो, जेव्हा टीका हा त्याचा एकमेव उद्देश बनतो. सत्य शोधणे हा त्यामागचा उद्देश असत नाही. काही सकारात्मक, चांगले दिसू लागले तरीही त्यावर बोटे ठेवून टीका करणे, काही वाईट झाले तर त्याचा गाजावाजा करणे आणि एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा चांगली झाली तर त्याच्या श्रेयाचे धनी असलेल्यांकडून ते हिरावून घेण्यासाठी धडपडणे ही अशा निराशावाद्यांची मानसिकता असते. सकारात्मक मानसिकतेची माणसे कोणतेही काम अधिक चांगले कसे करता येईल याचा विचार करतात, तेव्हा नकारात्मक मानसिकतेची माणसे त्यावर प्रश्नचिन्हे उमटवितात. अशा मानसिकतेची माणसे जेव्हा समाजात वावरतात, तेव्हा ती कोणा एका राजकीय पक्षात किंवा कोणा विशिष्ट राजकीय विचारसरणीची असतात असे नाही. ते सत्तेतही असतात आणि विरोधातही असतात. तो राजकारणात असतो, उद्योगात असतो, साहित्यामध्ये असतो, कला क्षेत्रात असतो आणि घराघरांतही असतो.
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत, सामाजिक व्यवहारांत, अर्थकारणात आणि अन्य अनेक क्षेत्रांत अशा मानसिकतेची अनेक उदाहरणे दिसू शकतात. कारण ही मानसिकता म्हणजे कोणा व्यक्तीवरील शिक्का नसतो, तर तो विशिष्ट वर्तनाचा नमुना असतो. तो प्रश्न विचारतो, पण त्याला जाणीवपूर्वक नकारात्मकतेचा सूर जोडतो. नवीन महामार्ग झाला की याचा फायदा कोणाला असा प्रश्न विचारतो. मेट्रोसारखी वाहतुकीची साधने आली की त्याला बसगाडी बरी वाटू लागते, नवे उद्योग सुरू झाले की पर्यावरणाची चिंता सतावू लागते. अशा प्रकारे प्रत्येक परिस्थितीतील दोष शोधण्याची मानसिक गरज निर्माण झाली की नाराज फूफा जन्माला येतो. पंतप्रधानांच्या उल्लेखानंतर नाराज फूफाची चर्चा सुरू झाली असली, तरी ती मानसिकता नवी नाही. अशा मानसिकतेमध्ये नव्याने अनुभवास येणाऱ्या बदलाबाबतची भीती असते, पण ती व्यक्ती आपल्या भीतीला ‘अनुभव’ असे नाव देते. हा ‘नाराज फूफा’ इतरांच्या कामगिरीवर टीका करतोच, पण त्यासोबतच तो स्वत:ला नेहमीच सिद्ध करण्याच्या मानसिकतेत जगत असतो. आजकाल समाजमाध्यमांचा प्रसार प्रचंड वेगाने होत असल्याने, नाराज फूफांचे फोफावणे वेगाने फैलावत चालले आहे. लोकशाहीच्या मोठ्या कुटुंबात नाराज फूफांची कमतरता नाही, म्हणूनच त्यांना ओळखण्याची व नाराजीपलीकडे जाऊन वस्तुनिष्ठपणे वास्तवाकडे पाहणाऱ्यांची खरी गरज आहे.
