Advertisement Advertisement

Indian Sculpture and Temple Architecture : भारतीय शिल्पकला

Indian Sculpture and Temple Architecture : विष्णूधर्मोत्तरपुराण हे गुप्त काळातील लोकजीवनाचे वर्णन करणारे पुस्तक आहे. त्यामध्ये सुरुवातीला एक कहाणी आहे, राजा वज्र आपले गुरू मार्कंडेय यांना शिल्पकलेचे ज्ञान मागतो. तेव्हा त्याचे गुरू त्याला म्हणतात की, तुला शिल्पकला शिकायची असेल तर आधी तुला चित्रकला, नृत्य, गायन, वादन आणि साहित्य या सर्वांचा अभ्यास करावा लागेल, त्यातील सौंदर्यशास्त्र समजून घ्यावे लागेल. मंदिर हे वरील सर्व कलांचे आश्रयस्थान होते. कलांचा विकास होत गेला त्याच पद्धतीने मंदिराच्यादेखील वेगवेगळ्या शैली तयार होत गेल्या. विष्णूधर्मोत्तरपुराणात मंदिर कसे असावे, कुठे असावे, कोणत्या प्रकारची लाकडे आणि दगड यांचा वापर केला पाहिजे, मंदिर निर्मिती प्रक्रिया कशी असावी, आसपास काय सुविधा असल्या पाहिजेत या सर्व घटकांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं आहे. मात्र या पुस्तकात पाणी, माती यांच्या गुणवत्तेसारख्या शास्त्रीय बाबींसोबतच शकुन अपशकुन यांसारख्या अंधश्रद्धादेखील समाविष्ट आहेत.

दुसऱ्या शतकात मध्य आशियात मोठा दुष्काळ पडला होता, त्यामुळे तेथील शक, शुंग, कुण, कुशाण यांसारखे वेगवेगळे समुदाय आपला जीव जगवत भारताच्या सुजलाम् भूमीत आले. युद्ध आणि तहांची मोठी मालिका त्या काळात झाली आणि शेवटी भारतीय भूमीत हे सर्व घटक स्थिरावले. उत्तर भारतात त्यांची नवीन नगरे उदयाला आली. स्वत:ला देवपुत्र आणि महाराजाधिराज बनवणाऱ्या कुशाण राजा कनिष्क याचे साम्राज्य अफगाणिस्तानपासून काशीपर्यंत पसरले आणि त्याचा व्यापार जगभर पसरला. मथुरा ही त्याच्या राज्याची राजधानी होती. या काळात मथुराशैलीची शिल्पकला विकसित झाली. तोवर केवळ हस्तीदंत आणि लाकडांवर कोरण्यात येणारे शिल्प आता रेड सॅंडस्टोनवर कोरण्यात येऊ लागले. शिल्पांची रेखीवता आणि सुबकता अधिक चांगल्या दर्जाची होऊ लागली.

भारतामध्ये जेव्हा मंदिर हे राजाच्या सामर्थ्याचं प्रतीक मानलं जाऊ लागले, त्यावेळेस मंदिरावर अधिक खर्च करणे सुरू झाले. जेवढे मंदिर भव्य असेल तेवढा राजा सामर्थ्यशाली; असं असलं तरी जुन्या मंदिरांबाबत आता नव्याने काही करता येणे शक्य नव्हतं. या जुन्या मंदिरांची उंची जरी वाढवू शकत नसलो तरी त्याचा विस्तार वाढवणे शक्य आहे, ही कल्पना मनात येऊन सहाव्या शतकानंतर भव्य गोपुरांची अर्थात प्रवेशद्वारांची निर्मिती सुरू झाली. मंदिराच्या कडेने भरपूर अंतर सोडून भिंत टाकली जायची आणि एक मुख्य प्रवेशद्वार केले जायचे. जेवढी मोठी भिंत, तेवढी कलाकुसर करण्यास अधिक संधी होती. कोणत्याही काळातील सर्वोत्तम वास्तुशास्त्र आपल्याला त्या काळातील मंदिरामध्ये पाहायला मिळते. बाराव्या शतकात तयार झालेली जगन्नाथ पुरी, रामेश्वरम्, खजुराहो तसेच चौदाव्या शतकात तयार झालेली कोणार्क सूर्यमंदिर, हम्पीचे विठ्ठल मंदिर ही सर्वोत्कृष्ट वास्तूकलेची उदाहरणे म्हणून जगप्रसिद्ध आहेतच, मात्र त्याआधीच्या काळातदेखील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली अनेक मंदिरे निर्माण झाली आहेत.

भारतात मंदिरांच्या वास्तूशिल्पकलेमध्ये आपल्याला द्रविडी आणि नागर शैली तसेच या दोन्हींचे मिश्रण असलेली वेसारा शैली असे मुख्य प्रकार दिसून येतात. द्रविडी शैली ही दक्षिण भारतात, नागर शैली ही उत्तर भारतात तर वेसारा शैली मध्य भारतात प्रामुख्याने आढळते. याशिवाय भूमिज, कलिंग यांसारख्या इतर उपप्रकारांचा वापरदेखील मंदिर निर्माण करताना झाला आहे. नागर शैलीतील मंदिरात आपण अर्धमंडप, मंडप, गर्भगृह, शिखर आणि कळस असे भाग पाहू शकतो. इथे दारामध्ये गंगा-यमुना नद्यांना स्थान मिळालेले असते. द्रविडी शैलीप्रमाणे इथे उंच गोपुरांचे म्हणजेच प्रवेशद्वारांचे संरक्षण नसते. सर्व देवता मंदिराच्या आत असतात, मंदिरे बांधताना उंच चौथरा आणि पायऱ्यांचा वापर केलेला असतो. गर्भगृहाभोवती फेरी मारता येईल असा प्रदक्षिणा मार्ग असतो. गर्भगृहावर निमुळते होत जाणारे गोलाकार शिखर तयार केलेले असते, ज्यावर कळस स्थापित केला जातो. जगन्नाथ पुरी, सोमनाथ मंदिर, खजुराहो ही सर्व नागर शैलीतील मंदिरे आहेत.

नागर शैलीमध्ये बांधलेले, बिहारमधील मुंडेश्वरी मंदिर हे आज अस्तित्वात असलेले सर्वात प्राचीन हिंदू मंदिर असल्याचं मानलं जातं. इसवीसनानंतर दुसऱ्या शतकाच्या सुरुवातीला या मंदिराची निर्मिती झाली असावी. अष्टभुजाकृती मंदिराच्या चार बाजूंना दरवाजे आहेत तसेच अनेक देवतांच्या मूर्ती या मंदिरात कोरल्या आहेत. या मंदिराचे तसेच बोधगया येथील महाबोधी मंदिराचे वर्णन ह्युएन त्सांग याने केले आहे. मात्र, महाबोधी मंदिराचे वर्णन करताना त्याला मंदिराभोवती असलेल्या सुंदर परिसराची भुरळ अधिक पडली असावी. सम्राट अशोकाने जगभरात जे ८४००० स्तूप निर्माण केले, त्यापैकी हे एक! महाबोधी मंदिरदेखील नागर शैलीमध्ये निर्माण करण्यात आले आहे. अकराव्या शतकात निर्माण झालेले लिंगराजा मंदिर हे ओरिसामधील सर्वात पुरातन शिवमंदिर देखील नागर शैलीत निर्माण करण्यात आले आहे.

सातव्या शतकात पल्लव राजांनी द्रविडी शैलीमध्ये मंदिरे निर्माण करण्यास सुरुवात केली. या शैलीत मंदिरे बांधताना चौथरा वापरलेला नसतो, मंदिरे जमिनीच्या पातळीवरच बांधलेली असतात, मंदिराभोवती गोपूर म्हणजे प्रवेशद्वार आणि संरक्षक भिंत असते. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापाशी दोन्ही बाजूला दोन द्वारपाल मंदिराचे रक्षण करण्यासाठी कोरलेले, चितारलेले असतात. इथे गर्भगृहाच्यावर विमान अर्थात पिरॅमिडसारखी, भौमितिक पद्धतीने निमुळती रचना केलेली असते. त्याच्यावर जो कळस लावलेला असतो त्याला शिखर म्हणतात. द्रविडी शैलीच्या मंदिरामध्ये बहुतांश वेळा पाणी साठवून ठेवलेले असते. मुख्य मंदिराच्या अवतीभवती इतर देवतांची लहान लहान मंदिरेदेखील असतात. हिंदू धर्मियांचे जगातील सर्वात मोठे मंदिर कंबोडियामध्ये आहे, या अंगकोर वाट मंदिराचे स्थापत्यदेखील द्रविडी शैलीचे आहे. याच शैलीमध्ये बांधलेले वेरूळचे कैलास मंदिर हे आधी कळस मग पाया, या पद्धतीने एकाच अखंड पाषाणात कोरलेले आहे. हे मंदिर आज एक आश्चर्य म्हणून जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहे.

धातुशास्त्रातील जुगाड असो अथवा शिल्पकलेत असलेली कल्पकता, भारतीयांनी मारलेली मजल जगाला आश्चर्यकारक वाटत होती. मात्र, जातीव्यवस्थेमध्ये या कला ठराविक जातींमध्ये मर्यादित झाल्या आणि या कलांमधील रहस्ये आपल्या जातीबाहेर जाऊ नये यासाठीदेखील प्रयत्न केले गेले. परिणामी यातील अनेक कला काळाच्या ओघात लुप्त झाल्या. आजही काही कला आणि ती जोपासणारे कलाकार अस्तित्वात आहेत; मात्र औद्योगिकीकरणामुळे जगाच्या बदललेल्या रचनेमुळे आणि अर्थकारणामुळे या कला जोपासणे अवघड होत चालले आहे. प्राचीन भारताला गौरवशाली परंपरा आणि व्यापारी वर्चस्व प्रदान करण्यामध्ये या कलांचा महत्त्वाचा वाटा होता हे विसरून चालणार नाही.

डॉ. नितीन हांडे
संपर्क : ८९५६४४५३५७