Nai Naveli teaser : यामीच्या ‘नई नवेली’चा भन्नाट टीझर प्रदर्शित
मुंबई : Yami Gautam Nai Naveli : नववधू सासरी आली की घरात आनंदांचं वातावरण असते. पण जर ही नवरी चक्क डायन निघाली तर? यामी गौतमच्या आगामी ‘नई नवेली’ चित्रपटाचा टीझर सध्या चर्चेत आहे. हॉरर आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या चित्रपटात यामी नववधूच्या भूमिकेत दिसत आहे. तिचा हटके अंदाज आणि टीझरमधील मजेदार संवाद पाहून चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
‘भाभी डायन है’ म्हणत देवरने उघडलं गुपित
टीझरची सुरुवात एका मध्यमवर्गीय संयुक्त कुटुंबापासून होते. घरातील सगळे जण एकत्र बसलेले असताना देवर बंटू अचानक सगळ्यांना बूट-चप्पल आणि टोकदार वस्तू बाजूला ठेवायला सांगतो. घरच्यांना काहीच समजत नाही. ते बंटूला यामागचं कारण विचारतात. त्यावर तो आपल्या नव्या वहिनीबद्दल धक्कादायक खुलासा करतो ‘भाभी डायन है!’ बंटूचं हे ऐकून घरातील लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. उलट त्याला ओरडा मिळतो आणि चक्क एक चापटही बसते.
यामीची एंट्री अन ‘भूत-पिशाच्चांचा नाश्ता’
यानंतर लाल साडीतील नववधूच्या रूपात यामी गौतमची एंट्री होते. मात्र तिचा अंदाज पाहून ती साधी नवरी नसल्याचं लगेच जाणवतं.
डायन असल्याच्या आरोपावर यामी अगदी बिनधास्तपणे म्हणते की दोन डायन, तीन पिशाच्च आणि चार भूतं ती सकाळच्या नाश्त्यातच खाऊ शकते. यामीचा हा मजेदार संवाद टीझरमध्ये चांगलाच लक्ष वेधून घेतो. त्यामुळे हा चित्रपट फक्त घाबरवणार नाही, तर प्रेक्षकांना भरपूर हसवणारही असल्याचे संकेत मिळतात.
‘मोठा विचार करा’… यामीने वाढवलं रहस्य
टीझरच्या शेवटी यामी प्रेक्षकांना ‘मोठा विचार करा’ असा सल्ला देते. तिच्या या संवादामुळे चित्रपटात पुढे काय होणार, याची उत्सुकता आणखी वाढते. ही नवरी खरंच डायन आहे का? ती आपल्या सासरच्या कुटुंबासाठी संकट ठरणार की त्यांचं रक्षण करणार? या प्रश्नांची उत्तरे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळणार आहेत.
दसऱ्याला सिनेमागृहात येणार ‘नई नवेली’
‘नई नवेली’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. आनंद एल. राय हे या चित्रपटाचे निर्माते असून बालाजी मोहन यांनी दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट यंदाच्या दसऱ्याला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. एकीकडे नवरीचा लूक, दुसरीकडे डायनचा अवतार आणि त्यात हॉररसोबत कॉमेडीचा भन्नाट तडका… त्यामुळे यामी गौतमची ‘नई नवेली’ प्रेक्षकांना किती घाबरवते आणि किती हसवते, हे पाहणं नक्कीच मजेशीर ठरणार आहे.
