बार्शी तालुक्यातील चारे गाव परिसरात बिबट्याचा वावर
बार्शी : बार्शी तालुक्यातील चारे गाव परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याची घटना समोर आली आहे. मेजर पापा यांच्या मालकीच्या म्हशीच्या रेडकूवर बिबट्याने हल्ला केल्याने ते ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.
रेडकूच्या शरीरावरील जखमा, हल्ल्याची पद्धत आणि नखांच्या खुणांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. या प्राथमिक पाहणीच्या आधारे हल्ला बिबट्याने केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जात असताना काही नागरिकांना वन्यप्राणी दिसल्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित झाली होती. या चर्चेनंतर बार्शी वनविभागाचे वनपाल आरजू पिरजादे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रीच चारे गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. मंगळवारी, १ सप्टेंबर रोजीही वनविभागाच्या पथकाने घटनास्थळासह परिसराची पाहणी केली.
यापूर्वीही बार्शी तालुक्यातील पांगरी, चारे आणि येडशी परिसरात बिबट्या दिसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वनपाल अर्जुन पिरजादे यांनी शेतकरी आणि नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतात जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नये, रात्री घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि शेतात जाताना बॅटरी तसेच काठी सोबत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लहान मुले आणि पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे.
बिबट्या किंवा अन्य वन्यप्राणी आढळल्यास त्याचा पाठलाग करू नये तसेच त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन्यप्राण्यांबाबतची माहिती तातडीने वनविभाग किंवा पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
