हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात; एमआयडीसी वाळूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Ranjangaon Shenpunji Double Murder Waluj : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणपुंजी येथील एकतानगर परिसरात जुन्या वादातून बाप-लेकाची निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बाबासाहेब कीर्तिकर आणि त्यांचा मुलगा नेहाल कीर्तिकर अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या दुहेरी हत्याकांडानंतर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांत पाच संशयितांना ताब्यात घेतले. हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असताना रेल्वे स्टेशन परिसरातून त्यांना पकडण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे वाळूज पोलिसांच्या तत्परतेची चर्चा सुरू झाली आहे.
किरकोळ वादातून रक्तरंजित संघर्ष
रांजणगाव शेणपुंजीतील एकतानगर परिसरात दोन कुटुंबांमध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यातून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाला होता. सोमवारी मध्यरात्री एकमेकांकडे रागाने पाहण्याच्या कारणावरून पुन्हा वाद उफाळला. या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात बाबासाहेब कीर्तिकर आणि त्यांचा मुलगा नेहाल कीर्तिकर यांचा मृत्यू झाला. बाप-लेकाच्या मृत्यूमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात
दुहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी तपासासाठी आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने संशयितांचा शोध सुरू केला.
संशयित हरियाणाला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रेल्वे स्टेशन परिसरात शोधमोहीम राबवून पाचही संशयितांना ताब्यात घेण्यात आले. घटनेनंतर काही तासांतच ही कारवाई झाल्याने तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे.
हरियाणातील एकाच कुटुंबातील पाच संशयित
या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे राजेंद्र गयचंद (वय ६०), मनोज गयचंद (वय २०), नागेश गयचंद (वय १८), मानसी गयचंद (वय २२) आणि छन्नो गयचंद (वय ५५) अशी आहेत. हे सर्व मूळचे हरियाणा येथील रहिवासी असून सध्या रांजणगाव शेणपुंजीतील एकतानगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे.
या पाचही संशयितांची हत्याकांडातील नेमकी भूमिका काय, वादाचे मूळ कारण काय आणि हल्ल्याचा घटनाक्रम कसा घडला, याचा तपास पोलीस करीत आहेत.
सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची कामगिरी
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पथकात पोलीस उपनिरीक्षक संजय जगताप, हवालदार जालिंदर रंधे, योगेश शेळके, पोलीस अंमलदार सूरज अग्रवाल, समाधान पाटील, नितीन इनामे, प्रकाश वाघ, राजू वाघ, वैभव गायकवाड, सचिन ठोकळ आणि दीपक जाधव यांचा सहभाग होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने समन्वयाने तपास करीत संशयितांचा माग काढला आणि त्यांना रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले. दुहेरी हत्याकांडासारख्या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे संशयितांच्या पलायनाचा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले.
जुन्या वादातून दोन जीवांचा अंत झाल्याने एकतानगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी वाळूज पोलीस करीत आहेत.
Read About : Phulambri Farmers Suicide : फुलंब्री तालुक्यात 2 शेतकरी कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.