Ad Advertisement Ad Advertisement

Bsc Nursing Admission Zero Percentile Maharashtra 2026 – बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठीचे पात्रता निकष शिथिल

शून्य पर्सेंटाईलला प्रवेश मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर: Bsc Nursing Admission Zero Percentile Maharashtra 2026 – बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील प्रवेशासाठी भारतीय परिचर्या परिषद यांनी पात्रतेच्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण शिथिलता दिली आहे. ३० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, बी.एस्सी. नर्सिंग प्रवेशासाठी आवश्यक असलेली पात्रता टक्केवारी सर्व प्रवर्गांसाठी शून्य करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयानुसार सर्वसाधारण, सर्वसाधारण दिव्यांग तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी पात्रता निकष शून्य पर्सेंटाइल निश्चित करण्यात आले आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करून नव्याने पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी ऑनलाइन नोंदणी आणि संस्थास्तरीय प्रवेश फेरी-२ चे वेळापत्रक जाहीर केले आहे.

भारतीय परिचर्या परिषदेने बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या पात्रता निकषांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या प्रवेश वेळापत्रकानुसार आता सीईटीमध्ये शून्य पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकेल. यापूर्वी पात्रता निकष कितीपर्यंत कमी करण्यात येणार याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र आता शून्य पर्सेंटाईलला प्रवेश खुला झाल्याने आतापर्यंत वंचित राहिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. प्रवेश प्रक्रिया १५ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. राज्य सरकारने यंदा सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण देणाऱ्या आठ महाविद्यालयांचे पदवी परिचर्या महाविद्यालयांत रूपांतर केले.

त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न पाच परिचर्या महाविद्यालयांमधील विद्यार्थी क्षमतेत वाढ केली. यामुळे राज्यातील बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये सुमारे एक हजार जागांची भर पडली. ही वाढ अलीकडेच झाल्याने अनेक विद्यार्थी याबाबत अनभिज्ञ होते. परिणामी अनेक महाविद्यालयांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या होत्या. जागा रिक्त राहिल्याने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने भारतीय परिचर्या परिषदेला पत्र पाठवून पात्रता निकष शिथिल करण्याची व प्रवेश मुदत वाढवण्याची विनंती केली. परिषदेने औरंगाबाद खंडपीठातील उच्च न्यायालयाच्या रिट याचिकेचा संदर्भ देत ही मागणी मान्य केली. त्यानुसार पात्रता निकष शून्य करण्यात आले असून प्रवेश प्रक्रिया १५ नोव्हेंबरपर्यंत चालू राहील. यामुळे शून्य पर्सेंटाईल असलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.

ही मुदतवाढ केवळ महाराष्ट्रासाठीच लागू आहे. अन्य कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला याचा आधार घेता येणार नाही. परिषदेने स्पष्ट केले आहे की ही एकदाच देण्यात आलेली विशेष सवलत आहे. अंतिम मुदतीनंतर आणखी मुदतवाढ मागितली तरी ती स्वीकारली जाणार नाही. निश्चित तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशास परवानगी दिली जाणार नसल्याचेही परिषदेने सांगितले आहे. या निर्णयामुळे राज्यातील नर्सिंग शिक्षणातील रिक्त जागा भरण्यास मदत होईल आणि अधिक विद्यार्थ्यांना संधी मिळेल.


ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक

नव्याने पात्र ठरलेल्या आणि यापूर्वी नोंदणी न केलेल्या उमेदवारांना ७ नोव्हेंबर रोजी संस्थास्तरीय फेरीसाठी जागांचा तपशील आणि पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांना ८ ते १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करता येईल. १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता महाविद्यालयांकडून जनरल मेरिट लिस्ट, कोटानिहाय गुणवत्ता यादी, पहिली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली जाईल. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना ११ ते १२ नोव्हेंबरदरम्यान मूळ कागदपत्रे आणि आवश्यक शुल्क जमा करून प्रवेश निश्चित करावा लागेल.

१२ नोव्हेंबर रोजी दुसरी निवड यादी आणि कोटानिहाय प्रतीक्षा यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर १३ ते १४ नोव्हेंबरदरम्यान प्रवेश निश्चितीची प्रक्रिया पार पडेल. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाईल. रिक्त जागांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांना १५ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मूळ कागदपत्रे आणि आवश्यक शुल्कासह संबंधित महाविद्यालयात हजर राहावे लागेल. गुणवत्तेनुसार रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यापासून सुरू होईल. प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयाच्या फीडबॅक मॉड्यूलमध्ये १५ नोव्हेंबर रोजी नोंदवली जाणार आहे.


कोणत्या उमेदवारांना फेरीत सहभागी होता येणार नाही?

२७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ज्यांच्या हातात प्रवेशाची जागा निश्चित आहे, अशा उमेदवारांना संस्थास्तरीय फेरी-२ मध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच संस्थास्तरीय फेरी-१ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही या फेरीत संधी मिळणार नाही. पात्र उमेदवारांना जागांच्या उपलब्धतेनुसार कोणत्याही महाविद्यालयात अर्ज करता येईल. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. अर्ज केवळ संबंधित महाविद्यालयातच सादर करायचा असून, सीईटी सेल कार्यालयात प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाचे शुल्क तपासून घ्यावे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान मूळ कागदपत्रे आणि आवश्यक शुल्क जमा करण्याची जबाबदारी उमेदवारांची असेल.

Read About : GMCH Medical Students – वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी घाटीत संधींची नवी कवाडे उघडणार !
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.