फटाक्यांमुळे होऊ शकतो डोळे आणि त्वचेला गंभीर धोका
छत्रपती संभाजीनगर : Diwali Firecracker Safety – दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण. मात्र, दिवाळीच्या उत्साहात फटाके फोडताना आरोग्य आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. काही क्षणांचा निष्काळजीपणा आयुष्यभराची दुखापत देऊ शकतो. फटाक्यांमुळे भाजणे, डोळ्यांना गंभीर इजा होणे, हातापायांना दुखापत होणे तसेच आगीच्या घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
दिवाळीत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फटाक्यांचे आकर्षण असते. मात्र, लहान मुलांना कधीही एकट्याने फटाके फोडू देऊ नये. त्यांच्या सोबत जबाबदार मोठ्या व्यक्तीने उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलांना फटाके पेटवण्याची सुरक्षित पद्धत समजावून सांगावी. विशेषत: बॉम्ब, रॉकेट आणि इतर धोकादायक फटाके मुलांच्या हातात देणे टाळावे. फटाके खरेदी करताना अधिकृत आणि परवानाधारक उत्पादकांचेच फटाके घ्यावेत तसेच पाकिटावरील सूचनांचे पालन करावे.
फटाके फोडण्यासाठी मोकळ्या मैदानाची निवड करावी. अरुंद गल्ल्या, घरांच्या जवळ, वाहनांच्या आसपास, पेट्रोल पंप किंवा गॅस सिलिंडर असलेल्या ठिकाणी फटाके फोडणे टाळावे. एकावेळी एकच फटका पेटवावा आणि इतरांनी सुरक्षित अंतर राखावे. अनार किंवा रॉकेट हातात धरून उडवण्याचे धाडस करू नये. रॉकेट योग्य स्थिर आधारामध्ये ठेवूनच उडवावे. फटाके फोडताना पायात बंद बूट आणि डोळ्यांवर सुरक्षात्मक चष्मा वापरणे हितावह आहे.
कपड्यांची निवडही महत्त्वाची
फटाके फोडताना नायलॉन किंवा अतिशय सैल, ढगळ कपडे घालणे धोकादायक ठरू शकते. कृत्रिम कपड्यांना सहज आग लागू शकते आणि ते त्वचेला चिकटल्यामुळे भाजण्याची तीव्रता वाढू शकते. त्यामुळे अंगाला व्यवस्थित बसणारे सुती कपडे वापरावेत. फटाके फोडण्याच्या ठिकाणी पाण्याची आणि वाळूची बादली जवळ ठेवावी. एखादा फटका अपेक्षेप्रमाणे फुटला नाही तर त्याच्याजवळ लगेच जाऊ नये किंवा पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. न फुटलेल्या फटाक्यांना हात लावणे किंवा त्यातील दारू वेगळी करून पेटवणे अत्यंत धोकादायक आहे.
मोठ्या आवाजाचे फटाके आणि सुतळी बॉम्ब शक्यतो टाळावेत. त्यांच्या आवाजाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि हृदयविकार किंवा श्रवणविषयक समस्या असलेल्या व्यक्तींना त्रास होऊ शकतो. फटाक्यांमुळे हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषणही वाढते. त्यामुळे सण साजरा करताना पर्यावरण आणि इतरांच्या आरोग्याचाही विचार करणे गरजेचे आहे.
भाजल्यास तातडीने काय करावे?
फटाक्यांमुळे शरीराचा कोणताही भाग भाजल्यास सर्वप्रथम संबंधित व्यक्तीला आगीच्या स्रोतापासून दूर सुरक्षित ठिकाणी न्यावे. भाजलेल्या भागावर साधारण २० मिनिटे थंड, वाहते नळाचे पाणी सोडावे. यामुळे त्वचेतील उष्णता कमी होण्यास आणि भाजण्याची तीव्रता कमी करण्यास मदत होते. हातातील अंगठ्या, बांगड्या किंवा घड्याळ सूज येण्यापूर्वी काढावे. मात्र, त्वचेला चिकटलेले कपडे ओढून काढू नयेत. भाजलेल्या जागेवर कोलगेट, तेल, तूप, आयोडेक्स, हळद किंवा अन्य घरगुती पदार्थ लावू नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय क्रीम किंवा मलम लावण्याची घाई करू नये. भाजलेला भाग थंड केल्यानंतर स्वच्छ, न चिकटणाऱ्या कापडाने हलके झाकावा आणि वैद्यकीय मदत घ्यावी. मोठ्या प्रमाणात भाजणे, फोड येणे, चेहरा किंवा हात भाजणे अथवा लहान मूल भाजणे अशा परिस्थितीत तातडीने रुग्णालयात दाखल करावे, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुपम टाकळकर यांनी सांगितले.
सुरक्षिततेकडे अधिक लक्ष द्यावे
फटाके फोडणे हा आनंदाचा एक भाग असला तरी त्यासाठी स्वत:चा किंवा इतरांचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष द्यावे. नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, फटाक्यांचा वापर जबाबदारीने करावा आणि आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घ्यावी.
डॉ. अनुपम टाकळकर (त्वचारोग तज्ज्ञ)
Read About :GMCH Medical Students – वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी घाटीत संधींची नवी कवाडे उघडणार !
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.