Ad Advertisement Ad Advertisement

MPSC Examinations – परीक्षा दिल्यावर एमपीएससीच्या उमेदवारांना मिळणार शुल्क परत; शासनाला शिफारस

उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल फडणवीस सरकारला सादर

मुंबई : MPSC Examinations – उमेदवारांच्या हिताच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा दिल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत विचार करण्याची तसेच उत्तरतालिकेवरील उमेदवारांची हरकत मान्य झाल्यास हरकत नोंदविण्यासाठी भरलेले शुल्क परत करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस उच्चस्तरीय समितीने राज्य शासनाला केली आहे.

राज्यातील भरती व स्पर्धा परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. व्ही. राधा समितीचा हा दुसरा अहवाल असून एकूण चार टप्प्यात अहवाल सादर होणार आहे. राज्यातील भरती आणि स्पर्धा परीक्षा प्रक्रियेसंदर्भात शासन निर्णय 4 सप्टेंबर 2026 अन्वये उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसंदर्भातील पहिला अहवाल 4 नोव्हेंबर 2026 रोजी सादर केला होता. त्यानंतर समितीने आपला दुसरा अहवाल 23 नोव्हेंबर 2026 रोजी शासनास सादर केला आहे.

उमेदवारांच्या मागण्यांची दखल

उमेदवारांकडून परीक्षा शुल्कासंदर्भात सातत्याने करण्यात येणाऱ्या मागण्यांची दखल घेत समितीने महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेस प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला त्याने भरलेले संपूर्ण परीक्षा शुल्क परत करण्याबाबत आयोगाने विचार करावा, असे समितीने सुचविले आहे. यासाठी इतर राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उत्तम पद्धतींचाही अभ्यास करण्यात आला आहे.

तसेच, उत्तरतालिकेवर उमेदवाराने घेतलेली हरकत आयोगाने मान्य केल्यास संबंधित उमेदवाराने हरकतीसाठी भरलेले शुल्क त्याला परत करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या निर्णयामुळे परीक्षेची तयारी गांभीर्याने करणाऱ्या उमेदवारांवरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे.

महाआयडी किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी

उमेदवारांना विविध परीक्षांसाठी अर्ज करताना वारंवार प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे अपलोड करावी लागू नयेत, यासाठी महाआयडी किंवा आधारद्वारे एकवेळ नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्याची शिफारस करण्यात आली आहे. या सुविधेमुळे परीक्षा दिलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्काची रक्कम त्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यात परत करणेही सुलभ होणार आहे.

त्रिस्तरीय कमांड अँड कंट्रोल सेंटर

परीक्षा प्रक्रियेवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय ‘एक्झाम कमांड अँड कंट्रोल सेंटर’ स्थापन करण्याची शिफारस समितीने केली आहे. या व्यवस्थेत तीन स्तरांवर नियंत्रण केंद्रे कार्यरत राहतील –

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयात केंद्रीय नियंत्रण केंद्र.
  • जिल्हास्तरावर स्वतंत्र नियंत्रण केंद्र.
  • प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या दिवशी नियंत्रण केंद्र.

या त्रिस्तरीय व्यवस्थेमुळे परीक्षा प्रक्रियेचे प्रभावी निरीक्षण, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि गैरप्रकार आढळल्यास तातडीने हस्तक्षेप करणे शक्य होणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची स्वतंत्र बँक

राज्यातील विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुरेशा आणि आवश्यक पायाभूत सुविधांनी युक्त परीक्षा केंद्रांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र बँक (व्ह्यन्यू बँक) तयार करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या बँकेमध्ये परीक्षा केंद्र म्हणून वापरता येऊ शकणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारतींची अद्ययावत माहिती नोंदविण्यात येईल. प्रत्येक केंद्राची आसनक्षमता, दिव्यांग आणि अन्य उमेदवारांसाठीची सुगम्यता तसेच उपलब्ध पायाभूत सुविधांची माहिती या बँकेत समाविष्ट केली जाईल. यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निश्चित केलेल्या दरांनुसार शाळा आणि महाविद्यालयांच्या इमारती परीक्षा आयोजनासाठी ताब्यात घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची शिफारसही समितीने केली आहे.

Read About : Competitive Examinations – पेपरफुटीविरोधी कायद्यात कठोर सुधारणांची शिफारस; उच्चस्तरीय समितीचा 2’रा अहवाल सादर

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.