प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा २.३ अंशांनी अधिक
मेलबर्न : आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक भीषण आणि विनाशकारी ‘एल निनो'(El Nino) जगभरात आकार घेत असून, जगभर दुष्काळ, पूर, वणवे अशा नैसर्गिक आपत्तींची त्सुनामी येण्याची चिन्हे आहेत. यंदाचा एल निनो सर्व जुने विक्रम मोडणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र (युएन) आणि जागतिक हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
मेलबर्न विद्यापीठातील हवामान संशोधक मँडी फ्रॉईंड यांच्या मते, यापूर्वी जगाने अनेक शक्तिशाली एल निनो अनुभवले आहेत. मात्र, इतक्या वेगाने आणि तीव्रतेने विकसित होणारा एल निनो पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. सामान्यत: एल निनोचा प्रभाव नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान दिसतो. परंतु यंदा उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशांत महासागराच्या पाण्याचे तापमान मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ऑगस्ट महिन्यात नोंदवलेले तापमान सरासरीपेक्षा तब्बल २.३ अंश सेल्सिअसने जास्त होते. तज्ज्ञांच्या मते, या बदलांमुळे २०२७ पर्यंत जागतिक तापमानाचे सर्व जुने रेकॉर्ड मोडीत निघणार असून, पृथ्वीवरील संपूर्ण हवामान यंत्रणा कोलमडण्याची गंभीर भीती निर्माण झाली आहे.
जगावर काय परिणाम होणार?
प्रशांत महासागरात एरवी १ किंवा २ चक्रीवादळे येतात. मात्र सध्या जपानपासून हवाई बेटांपर्यंत एकाच वेळी ४ प्रचंड चक्रीवादळे फिरत आहेत. याशिवाय इंडोनेशियातील जंगलांमध्ये लागलेले महाभयंकर वणवे हे याच एल निनोचे फलित आहेत. दक्षिण अमेरिकेत विनाशकारी पूर येऊन शेतीचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. दक्षिण गोलार्ध आणि आशियाई देशांमध्ये प्रचंड उष्णता आणि दुष्काळाची स्थिती निर्माण होईल. ऑस्ट्रेलियात आत्ताच तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून आफ्रिकेत भीषण दुष्काळ पडण्याचा धोका आहे. या हवामान बदलांमुळे जगातील सुमारे ५ कोटी गरीब व असुरक्षित नागरिकांना उपासमारीला सामोरे जावे लागू शकते.
तातडीच्या उपायांची गरज
हवामान बदलाच्या संकटात एल निनोने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. निसर्गाने मानवजातीला दिलेला हा शेवटचा इशारा मानून सर्व देशांनी जीवाश्म इंधनाचा (पेट्रोल, डिझेल, कोळसा) वापर थांबवणे आणि कार्बन उत्सर्जन रोखणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच गरीब देशांना वाचवण्यासाठी प्रगत हवामान अंदाज मॉडेल्स विकसित करण्याची तातडीची गरज व्यक्त केली जात आहे.
