Development and Environmental Challenges : मानवाने निसर्गात केलेली ढवळाढवळ कदाचित हिमालयाला रुचली नाही आणि त्याचे रूपांतर हिमप्रपात आणि लगोलग आलेल्या जलप्रपातात झाले असे म्हटले जात आहे. त्याचा अधिक उलगडा येत्या काळात होईल. अजून एक आश्चर्य माणसाला वाटत आहे की, आपल्याकडे अनेक मानवनिर्मित उपग्रह आहेत, अत्याधुनिक हवामानदर्शक साधने आहेत मग असा प्रलय येणार आहे याची कल्पना कशी आली नाही. हा पूर जरी नेपाळमध्ये आला असला तरी याचा आवाका चीन, तिबेट, नेपाळ, भारत अशा अनेक देशांत आहे.
क्रांती हा शब्द अनेक अर्थाने वापरला जातो. प्रस्थापितांना उलटवणारी ती क्रांती. क्रांती म्हणजे बदल. औद्योगिक क्रांतीने जगाची दिशा बदलली. सध्याच्या चौथ्या क्रांतीच्या लाटेत आपण विज्ञानामुळे समाज, त्यातही येणारी पिढी कशी बदलत आहे याचा विचार करत आहोत. विज्ञानाची झेप निरखत असतानाच एक अशी मोठी घटना घडली, ज्या घटनेने आपल्याला निसर्गापुढे विज्ञानाची प्रगती किती मर्यादित आहे याची जाणीव झाली. ही घटना आहे नेपाळमधील प्रलयाची.. नेपाळमध्ये जे झालं ते कशामुळे झालं याबद्दल तर्कवितर्क सुरू आहेत; पण निसर्गाच्या रौद्र रूपामुळे शेकडो निष्पाप माणसांचा बळी गेला. त्यातले अनेकजण भारतातून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. काहीही कल्पना नसताना हे लोक क्षणार्धात पन्नासेक फूट चिखलात गाडल्या गेले. यातले अनेक जण आयुष्यभर नोकरी करून, कष्ट करून आता आपले स्वप्न पूर्ण करत होते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांनी मानसिक आणि शारीरिक तयारीही केली होती. अनेक जणांनी पुराचा लोंढा येण्याच्या पूर्वी काही क्षण मोबाइलवरून आपल्या परिजनांना आपण सुखरूप असल्याचे कळवले होते. त्यांचे नातेवाईक गेले कित्येक दिवस आपल्या लाडक्यांचा काहीतरी ठावठिकाणा लागेल या आशेने कळवळून समाजमाध्यमांवर मेसेजेस टाकत आहेत. काही जणांचा ठावठिकाणा त्यांचे जीपीएस लोकेशन्स कळल्याने लागत आहे; पण ते सापडण्याची शक्यता मावळतच आहे.
एवढ्या मोठ्या अस्मानीनंतर साहजिकच हे कशामुळे घडले असावे याचे तर्क सुरू झाले. या भागात जलविद्युत प्रकल्पाची कामे सुरू आहेत, चीनने काही ठिकाणी मोठे प्रकल्प सुरू केल्याचा आरोप आहे. मानवाने निसर्गात केलेली ढवळाढवळ कदाचित हिमालयाला रुचली नाही आणि त्याचे रूपांतर हिमप्रपात आणि लगोलग आलेल्या जलप्रपातात झाले असे म्हटले जात आहे. त्याचा अधिक उलगडा येत्या काळात होईल. अजून एक आश्चर्य माणसाला वाटत आहे की, आपल्याकडे अनेक मानवनिर्मित उपग्रह आहेत, अत्याधुनिक हवामानदर्शक साधने आहेत मग असा प्रलय येणार आहे याची कल्पना कशी आली नाही. हा पूर जरी नेपाळमध्ये आला असला तरी याचा आवाका चीन, तिबेट, नेपाळ, भारत अशा अनेक देशांत आहे. म्हणजे हे संकट एका देशापुरते मर्यादित नाही. नेपाळ आकाराने छोटा आणि पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून असलेला देश. आधीच दहा वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाने संपूर्ण देश गलितगात्र झाला होता, आता या संकटातून बाहेर पडायला फार मोठा काळ जावा लागेल.
औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीपासून माणसाला जाणीव झाली की, त्याला जी साधनं विज्ञानाने दिली आहेत त्यात तो भर घालून निसर्गाला वेसण घालू शकतो. माणसाच्या विकासाला नक्कीच याचा फायदा झाला.
रोगराई आटोक्यात आली, माणसाचे आयुष्यमान वाढले, दळणवळण सुरू झाले, व्यापार उद्योग वाढले. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विज्ञानविषयक अनेक गोष्टी फार वेगात होत आहेत. असे असले तरी, माणूस कितीही मोठा झाला, तरी तो निसर्गाच्या विरोधात जाऊन काही करणे म्हणजे स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारणे आहे. दिसला डोंगर की मार हातोडा, दिसली नदी की आडव तिला… माणसाची ही हाव निसर्गाला मानवेलच असं नाही. एआयमुळे एखाद्या जलविद्युत प्रकल्पाचा आराखडा जसा क्षणार्धात करून मिळेल तसेच माणसाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या प्रकल्पाचा परिणाम नेमका काय होईल याचा अंदाज घेतला पाहिजे. हा परिणाम दीर्घकाळाबद्दल काय असेल याचा अंदाज घेतला पाहिजे.
फक्त एक राज्य, एक देश याचा विचार न करता संपूर्ण मानवजातीसाठी मोठमोठे प्रकल्प फायदेशीर ठरतील का, हा प्रश्न एआयच्या मदतीने सोडवणे काहीच अवघड नाही. तसेही पर्यावरणप्रेमी याबद्दल सतत अभ्यास करत आहेत, त्यांची मदत घेतली तर माणूस आणि मशीन्स मिळून भविष्याबद्दल जास्त जागरूक राहतील. हिमालयाला, समुद्राला, जंगलांना धक्का लागेल असे जलविद्युत प्रकल्प, धरणं, रस्ते, बोगदे करण्याचा वेग कमी केला पाहिजे आणि शक्य तितक्या प्रकल्पांना तडीस नेण्यापूर्वी त्याच्या दीर्घकालीन परिणामांचा विचार केला पाहिजे. विज्ञानाची प्रगती आणि माणसाचे आयुष्य यांचा संबंध परस्परपूरक हवा. प्रगतीचा वापर माणसाने स्वत:चे मानसिक आणि शारीरिक आरोग्य, जीवनमान, जीवनपद्धती, शांतता यांच्या विकासासाठी केला पाहिजे.
नेदरलँडमध्ये एक फार जुनी परंपरा आहे, त्याला dusking असे म्हणतात. डस्क म्हणजे अर्थात संधिकाल. रात्र अजून प्रवेशलेली नाही, दिवस मात्र संपला आहे, या दरम्यानचा काळ. या काळात शांतपणे बाहेर बघत राहणं ही ही पद्धत. संध्याकाळच्या सावल्या बघत बघत रात्रीची चाहूल घ्यायला लोक जमतात. वरवर वाटेल किती सोपे आहे हे; पण विचार करून बघा किंवा रोज एक आठवडाभर करून बघा आणि लक्षात येईल की, दिवसाची रात्र होताना शांतपणे आकाशाच्या सोबतीने राहणं तेवढं सोपं नाही. आपले पूर्वज हे करत होते. त्यासाठी एकाग्र होणं गरजेचं आहे. हे असं शांतपणे बसायला डच लोकही विसरले होते; पण एका लेखिकेने पुढाकार घेऊन या जुन्या पद्धतीला पुन्हा लोकांच्या आठवणीत आणलं. हा चिमुकला देश विकसित आहेच; पण त्याचबरोबर जगभरातल्या आनंदी देशांपैकी एक आहे. (हॅपीनेस इंडेक्स त्या देशातल्या माणसांची एकूण परिस्थिती आणि आनंददायी वातावरणाचा विचार करून ठरवला जातो, सध्या नेदरलॅण्ड्स जगात सातव्या क्रमांकावर आहे, भारत ११७व्या क्रमांकावर म्हणजे तळाच्या जवळ आहे). अशी कोणती पद्धत आपल्या देशात आहे का, याचा विचार केल्यावर लक्षात आले कितीतरी गोष्टी, प्रथा आपल्याला निसर्गापाशी नेतात, संगीताचे घ्या – दिवसाच्या प्रत्येक प्रहरासाठी वेगवेगळे राग निर्मिल्या गेले, त्यांनी माणसाचे अंतर्मन व्यक्त केलेच पण निसर्ग, ऋतू यांच्याशीही संवाद साधला.
मूठभर लोकांच्या हातात शक्ती आली तर निसर्गाची निवड होणे अवघड आहे, उद्योगपती आणि सत्ताधीश नेहमीच जिथे पैसा जास्त मिळेल अशा प्रगतीच्या साधनांची निवड करतील. हा काळ अधिक नाजूक आहे कारण एआयच्या मदतीने हे उद्योगपती आणि सत्ताधीश अजून शक्तिशाली झाले आहेत.
भक्ती चपळगावकर
bhalwankarb@gmail.com
