Ad Advertisement Ad Advertisement

China Electric Aircraft : चीनच्या बॅटरीवर चालणाऱ्या 19 आसनी विमानाचे पहिले उड्डाण; 10 इलेक्ट्रिक फॅन्सची ताकद

सीई-२५ए विमानाने बॅटरीच्या ऊर्जेवर १७ मिनिटांत ६०.४ किलोमीटर अंतर पार केले; प्रत्येक पंखावर पाच याप्रमाणे दहा इलेक्ट्रिक डक्टेड फॅन्स

बीजिंग : China Electric Aircraft विमान प्रवासासाठी पेट्रोलियम इंधनावर अवलंबून राहण्याची गरज कमी करण्याच्या दिशेने चीनने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. चीनच्या सीई-२५ए या १९ प्रवासी क्षमतेच्या विमानाने केवळ बॅटरीच्या ऊर्जेवर पहिले उड्डाण केले. या चाचणीदरम्यान विमानाने १७ मिनिटे आकाशात राहून ६०.४ किलोमीटर अंतर पार केले. एका प्रवासात सुमारे ४०० किलोमीटर उड्डाण करण्याची त्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे.

चीनच्या ‘कमर्शियल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन’ने विकसित केलेल्या या विमानाची रचना पारंपरिक विमानांपेक्षा वेगळी आहे. पंखांखाली मोठी इंजिने बसवण्याऐवजी प्रत्येक पंखावर पाच याप्रमाणे एकूण दहा इलेक्ट्रिक डक्टेड फॅन्स लावण्यात आले आहेत. या तंत्रज्ञानाला ‘डिस्ट्रब्यिुटेड इलेक्ट्रिक प्रोपल्शन’ म्हणतात. विमानाच्या पृष्ठभागालगत वाहणाऱ्या मंद हवेचा उपयोग करून उड्डाणातील ऊर्जेची हानी कमी करणे, हा या रचनेचा उद्देश आहे. त्यामुळे विमानाची वायुगतिकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होऊ शकते.

संगणकीय तंत्रज्ञानातून पंखांची रचना सुधारली

नॉर्थवेस्टर्न अभियांत्रिकी विद्यापीठातील जुनकियांग बाई यांनी विमानाच्या रचनेवर काम केले. पंखांच्या विविध आकारांची चाचणी पारंपरिक सिम्युलेशनपेक्षा जवळपास २०० पट वेगाने करण्याची संगणकीय पद्धत विकसित करण्यात आली. या संशोधनानुसार सुधारित रचनेमुळे विमानाचे कमाल ‘लिफ्ट-टू-ड्रॅग’ गुणोत्तर सुमारे ५० टक्क्यांनी वाढू शकते.

दोन मेगावॅटची यंत्रणा, पण बॅटरीचे तपशील गुलदस्त्यात

चीनच्या विज्ञान अकादमीतील संशोधकांनी दोन मेगावॅट क्षमतेची एकत्रित प्रणोदन यंत्रणा विकसित केली आहे. पंखांमधून वाहणाऱ्या हवेचा वापर मोटर्स थंड ठेवण्यासाठी केला जातो. या यंत्रणेची कार्यक्षमता ९४.५ टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र विमानातील बॅटरीची क्षमता, वजन, रासायनिक रचना आणि चार्जिंगसाठी लागणारा वेळ अद्याप जाहीर झालेला नाही. जेट इंधनाच्या तुलनेत बॅटरीची ऊर्जा साठवण्याची क्षमता कमी असल्याने वजन हा इलेक्ट्रिक विमानांसमोरील मोठा अडथळा आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रवासी सेवा कधी सुरू होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Read About : Tapas-1 Satellite : अंतराळातून मोजणार पृथ्वीचा ताप; भारतीय स्टार्टअपची महत्त्वाकांक्षी मोहीम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.