१२०० वर्षांतील सुमारे सहा हजार भूकंपांचा अभ्यास, आठ शहरांमध्ये इंफाळला सर्वाधिक धक्क्यांचा धोका
नवी दिल्ली : Earthquake Intensity Prediction – भूकंप कधी होईल हे अचूक सांगणे शक्य नसले, तरी त्याचे धक्के एखाद्या भागात किती तीव्र असू शकतात, याचा अंदाज आता अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) गुवाहाटीच्या संशोधकांनी ईशान्य भारतातील भूकंपामुळे जमिनीला बसणाऱ्या धक्क्यांची तीव्रता मोजण्यासाठी नवी पद्धत विकसित केली आहे. या संशोधनामुळे भूकंपरोधक इमारती आणि पूल उभारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
संशोधकांनी गेल्या १२०० वर्षांतील भूकंपांची माहिती गोळा करून जवळपास सहा हजार भूकंपांची नोंद असलेली सूची तयार केली. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ सिस्मॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
ईशान्य भारत भूकंपप्रवण का?
ईशान्य भारत दोन भूगर्भीय पट्ट्यांच्या दरम्यान आहे. या भागात शिलाँगचे पठार आणि अनेक भूगर्भीय भेगा असल्याने भूकंपाचा धोका अधिक आहे. १८९७ मधील शिलाँग आणि १९५० मधील आसामच्या विनाशकारी भूकंपांनी या प्रदेशाला मोठा फटका बसला होता.
आयआयटी गुवाहाटीच्या संशोधकांनी ‘कर्नल डेन्सिटी एस्टिमेशन’ या गणितीय तंत्राचा वापर करून वेगवेगळ्या भागांतील भूकंपांची शक्यता तपासली. ऐतिहासिक नोंदींमधील त्रुटी आणि भूगर्भीय भेगांची दिशा यांचाही अभ्यासात विचार करण्यात आला.
आठ शहरांचा अभ्यास, इंफाळमध्ये सर्वाधिक तीव्रता
या संशोधनात गुवाहाटी, अगरतळा, इंफाळ, शिलाँग, ऐझॉल, कोहिमा, गंगटोक आणि इटानगर या आठ शहरांचा समावेश होता. त्यापैकी इंफाळमध्ये जमिनीच्या धक्क्यांची अंदाजित तीव्रता सर्वाधिक असल्याचे संशोधकांना आढळले. इंडो-बर्मा पर्वतरांगांमध्ये भूकंपाची हालचाल सर्वाधिक असल्याचेही अभ्यासातून स्पष्ट झाले.
या संशोधनामुळे भविष्यात कोणत्या भागात जमिनीला किती तीव्र धक्के बसू शकतात, याचा अंदाज घेता येईल. मातीची रचना आणि स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून अभियंत्यांना अधिक सुरक्षित बांधकामांचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे भूकंपामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकते.
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.