स्वच्छ हवा सर्वेक्षणात लातूर देशात सातवा..!
लातूर : स्वच्छ हवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना राष्ट्रीय स्तरावर यश मिळाले आहे. स्वच्छ वायू सर्वेक्षण-२०२६ मध्ये ३ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत लातूर शहराने १८८.५ गुण मिळवत देशात ७ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
शहरातील रस्त्यांवरील धूळ नियंत्रण, यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई, कचरा व जैविक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, हरित क्षेत्रात वाढ, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन तसेच नागरिकांमध्ये वायू प्रदूषणाबाबत जनजागृती या विविध उपाययोजनांचा लातूरच्या कामगिरीत महत्त्वाचा वाटा आहे. लातूरचा राष्ट्रीय स्तरावर ७ वा क्रमांक मिळाला आहे. वर्ष २०२४ मध्ये ३१ वा आणि २०२५ मध्ये २४ वा क्रमांक आला होता. यावर्षी थेट पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळविण्याचा पराक्रम लातूरने केला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी शहरातील नागरिक, स्वच्छता कर्मचारी, विविध शासकीय विभाग तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत संस्था यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे, असे मत आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
स्वच्छ हवा, निरोगी लातूर-हीच आपली सामूहिक जबाबदारी! या संकल्पनेनुसार यापुढेही शहरातील वायू गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांवर प्रभावी नियंत्रण, हरित क्षेत्राचा विस्तार, स्वच्छता व्यवस्थेचे बळकटीकरण आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
दहा वर्षांपूर्वी दूषित हवेत देशात दहावे
दहा वर्षांपूर्वी दूषित हवेत लातूर पहिल्या दहा शहरांमध्ये प्रदूषित शहर होते. याचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४९० च्या पुढे होता. धुळीचे प्रदूषण सर्वाधिक असल्याने त्याचा थेट परिणाम नागरिकांना फुप्फुसाचे आजार जडण्यात झाला होता. लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आल्याने केंद्र सरकारने एन-कॅपमधून विविध उपाययोजना राबविल्या. त्यातून लातूरचा हवा गुणवत्ता निर्देशांक वाढण्यास मदत झाली. आता स्वच्छ शहरांच्या यादीत थेट सातव्या क्रमांकावर मजल मारल्याने लातूरने स्वत:च्या आरोग्यासाठी हवेची गुणवत्ता सुधारल्याचेच दिसून येते.

You need an account to post comments.