Ad Advertisement Ad Advertisement

Free Food Grains for Farmers in Maharashtra -दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 33 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार मोफत धान्य!

पुढील ३ महिन्यांसाठी माणसी ५ किलो गहू-तांदूळ देणार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : Free Food Grains for Farmers in Maharashtra राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्हा वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकऱ्यांना मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा राज्यातील ४२ लाख ३० हजार ७८३ शेतकऱ्यांना मिळणार आहे. हे धान्य पुढील ३ महिन्यांसाठी वितरित करण्यात येईल. तसेच त्यापुढील काळासाठी आढावा घेऊन योजना सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी मंत्रालयात पार पडली. त्यात राज्यात अभूतपूर्व अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने वरील निर्णय घेण्यात आला. सध्या राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ५ कोटी ७९ लाख ३४ हजार ७०२ लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य, तर १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील २१ लाख ६० हजार ६८२ शेतकऱ्यांना दरमहा १७० रुपये दिले जातात. दोन्ही योजनांचा लाभ न मिळणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा विचार करून त्यांनाही दर महिन्याला माणसी ५ किलो अन्नधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत अन्नधान्याचा लाभ तसेच एपीएल-डीबीटी योजनेचा रोख लाभ मिळत नसलेल्या एकूण ३३ जिल्ह्यांतील ४२,३०,७८३ शेतकऱ्यांना माणसी ५ किलो (३ किलो तांदूळ + २ किलो गहू) या प्रमाणात ३ महिन्यांकरता मोफत धान्य देण्यात येणार आहे. आधार सीडिंग पूर्ण झालेल्या शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून दरमहा हे धान्य वाटप करण्यात येणार आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण करून घेतल्यानंतरच त्यांना बायोमेट्रिक पडताळणीद्वारे हे धान्य देण्यात येईल.

इतर कॅबिनेट निर्णय

आर्थिक फसवणुकीतील संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद होणार. विभागीय स्तरावर एमपीआयडी न्यायाधिकरण, ९० दिवसांत प्रकरण निकाली निघणार.

नर्मदा खोऱ्यातील २६ हजार ५२६ हेक्टर क्षेत्राला सिंचन करणाऱ्या नंदूरबारमधील नर्मदा तापी वळण योजनेच्या कामांसाठी ५ हजार ५४८ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता.
महसूल विभागांतील अर्धन्यायिक कामकाजाकरता महसूल न्यायालय दावा व्यवस्थापन प्रणाली (रेव्ह्यन्यू कोर्ट केस मॅनेजमेंट सिस्टीम) लागू होणार. अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एक जिल्हा एक अपील तरतूद लागू होणार. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी.

आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांच्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्त्यात वाढ. शहरी वर्गवारीनुसार ६० हजार, ५१ हजार, ४३ हजार आणि ३८ हजार भत्ता मिळणार.
शालार्थ प्रणालीतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण सुविधा उपलब्ध करून देणार.

चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी

पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि धाराशिवचा समावेश

  • नव्या पुलांना बंधारा बंधनकारक
  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

मुंबई : राज्यातील दुष्काळी स्थितीत पशुधनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सोलापूर आणि धाराशिवसह गरज भासेल तिथे तातडीने चारा छावण्या सुरू करण्यास मंजुरी दिल्याचे महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

चारापुरवठ्यासाठी २०१९ मधील जुने दर लागू राहतील. यापुढे सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सिडको, नैना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन पुलाखाली किमान एक मीटर पाणी अडवण्यासाठी ‘पूलवजा बंधारा’ बंधनकारक करण्याचे आदेश दिले असून, शक्तिपीठ महामार्गावरही याचे नियोजन होत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आदी उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांच्या पत्रातील मागण्यांवर लवकरच बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली जाईल, असेही बावनकुळे यांनी या वेळी सांगितले.

तलावांचे खोलीकरण, गायरान जमिनींचे नियोजन

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून रस्ते कामासाठी जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या तलावांतील माती-मुरुम उपसण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर हिवाळी अधिवेशनात सामंजस्य करार होणार आहे. गोशाळा चालवणाऱ्या संस्थांना गायरान जमिनी २ ते ३ वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा आणि ग्रामपंचायतींच्या मागणीनुसार गायरान जमिनीवर २ ते ३ एकरांचे तलाव बांधण्याचा सकारात्मक विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

इतर निर्णय
गाळमुक्त धरण योजनेला मुदतवाढ

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि मालगुजारी तलावांतील गाळ काढून शेतकऱ्यांना मोफत देण्याच्या योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गाळ काढण्यासाठी ३२ रुपये आणि वाहतुकीसाठी ३७ रुपये प्रति घनमीटर (कमाल अनुदान ३७,५०० रुपये) दर निश्चित झाले आहेत.

वंचित शेतकऱ्यांना मदत

वनपट्टेधारक आणि रेकॉर्ड नसलेल्या परंतु प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्या (विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील) शेतकऱ्यांना ५,००० रुपये अंतिम अनुदान व पुढील एनडीआरएफ-एसडीआरएफ मदत देण्याचा निर्णय झाला. प्रलंबित ‘फार्मर आयडी’साठी महसूल व कृषी विभागाने एसओपी जारी केली आहे.

रोहयो मजुरीवाढ प्रस्ताव

मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमी मजुरी ३१७ वरून ३७५ रुपये करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. जल जीवन मिशनच्या अपूर्ण योजनांना तातडीने वीज जोडणी देऊन टँकरमुक्तीचे निर्देश दिले आहेत.

फळबाग, उसाबाबत निर्णय

सुकत चाललेल्या फळबागा वाचवण्यासाठी मदतीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री भरत गोगावले यांच्या मागणीनंतर महसूलमंत्र्यांनी दिल्या. आमदार अभिमन्यू पवार यांनी उसाला मुरघास परवानगीची मागणी केली असून, अभ्यास करून पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

Read About : 28-week abortion for minor rape survivor- 8 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.