भारतीय समाज उत्सवप्रिय आहे. कोणताही सण, सोहळ्याचा उत्सव साजरा करावा आणि आपल्या समस्या, चिंता अल्पकाळाकरिता बुडवून उत्सवाचा मनमुराद आनंद उपभोगावा ही भारतीय समाजसमूहाची सवय आहे. जेव्हा समस्यांचा गराडा गडद होऊ लागतो आणि त्याचा सामना करताना जीव मेटाकुटीस येतो, तेव्हा त्यापुढे हार मानण्याऐवजी तात्पुरते का होईना, त्याचा विसर पडेल असे काही समोर आले की तेवढ्यापुरता विरंगुळा मिळतो हे लक्षात आले; तेव्हापासून सण, उत्सवांचे सोहळे उत्साहात साजरे करण्याच्या परंपरा सुरू झाल्या असाव्यात. अशा सोहळ्यांमुळे समस्यांचा काही काळ विसर पडतो आणि अल्पकाळापुरते का होईना जगणे सुसह्य वाटू लागते, हा जवळपास प्रत्येकाचाच अनुभव असल्याने तो सार्वजनिक स्वरूपात परस्परांसोबत वाटून घ्यावा या उद्देशाने काही सण, उत्सवांना सामाजिक सोहळ्यांचा साज चढविला गेला. आनंद, समाधानाचे क्षण वाटून घ्यावेत, त्यामध्ये सर्वांना सहभागी करून घ्यावे आणि दु:ख, चिंतेची कारणे स्वत:पुरती ठेवावीत ही आपल्या संस्कृतीची शिकवण असल्याने, सणांच्या आणि उत्सवांच्या सार्वजनिकीकरणास समाजाची सहजपणे मान्यता मिळाली आणि अनेक सण सामाजिक स्तरावर साजरे केले जाऊ लागले.
बदल ही एकमेव शाश्वत गोष्ट आहे असे म्हटले जाते. त्यानुसार, सण, उत्सवाचे सोहळे साजरे करण्याच्या परंपरा आणि प्रथादेखील काळासोबत बदलत गेल्या. ते अपरिहार्य होते हे मान्य केले तरी त्यामागील सामाजिक विचारांचा विसर पडू नये, उलट त्या संकल्पना समाजात अधिक दृढ व्हाव्यात अशीच असे सोहळे सार्वजनिक करण्यामागची संकल्पना होती. लोकमान्य टिळकांनी ही संकल्पना लक्षात घेऊनच घरोघरीच्या गणेशोत्सवास सार्वजनिक सोहळ्याचा साज चढविला आणि गेल्या सव्वाशे वर्षांहून अधिक काळासोबत या सोहळ्याचे स्वरूपही बदलत गेले. त्याला परंपरेचा साज चढविण्याच्या प्रयत्नांत काही सांस्कृतिक संकल्पनांचा कसा संकोच होत गेला हेच त्या उत्साहात ध्यानात आले नाही आणि सार्वजनिक सोहळ्यांमध्ये उत्सवांच्या आनंदाऐवजी उन्मादाचे उधाण उफाळत गेले.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या या बदलत्या रूपाची दखल वर्षानुवर्षे घेतली जात आहे. हा बदल मानवणार नसल्याची खंतदेखील अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात आहे. तरीही परंपरांचा विसर पडत गेल्याने सुरू झालेल्या काही नव्या प्रथांनाच परंपरांचा मुलामा चढविला जाऊ लागला आणि बदल ही शाश्वत बाब असल्याच्या मान्यतेमुळे असे बदलही अपरिहार्यपणे किंवा नाईलाजाने स्वीकारले जाऊ लागले. हे बदल आता एवढे अंगवळणी पडत चालले आहेत की, सार्वजनिक गणेशोत्सवाचे सोहळे कर्णसंपुटे बधिर करणाऱ्या कर्णकर्कश आवाजाच्या आधुनिक ध्वनिक्षेपण यंत्रणा, दृष्टी हिरावून घेण्याची क्षमता असलेल्या प्रखर प्रकाश योजनांचा वापर झाला तरच उत्साहात साजरे होतात अशी भावना नकळत रुजत गेली. अर्थात, या बदलामागचे अर्थकारण सहसा सामान्यांच्या ध्यानातही येत नसल्याने आणि या काळात सर्वसामान्यांच्या भावनांना केवळ भक्तीची किनार असल्याने त्याकडे फारसे लक्षदेखील दिले गेले नसावे. कदाचित त्यामुळेच, आता मात्र या बदलाची किंमत मोजण्याची वेळ येत असल्याचे ध्यानात आल्याने, बदलत्या उत्सवांच्या आधुनिकीकरणाकडे होणारी डोळेझाक संपून आता समाजास जाग येऊ लागली आहे.
ध्वनिप्रदूषण (Noise Pollution) करणाऱ्या कर्कश ध्वनियोजना, दृष्टी हिरावून घेणाऱ्या प्रखर प्रकाशयोजना आणि परंपरांच्या नावाखाली समाजहितास बाधा आणणाऱ्या नव्या प्रथांना मूठमाती देण्याची मागणी आता सामाजिक दबावाच्या ताकदीने पुढे येऊ लागली असली, तरी ही मागणी नवी नाही. दर वर्षी गणेशोत्सवासारखे दीर्घकाळ चालणारे सोहळे साजरे करण्याचे वेध सुरू झाले की ही मागणी पुढे येत असते, त्याची गंभीर दखलही घेतली जाते, काही बंधने जारी केली जातात, न्यायालयेदेखील काही निर्देश देतात आणि त्यांचे पालन करणाऱ्या सरकारी यंत्रणा आपली जबाबदारी पार पाडण्यापुरती काही औपचारिक कार्यवाही सुरू करतात. मात्र, बदलत्या प्रथांचा प्रवाह पहिल्यासारखाच वेगाने सुरू राहिलेला असतो. यंदा मात्र हा प्रवाह कमालीचा वेगवान झाला असून गणेशोत्सवातील या प्रथांच्या विरोधातील आवाजाला सामूहिक रूप मिळताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत हा आवाज बुलंद होतो की नेहमीप्रमाणे मूक होतो हे पाहावयास मिळेल, पण सध्या मात्र ही बाब सामाजिकदृष्ट्या समाधानकारक ठरली आहे.
भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास आपला धर्म मानण्याचे, धर्माच्या संस्कारानुसार आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. धार्मिक स्वातंत्र्याची घटनात्मक चौकट ही उत्सवप्रिय समाजाची सामूहिक ताकद आहे. कदाचित त्यामुळेच या स्वातंत्र्याचा अमर्याद उपभोग घेताना सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, आरोग्य किंवा इतरांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीची भावना या मर्यादांचा विसर पडत असावा. गणेशोत्सवासारखे सोहळे सार्वजनिकरीत्या साजरे करणे हा समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्याचा भाग आहेच, परंतु सार्वजनिक रस्त्यांवर वाहतूक रोखणे, ध्वनिप्रदूषण वाढविणे, प्रकाशाचे प्रदूषण करणे, सार्वजनिक जागेचा वापर करताना अन्य कोणास त्रास होऊ नये या कर्तव्यभावनेचा विसर पडणे या बाबी धार्मिक आचरणाच्या स्वातंत्र्यास मान्य नाहीत. केवळ धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य म्हणून त्यास अमर्याद संरक्षण मिळू शकत नाही. त्यामुळेच गणेशोत्सवाच्या काळातील जे जे काही प्रदूषणकारी असते, त्याचे विसर्जन करणे हा सामाजिक समंजसपण ठरतो. त्यानुसार समाजाची मानसिकता तयार होऊ लागली आहे, ही समाधानकारक बाब आहे. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवांचा दर्जा दिला गेला आहे, त्यामुळे हा उत्सव उत्साहाने साजरा होईलच, पण तो संस्कृतीस साजेसा ठरेल यासाठी सरकारलाही समाजाच्या भावनांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी लागेल.
