३ मुलांसह दाम्पत्याचा मृत्यू, विषबाधा की मालमत्तेचा वाद? शवविच्छेदन अहवाल ठरणार महत्त्वाचा
ग्रेटर नोएडा : Greater Noida family deaths : ग्रेटर नोएडामधील रबूपुरा परिसरातील ‘नगला श्री पदम’ गावात एक अत्यंत हृदयद्रावक आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि त्यांच्या तीन निष्पाप मुलांचा गूढ मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री कुटुंबाने नूडल्स खाल्ले होते आणि शनिवारी सकाळी पाचही जण मृतावस्थेत आढळले. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेत महेश (वय ३७ वर्ष – पती), ललिता (वय ३५ वर्ष – पत्नी), लड्डू (वय ११ वर्ष – मुलगा), मिश्टी (वय ७ वर्ष – मुलगी), साक्षात (वय ३ वर्ष – लहान मुलगा) यांचा मृत्यू झाला आहे.
ग्रेटर नोएडाचे पोलिस उपआयुक्त श्रवण कुमार सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास संपूर्ण कुटुंबाने जेवण केले होते. शनिवारी सकाळी एका मुलाची परीक्षा होती. तो वेळेवर न उठल्याने शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी जाऊन पाहिले असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, फॉरेन्सिक टीम, रुग्णवाहिका आणि अन्न सुरक्षा विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
स्थानिक भाजप आमदार धीरेंद्र सिंग यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मुख्यमंत्री कार्यालयाला या प्रकरणाची माहिती दिली आहे. शवविच्छेदन अहवाल आणि अन्न चाचणीचे वैज्ञानिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
विषबाधा की मालमत्तेचा वाद?
या प्रकरणाला आता गूढ आणि गंभीर वळण मिळाले आहे.
अन्नाची पाहणी आणि फॉरेन्सिक तपास : प्राथमिक अंदाजानुसार हा अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अन्नामध्ये काही विषारी पदार्थ मिसळला होता का, याचा शोध फॉरेन्सिक टीम घेत आहे.
शेजाऱ्यांचे गंभीर आरोप : शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घरात मालमत्तेवरून दररोज वाद होत होते. मृत महेशच्या आईने सर्व मालमत्ता आपल्या मुलीच्या (महेशच्या बहिणीच्या) नावे केली होती आणि महेशच्या कुटुंबाला घर सोडण्यास सांगत होती. आईने बनवले होते नूडल्स? शेजाऱ्यांचा असा दावा आहे की, कुटुंब मेळ्यावरून परत आल्यावर महेशच्या आईनेच नूडल्स बनवून त्यांना दिले होते. याप्रकरणी कठोर तपास करण्याची मागणी शेजाऱ्यांनी केली आहे.
राजकीय वाद पेटला
मायावती यांची मागणी : बसपा सुप्रीमो मायावती यांनी सोशल मीडियावर (एक्स) पोस्ट करत म्हटले की, ‘एकाच कुटुंबातील ५ जणांचा विषारी अन्नामुळे झालेला मृत्यू अत्यंत हृदयद्रावक आणि चिंतेचा विषय आहे. सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.’
समाजवादी पक्षाचा भाजपवर हल्लाबोल : समाजवादी पक्षाने (सप) भाजप सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, ‘उत्तर प्रदेशात विषारी खाद्यपदार्थ आणि बनावट वस्तूंचा व्यापार सर्रास सुरू आहे. हा व्यापार करणारे लोक सत्ताधारी पक्षाशी जोडलेले आहेत. भाजपच्या काळात सामान्य जनतेचा जीव धोक्यात आला आहे.’
Read About : Dongarale Murder Case – साडेचार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीला मृत्युदंड
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.