अखरेच्या प्रवासात पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते ठरले आप्तेष्ट
छत्रपती संभाजीनगर : Humanity Police Social Workers – माणुसकी केवळ शब्दांतून नव्हे, तर कृतीतूनही जपली जाते, याचा प्रत्यय छत्रपती संभाजीनगरमध्ये आला. आयुष्याच्या अखेरच्या क्षणी साथ देणारे कोणीही नसलेल्या एका निराधार व्यक्तीला मृत्यूनंतरही सन्मानाने अखेरचा निरोप देत सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले. नातेवाईकांनी पाठ फिरवली असली, तरी समाजाने मात्र माणुसकीची नाळ तुटू दिली नाही.
गुलमंडी येथील अर्बन बँकेच्या परिसरात रवींद्र सोनवणे हे भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होते. अनेक दिवसांपासून ते याच परिसरात दिसत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. केवळ बघ्याची भूमिका न घेता नागरिकांनी तत्काळ सिटी चौक पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत सोनवणे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले.
घाटी रुग्णालयात त्यांच्यावर सलग दहा दिवस उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. सोनवणे यांच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सलग चार दिवस प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यांचा कोणीही नातेवाईक अथवा वारसदार पुढे आला नाही. आयुष्यभर एकाकीपणाचे ओझे वाहणाऱ्या या व्यक्तीच्या अंत्यविधीची जबाबदारीही अखेर समाजातील संवेदनशील माणसांनी स्वीकारली.
गुरुवारी (दि. ५) बेगमपुरा स्मशानभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे, आकाश पवार आणि सिटी चौक पोलीस ठाण्याचे ज्ञानेश्वर फुके उपस्थित होते.
Read About : ST Contract Recruitment – एसटीत चालक-वाहकांच्या कंत्राटी भरतीचा डिसेंबरमध्ये गिअर पडणार!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.