Advertisement Advertisement

India GDP Growth Amid Economic Challenges : असाध्य ते साध्य…

कोणत्याही संधीचे सोने होणारच असते, तेव्हा त्याचे काही शुभसंकेत अगोदरपासून मिळण्यास सुरुवात झालेली असते. त्या संकेतांचे सारे बिंदू नेटकेपणाने जोडले म्हणजे निर्माण होणारी सुबक रांगोळी या संधीचे सोने झाल्याची साक्ष देते. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने साध्य केलेला सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) म्हणजे ‘असाध्य ते साध्य’ करण्याच्या ‘सायासा’चे उल्लेखनीय यश म्हणावे लागेल. आज संपूर्ण जग भू-राजकीय तणावाच्या, युद्धाच्या आणि आर्थिक अनिश्चिततेच्या गर्तेतून जात आहे. एका बाजूला युद्धामुळे बड्या-बड्या अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली सापडल्या आहेत.

इंधन दरवाढीच्या चटक्यांनी उभे जग होरपळत असून पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भविष्यात पुन्हा सावरण्याची चिंता सर्वच देशांना भेडसावत आहे. अशा परिस्थितीतही भारताच्या ‘जीडीपी’ दरवाढीचा उंचावणारा आलेख म्हणजे संकटातून संधी साधण्याचा आणि हाती आलेल्या संधीचा सुनियोजित वापर करून सोने करण्याचा आगळा विक्रम ठरणार आहे. युद्धस्थितीचे चटके भारतालादेखील बसले होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेस काटकसरीचे आवाहन केले होते. सोने खरेदी टाळा, विदेश दौऱ्यांवरील खर्च कमी करा, विदेशातील भपकेबाज समारंभांवर उधळपट्टी करू नका असे आवाहन त्यांनी केले, तेव्हा त्याची खिल्ली उडविणाऱ्या राजकारणास अक्षरश: ऊत आला होता. यामुळे देशाचे काय भले होणार असा सवाल विरोधकांकडून केला जात होता. विरोधकांच्या या निराशावादातूनच आर्थिक संकटाची काही भाकितेही वर्तविली गेली होती. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच देशाने ७.८० टक्के एवढा सकल देशांतर्गत उत्पादनवाढीचा दर साध्य करून आर्थिक संकटाची सारी भाकिते फोल ठरवली आहेत.

असाध्य ते साध्य करण्याच्या या प्रयत्नांत अनेक अडथळे आले, खोटी भाकिते वर्तवून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्नदेखील झाला, पण देशाची सामूहिक ताकद आणि जनतेच्या लवचिक मानसिकतेमुळे हे प्रयत्नदेखील फोल ठरले असा या जीडीपी दराच्या नव्या भरारीचा स्पष्ट अर्थ आहे. जनतेने दाखवलेल्या सामूहिक ताकदीच्या बळावरच भारताने ही उल्लेखनीय प्रगती साध्य करून दाखविली असून देश पुन्हा प्रगतीच्या मोठ्या भरारीसाठी सिद्ध होत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. या यशाची नोंद घेताना पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा काटकसरीचे आवाहन देशाला केले आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी देशातील पर्यटनस्थळांना भेट द्यावी, दिमाखदार विवाह सोहळे देशातच साजरे करावेत, गरज नसेल तर सोनेखरेदी टाळावी असे सांगताना पुन्हा एकदा स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा नारा पंतप्रधानांनी दिला आहे. जनतेचा पाठिंबा असेल तर संकटातूनही संधीचे सोने करता येते हाच त्यांच्या आवाहनाचा आनंदसूर आहे.

खरे तर या संधीचे संकेत गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या एका आकडेवारीतूनच उमटताना दिसू लागले होते. परकीय चलनाच्या देशांतर्गत वाढीस चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एका विशेष सुविधेमुळे देशात परकीय चलनाचा अभूतपूर्व ओघ आला. गेल्या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत ७३ अब्ज डॉलर्सचे परकीय चलन देशाच्या तिजोरीत जमा झाले होते आणि त्यापैकी तब्बल ६५.४० अब्ज डॉलर्सची रक्कम अनिवासी भारतीयांकडून या सुविधेस मिळालेल्या प्रतिसादामुळे जमा झाली होती. भारताच्या आर्थिक स्थैर्यावरील वाढत्या विश्वासाच्या या संकेतामधूनच भविष्यातील भरारीच्या खात्रीची आणि संधीचे सोने करण्याच्या प्रयत्नांना उमेद देणारी बीजे रुजली होती. या योजनेच्या यशामुळे अनिवासी भारतीयांची ताकदही अधोरेखित झाली आणि भारतीय बँकिंग प्रणालीवरील त्यांचा विश्वासही प्रकट झाला होता. अपेक्षेहून कितीतरी अधिक वेगाने आपली बचत भारतामध्ये गुंतवून अनिवासी भारतीयांनी देशाच्या विकासाच्या प्रवासातील आपले कायमस्वरूपी आर्थिक आणि भावनिक हितसंबंध सिद्ध करून दाखविले होते. केवळ अकरा आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत ७३ अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठणे ही भारताने केलेली सर्वांत मोठी आणि जलद परकीय चलन उभारणी मोहीम ठरली आणि जागतिक आर्थिक क्षेत्रातील आव्हाने अभूतपूर्व असूनही भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट होत असल्याचे संकेतही त्यातून उमटले. या सकारात्मक वाढीचा थेट परिणाम देशाच्या अर्थस्थितीवर दिसणे सहाजिकच आहे. विदेशी गुंतवणूकदारांचा भारतावरील विश्वास अधिक दृढ झाला असून, देशांतर्गत उत्पादनाला आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. महागाई नियंत्रित ठेवत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यात देशाला यश येत आहे आणि जागतिक स्तरावर भारताची ही कामगिरी ‘आव्हानांचे रुपांतर संधीत’ (Turning challenges into opportunities) करण्याची क्षमता अधोरेखित करत आहे.

जागतिक संकटांच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या विविध आवाहनांस मिळालेल्या प्रतिसादाचे परिणाम आता स्पष्ट झाले आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ (Aatmanirbhar Bharat), ‘व्होकल फॉर लोकल’ (Vocal for Local) किंवा ‘डिजिटल क्रांती’ (Digital Kranti / Revolution), अशा अनेक योजनांचा स्वीकार करून जनतेने मोदी यांचे आवाहन आव्हान म्हणून स्वीकारले. त्यातूनच स्थानिक उद्योगांना बळ मिळाले, डिजिटल व्यवहारांमध्ये भारत जगात अव्वल ठरला आणि लघू तसेच मध्यम उद्योजक हा घटक अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनला. तरीही अशा सकारात्मक घडामोडी घडत असताना देशांतर्गत राजकारणात मात्र वेगळाच सूर पाहायला मिळतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच नकारात्मक सुरांचा धागा पकडून त्यास ‘झूठ की गूंज’ असे नाव दिले. देशाच्या आर्थिक प्रगतीकडे दुर्लक्ष करून विरोधकांकडून नकारात्मकता पसरवली जात असल्याची भावना त्यांच्या या टीकेतून व्यक्त झाली आहे. पण, देशाच्या आर्थिक यशाकडे राजकीय चष्म्यातून न पाहता खिलाडूपणाने वस्तुस्थिती स्वीकारणे गरजेचे आहे. राष्ट्रीय उत्पन्नवाढीच्या या उंचावलेल्या आलेखाने हाच संदेश दिला आहे.