India GDP Growth Forecast 2026-27 : जागतिक अर्थव्यवस्थेच्या पटलावर सध्या अनेक विकसित देशांची अवस्था डळमळीत असताना, भारताने मात्र आपल्या आर्थिक प्रगतीचा झेंडा अत्यंत अभिमानाने आणि दिमाखात फडकत ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘जागतिक आर्थिक आउटलुक’ अहवालात भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत नोंदवलेले निरीक्षण केवळ आश्वासकच नाही, तर देशाच्या धोरणात्मक आणि आर्थिक वाटचालीवर जागतिक स्तरावर शिक्कामोर्तब करणारे आहे. आयएमएफने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताचा विकासदर ६.४ टक्क्यांवरून वाढून थेट सात टक्के राहील, असा सुधारित व अत्यंत सकारात्मक अंदाज वर्तविला आहे. प्रस्तुत वाढ केवळ कागदावरील आकड्यांचा खेळ नव्हे, तर जागतिक मंदीच्या आणि अस्थिरतेच्या गडद सावटात भारतीय अर्थव्यवस्थेने दाखवलेल्या अभूतपूर्व लवचिकतेचे आणि कणखरतेचे आश्वासक ठळक प्रतीक आहे. महासंकटांनंतर डबघाईला आलेल्या जागतिक व्यवस्थेत भारताने स्वत:ला ज्या वेगाने सावरले आहे, त्याचीच ही फलश्रुती आहे!
या वाढीव अंदाजामागे प्रामुख्याने दोन अत्यंत भक्कम कारणे नाणेनिधीने स्पष्टपणे अधोरेखित केली आहेत; ती म्हणजे देशांतर्गत पातळीवर असलेली मजबूत मागणी आणि सेवा क्षेत्रातील सातत्यपूर्ण व दमदार कामगिरी! भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात ‘देशांतर्गत मागणी’ हाच अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असतो आणि हेच आपले सर्वांत मोठे सामर्थ्य आहे. जेव्हा जागतिक पातळीवर निर्यातीला फटका बसतो किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठा थंडावतात, तेव्हा हाच कणा अर्थव्यवस्थेला तारून नेतो. अलीकडच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांच्या क्रयशक्तीत झालेली लक्षणीय वाढ, सण-उत्सवांच्या काळात बाजारपेठेत आलेली मोठी तरलता आणि चांगल्या पावसामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत परतत असलेली उभारी यामुळे देशांतर्गत मागणीत मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या मागणीला पुरवठ्याची योग्य जोड देण्यात आपले उद्योग क्षेत्र यशस्वी ठरत आहे. दुसरीकडे, भारताचे ‘सेवा क्षेत्र’ नेहमीच अर्थव्यवस्थेचे विश्वासार्ह इंजिन राहिले आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी), बँकिंग, वित्तीय सेवा, आदरातिथ्य, आरोग्य सेवा आणि पर्यटन या क्षेत्रांनी कात टाकली असून, यातून मोठ्या प्रमाणावर कुशल रोजगार आणि भरघोस परकीय चलन देशात येत आहे. जगातील अनेक बड्या कंपन्यांची केंद्रे भारतात उघडली जात आहेत. सेवा क्षेत्रातील या अफाट विस्ताराने विकासदराच्या आलेखाने वरची दिशा भक्कमपणे पकडली आहे.
सांप्रत युरोपातील अनेक प्रगत देश मंदीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. चीनसारख्या महासत्तेचा आर्थिक वेग मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतही अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. अशा जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताचा सात टक्के विकासदर हा जगासाठी एक आशेचा मोठा किरण ठरतो आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत ही आज सर्वाधिक पसंतीची, पारदर्शक आणि सुरक्षित बाजारपेठ बनली आहे. पायाभूत सुविधांवर (इन्फ्रास्ट्रक्चर) सरकारकडून होत असलेला प्रचंड भांडवली खर्च आणि विविध महत्त्वाकांक्षी मोहिमांचे जमिनीवर दिसू लागलेले दृश्य परिणाम यामुळे अर्थव्यवस्थेच्या गतीला एक प्रकारची ‘संजीवनी’ मिळाली आहे. जेव्हा रस्ते, महामार्ग, रेल्वे, आणि बंदरांसारख्या महाकाय प्रकल्पांवर अब्जावधी रुपये खर्च होतात, तेव्हा तो पैसा केवळ सिमेंट-पोलाद उद्योगालाच चालना देत नाही, तर तळागाळातील हजारो मजुरांच्या हातांनाही थेट काम देतो, ज्यामुळे अर्थचक्राला प्रचंड वेगवान गती मिळते. असे असले तरी, या आशादायक आणि सोनेरी चित्रावर हुरळून न जाता वास्तवाचे भान राखणेही तेवढेच गरजेचे आहे.
विकासदराचा हा आकडा सात टक्क्यांवर पोहोचत असतानाच, या राष्ट्रीय पातळीवरील वाढीचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत झिरपत आहे का, हा खरा कळीचा आणि धोरणकर्त्यांना विचार करायला लावणारा प्रश्न आहे. महागाई, विशेषत: अन्नधान्याची व जीवनावश्यक वस्तूंची महागाई आजही सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी ठरत असते; त्यावर शाश्वत नियंत्रण मिळविणे हे रिझर्व्ह बँक आणि सरकारपुढील सर्वांत मोठे आव्हान कायम आहे. शिवाय, रोजगाराच्या वाढत्या संधी आणि वाढता विकासदर यात नेहमीच समप्रमाण असते, असे नाही. ‘रोजगारहीन वाढी’चा धोका कायमचा टाळायचा असेल, तर केवळ सेवा क्षेत्रावर अवलंबून न राहता ‘मॅन्युफॅक्चरिंग’ (उत्पादन) क्षेत्राला आणि लघु उद्योगांना अधिक बळकट करण्याची नितांत आवश्यकता आहे. जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव आणि मध्यपूर्वेतील संघर्ष या बाह्य धोक्यांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेला सुरक्षित ठेवण्यासाठी सावधगिरी बाळगावीच लागेल.
असो. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेला सात टक्के विकासदराचा अंदाज हा भारताच्या अंगभूत आर्थिक क्षमतेवरील जागतिक विश्वासाचे आश्वासक चित्र आहे. प्रस्तुत आंतरराष्ट्रीय विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सरकारने आर्थिक सुधारणांचा वेग कायम ठेवणे, प्रशासकीय पारदर्शकता अधिक वाढवणे आणि खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. देशांतर्गत मागणी आणि सेवा क्षेत्राच्या जोरावर मिळालेली ही विकासाची गती जर कृषी आणि उत्पादन क्षेत्राच्या भक्कम साथीने अशीच पुढे गेली, तर भारतीय अर्थव्यवस्था केवळ जागतिक संकटांना पुरून उरणार नाही, तर नजीकच्या भविष्यात ती खऱ्या अर्थाने जागतिक अर्थव्यवस्थेचे भक्कम नेतृत्व करेल. विकासाची ही मधुर फळे समाजातील तळागाळापर्यंत पोहोचली आणि गरिबांचे जीवनमान उंचावले, तरच या ‘सात टक्क्यांच्या’ आकड्याला खऱ्या अर्थाने मानवी चेहरा प्राप्त होईल.
Read About : Maharashtra Drought 2026 : महाराष्ट्राच्या दुष्काळझळा!!
E-Paper : Punyanagari E-Paper
India GDP Growth Forecast 2026-27 – आश्वासक अर्थझेप!


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.