Ad Advertisement Ad Advertisement

India Milk Production : दूध उत्पादनात भारताचा जागतिक डंका कायम; दशकात 69.41 टक्क्यांची विक्रमी वाढ

जागतिक दूध उत्पादनात भारताचा जवळपास २५ टक्के वाटा; २०२४-२५ मध्ये उत्पादन २४७.८७ दशलक्ष टनांवर

नवी दिल्ली : India Milk Production जागतिक स्तरावर सर्वाधिक दूध उत्पादन घेणारा देश म्हणून भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील दूध उत्पादनात ६९.४१ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली असून, २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण दूध उत्पादन २४७.८७ दशलक्ष टनांवर पोहोचले आहे. २०१४-१५ मध्ये हे उत्पादन १४६.३१ दशलक्ष टन इतके होते.

जगातील एकूण दूध उत्पादनापैकी जवळपास एक चतुर्थांश वाटा एकट्या भारताचा आहे. गेल्या दशकात भारताच्या दूध उत्पादनाने ५.४१ टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर नोंदवला आहे. देशातील प्रति व्यक्ती प्रतिदिन दूध उपलब्धता ५२.०३ टक्क्यांनी वाढून २०२४-२५ मध्ये ४८५ ग्रॅम झाली आहे. २०१४-१५ मध्ये हे प्रमाण ३१९ ग्रॅम इतके होते. जनावरांच्या सरासरी दूध देण्याच्या क्षमतेत ६९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये प्रति जनावर वार्षिक दूध उत्पादन १,६४० किलो होते, ते २०२४-२५ मध्ये २,८०० किलोवर पोहोचले आहे.

अग्रगण्य उत्पादक राज्ये

देशाच्या एकूण दूध उत्पादनात उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या पाच राज्यांचा एकत्रित वाटा ५४.०९ टक्के आहे. यामध्ये १५.६६ टक्के वाट्यासह उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. दुग्धव्यवसाय क्षेत्रामुळे देशातील ८.५ कोटी ग्रामीण कुटुंबांना उपजीविकेचे साधन मिळाले आहे. विशेष म्हणजे, या क्षेत्रातील एकूण मनुष्यबळात महिलांचा वाटा तब्बल ७० टक्के आहे.

सहकारी संस्थांचे मजबूत जाळे

भारताच्या दुग्ध सहकारी जाळ्यामध्ये २२ दूध महासंघ, २४१ जिल्हा सहकारी दूध संघ, २८ विपणन डेअरी आणि २५ मिल्क प्रोड्युसर ऑर्गनायझेशन्स यांचा समावेश आहे. हे जाळे सुमारे २.४५ लाख गावे आणि १.६५ कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे.

राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या डेअरी सर्व्हिसेसने ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत २५ एमपीओची यशस्वी स्थापना केली असून, १२ राज्यांतील १७५ जिल्ह्यांमधील १३ लाखांहून अधिक दूध उत्पादक याच्याशी जोडले गेले आहेत. या २५ संस्थांपैकी १८ संस्था पूर्णपणे महिलांद्वारे चालवल्या जातात आणि त्यांच्या संचालक मंडळावरही सर्व महिला उत्पादकच कार्यरत आहेत.

Read About : Gokul milk price hike in Kolhapur – गोकुळच्या म्हशीच्या दुधात सहा, तर गाईच्या दुधात चार रुपयांची वाढ!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.