Ad Advertisement Ad Advertisement

Microsoft Rocket AI Training System – एआय मॉडेल्सच्या प्रशिक्षणासाठी मायक्रोसॉफ्टची ‘रॉकेट’ प्रणाली विकसित

दीर्घकाळ चालणाऱ्या एआय प्रशिक्षणातील तांत्रिक अडथळे दूर होणार; ३ ट्रिलियन पॅरामीटर क्षमतेच्या MAI Base 2 मॉडेलसाठी वापर

नवी दिल्ली : Microsoft Rocket AI Training System इतर कंपन्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल्सवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्वत:ची प्रगत एआय मॉडेल्स अधिक सक्षम करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देण्यासाठी रॉकेट नावाची स्वत:ची रीइन्फोर्समेंट लर्निंग प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या मदतीने अधिक मोठ्या प्रमाणावर आणि दीर्घकाळ एआय मॉडेल्सना प्रशिक्षण देणे शक्य होणार आहे.

मायक्रोसॉफ्ट एआयने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेट प्रणाली हजारो जीपीयू वापरून अनेक आठवडे किंवा महिने चालणाऱ्या प्रशिक्षण प्रक्रियेला सहज हाताळू शकते. दीर्घकाळ चालणाऱ्या प्रशिक्षणात लहान तांत्रिक त्रुटी आणि गणनातील विसंगतींमुळे प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात. हीच अडचण दूर करण्यासाठी कंपनीने रॉकेटची निर्मिती केली आहे. सध्या मायक्रोसॉफ्ट आपल्या तीन-ट्रिलियन-पॅरामीटर क्षमतेच्या एमएआय बेस २ या मुख्य मॉडेलला प्रशिक्षित करण्यासाठी या प्रणालीचा वापर करत आहे.

इतर कंपन्यांच्या मॉडेल्सवर अवलंबित्व नाही

विशेष म्हणजे, मायक्रोसॉफ्ट हे मॉडेल कोणत्याही त्रयस्थ कंपनीच्या मॉडेलकडून माहिती हस्तांतरित न करता, अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून स्वत: विकसित करत आहे. याबाबत मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी सोशल मीडियावर माहिती देताना सांगितले की, ग्राहकांसाठी एआय अधिक कार्यक्षम बनवण्यावर कंपनीचा भर आहे. खर्चाच्या तुलनेत मिळणारा सर्वोत्तम परिणाम हेच आमचे मुख्य ध्येय आहे. एआय मॉडेल्स आणि उत्पादने एकत्रितपणे विकसित केल्याने कार्यक्षमता सुधारेल आणि त्याचा थेट फायदा ग्राहकांना मिळेल, असे नडेला यांनी नमूद केले.

तांत्रिक अडथळ्यांवर मात करणारी प्रणाली

हजारो जीपीयूवर महिने चालणाऱ्या प्रशिक्षणात हार्डवेअर बिघाड किंवा गणनातील फरक यांसारखी आव्हाने येतात. मात्र, रॉकेट प्रणालीमध्ये अशी रचना करण्यात आली आहे की, हार्डवेअरमध्ये बिघाड झाल्यास संपूर्ण प्रशिक्षण पुन्हा सुरू न करता, उपलब्ध संगणकीय संसाधनांचा वापर करून प्रक्रिया पुढे सुरू ठेवता येते.

स्पर्धक मॉडेल्सना टाकले मागे

रॉकेट प्रणालीमुळे मायक्रोसॉफ्टच्या एआय मॉडेल्सच्या तर्कक्षमतेत मोठी सुधारणा झाली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, त्यांच्या मॉडेलने अलीकडेच क्लॉड ओपस ४.८ या मॉडेलला मागे टाकले असून, येत्या काही आठवड्यांत ते जीपीटी-५.६ सोल लाही मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. आगामी काळात अधिक गुंतागुंतीची कामे आणि मोठ्या एआय प्रणाली विकसित करण्यासाठी रॉकेटमध्ये आणखी सुधारणा केल्या जातील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Read About : Tapas-1 Satellite : अंतराळातून मोजणार पृथ्वीचा ताप; भारतीय स्टार्टअपची महत्त्वाकांक्षी मोहीम
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.