Pankaj Tripathi Mirzapur : अवघ्या काही दिवसांत १५० कोटींचा टप्पा पार
नवी दिल्ली : ओटीटीवर प्रचंड गाजलेल्या ‘मिर्जापूर’ या लोकप्रिय वेबसिरीजच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर कमाई करत धमाकेदार कामगिरी केली आहे. ४ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिर्जापूर: द मूवी’ ( Mirzapur The Movie) अवघ्या सहा दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर १५० कोटी रुपयांहून अधिक कमाईचा टप्पा ओलांडला आहे. २०१८ मध्ये सुरू झालेली ‘मिर्जापूर’ची कथा आणि पात्रांची लोकप्रियता आता मोठ्या पडद्यावरही कायम असल्याचे या कमाईवरून स्पष्ट होत आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर ‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३०.९० कोटींची बंपर कमाई केली. यानंतर शनिवारी ३८.४ कोटी आणि रविवारी ४३.०५ कोटींची कमाई करत पहिल्या वीकेंडलाच १०० कोटींचा गल्ला जमवला. सध्या या चित्रपटाचे एकूण भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शन १५०.३२ कोटी रुपये झाले आहे.
चित्रपटाची कथा २०१८ च्या पहिल्या सीझनच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यात पंकज त्रिपाठी (कालीन भैया), अली फझल (गुड्डू पंडित), दिव्येंदू (मुन्ना भैया), रसिका दुग्गल, श्रिया पिळगावकर, श्वेता त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी आपल्या जुन्या भूमिकांमध्ये दिसत आहेत.
