Ad Advertisement Ad Advertisement

MSCI India Standard Index : परदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधणारा निर्देशांक

MSCI India Standard Index : भारतीय शेअर बाजाराची व्यापक दिशा आणि विविध क्षेत्रांमधील गती समजून घेण्यासाठी काही जागतिक निर्देशांक महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आज मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल (एमएससीआय) इंडिया स्टँडर्ड इंडेक्स बाबत जाणून घेणार आहोत.
शेअर बाजाराची दिशा, त्यातील चढ-उतार आणि विविध क्षेत्रांची कामगिरी समजून घेण्यासाठी निर्देशांक महत्त्वाची भूमिका बजावतात. सेन्सेक्स आणि निफ्टी हे भारतीय गुंतवणूकदारांसाठी परिचित निर्देशांक असले, तरी भारतीय भांडवली बाजाराकडे आता जागतिक गुंतवणूकदारांचेही बारकाईने लक्ष आहे. त्यामुळे भारतीय बाजाराचे जागतिक पातळीवरील प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्देशांकांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
यापैकी एक ‘मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल (एमएससीआय) इंडिया स्टॅंडर्ड इंडेक्स’बाबत आजच्या लेखात विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न राहणार आहे. जेणेकरून छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांना स्वत:च्या पोर्टफोलिओकडे अभ्यासपूर्ण नजरेने पाहता येईल.

शेअर बाजाराची स्थिती आणि विविध (सेक्टर) क्षेत्रातील गती समजून येण्यासाठी निर्देशांकांचा उपयोग होत असतो. भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक (सेन्सेक्स आणि निफ्टी) काही प्रमुख कंपन्यांच्या शेअर किमती मधील बदल आणि शेअर खरेदी-विक्रीच्या एकूण आकडेवारीच्या आधारे बाजार स्थितीबाबत गुंतवणूकदारांना संकेत देत असतात. पण, भारतीय शेअर बाजाराचा आवाका केवळ देशांतर्गत गुंतवणूकदारांपुरता मर्यादित राहिलेला नाही.

जागतिक गुंतवणूकदारांच्या नजरादेखील भारतीय अर्थव्यवस्थेकडे आणि येथील भांडवली बाजाराकडे सातत्याने वळत आहेत. अशा वेळी भारतीय शेअर बाजाराची व्यापक दिशा आणि विविध क्षेत्रांमधील गती समजून घेण्यासाठी काही जागतिक निर्देशांक महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच आज मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल (एमएससीआय) इंडिया स्टँडर्ड इंडेक्स बाबत जाणून घेणार आहोत. एमएससीआय इंडिया स्टँडर्ड इंडेक्स हा मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल (एमएससीआय) ने तयार केलेला निर्देशांक आहे. यामध्ये भारतीय शेअर बाजारात सुचिबद्ध (लिस्टेड) असलेल्या मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचा समावेश आहे. हा निर्देशांक परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजाराच्या स्थितीची व्यापक झलक देतो.

एमएससीआय च्या माहितीनुसार हा निर्देशांक भारतीय इक्विटी विश्वाच्या सुमारे ८५ टक्के भागाचे प्रतिनिधित्व करतो. या निर्देशांकात मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनलने ठरवलेल्या निकषांवर कंपन्यांचा समावेश होतो. निर्देशांकात दर तीन महिन्यांनी (फेब्रुवारी, मे, ऑगस्ट आणि नोव्हेंबर) समाविष्ट असणाऱ्या कंपन्यांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. प्रामुख्याने कंपन्यांचा वाढता व्यवसाय विस्तार, वाढते बाजारमूल्य, फ्री-फ्लोट आणि तरलता (लिक्विडिटी) पाहून निर्देशांकात सहभागी करून घेण्यात येते. त्यामुळे काही कंपन्यांचा निर्देशांकात समावेश होत असताना काही कंपन्या वगळल्या जातात. थोडक्यात, परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजारातील बदलत्या व्यावसायिक आणि गुंतवणूक प्रवाहाची माहिती ‘एमएससीआय इंडिया स्टॅंडर्ड इंडेक्स’ द्वारे प्राप्त होते.

भारतीय शेअर बाजारात सुचिबद्ध असणाऱ्या कंपन्यांचा निर्देशांकातील समावेश छोट्या गुंतवणूकदारांना महत्त्वाचे संकेत देत असतो. भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा (गुंतवणूक) कल कोणत्या कंपन्या आणि क्षेत्रांकडे वळू शकतो, याचा काही अंशी अंदाज या बदलांमधून घेता येतो. मात्र येथे एक महत्त्वाची मर्यादा लक्षात घेणे आवश्यक आहे. या निर्देशांकात समावेश झालेल्या कंपनीचे शेअर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची हमी देता येत नाही. पण भारतीय रिटेल गुंतवणूकदारांना निर्देशांकात नव्याने समाविष्ट होणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय विस्तार, क्षेत्रातील स्थान, बाजारमूल्य, नफ्यातील सातत्य यांचा अभ्यास करता येतो. त्यादृष्टीने निर्देशांकातील मागील नऊ महिन्यात (तीन वेळा) झालेले बदल नमूद करत आहोत.

‘एमएससीआय इंडिया स्टॅंडर्ड इंडेक्स’ निर्देशांकात नोव्हेंबर २०२५ मध्ये सहा कंपन्यांचा समावेश – मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनल च्या अधिकृत माहितीनुसार फोर्टिस हेल्थकेअर लिमिटेड, एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड (नायका), जीई वर्नोव्हा टी अँड डी लिमिटेड, इंडियन बँक, वन ९७ कम्युनिकेशन्स (पेटीएम) आणि सीमेन्स एनर्जी इंडिया लिमिटेड या सहा कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. त्याच वेळी एस्ट्रल लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि टाटा इलेक्सी यांना वगळण्यात आले. त्यावेळेस परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ओघ आरोग्यसेवा, ई-कॉमर्स, ऊर्जा, बँकिंग, डिजिटल वित्तीय सेवा आणि औद्योगिक क्षेत्र यांसारख्या विविध क्षेत्रात दिसून येत होता.

‘एमएससीआय इंडिया स्टॅंडर्ड इंडेक्स’ निर्देशांकात मे २०२६ मध्ये पाच कंपन्यांचा समावेश आहे. मॉर्गन स्टॅनली कॅपिटल इंटरनॅशनलच्या अधिकृत माहितीनुसार निर्देशांकात मे २०२६ मध्ये अदानी एनर्जी सोल्युशन्स, फेडरल बँक, इंडियन बँक, मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया आणि नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी या कंपन्यांचा समावेश करण्यात आला. त्याच वेळी ह्युंदाई मोटर इंडिया, ज्युबिलंट फूडवर्क्स, कल्यान ज्वेलर्स इंडिया आणि रेल विकास निगम या कंपन्यांना निर्देशांकातून वगळण्यात आले. आता ऑगस्ट २०२६ मध्ये लॉरस लॅब्स लिमिटेड, लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेड, अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड आणि बिलियनब्रेन्स गॅरेज व्हेंचर्स लिमिटेड (ग्रोव) यांचा निर्देशांकात समावेश झाला आहे.

ॲस्ट्रल लिमिटेड, बाळकृष्ण इंडस्ट्रीज आणि एसबीआय कार्ड आणि पेमेंट सेवा यांना निर्देशांकातून वगळण्यात आलेे. निर्देशांकात नव्याने समावेश करून घेण्यात आलेल्या चार कंपन्यांपैकी ‘लॉरस लॅब्स लिमिटेड’ ही औषधनिर्मिती क्षेत्रातील कंपनी आहे. तिच्या शेअर किमतीत वर्षभरात ११८% वाढ झाली आहे. कंपनीच्या एकूण आर्थिक उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. ‘लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेड’ ही चष्मे उत्पादन आणि विक्रीत अग्रेसर आहे. कंपनीच्या शेअर किमतीत मागील तीन महिन्यात ४०% वाढ झाली आहे. ग्राहककेंद्रित व्यवसाय असल्यामुळे कंपनीच्या एकूण आर्थिक उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. ‘अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड’ ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर आहे. कंपनीच्या शेअर किमतीत वर्षभरात ७४% वाढ झाली आहे. भारताच्या वाढत्या ऊर्जा गरजा आणि पायाभूत सुविधांच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या एकूण आर्थिक उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. भारतात ऑनलाइन गुंतवणूक प्लॅटफॉर्मचा वापर वाढत असल्यामुळे कंपनीचे एकूण आर्थिक उत्पन्न वाढत आहे. थोडक्यात, या निर्देशांकातील कंपन्यांच्या यादीत दर तीन महिन्यांनी फेरबदल होतात. या बदलांकडे केवळ निर्देशांकातील फेरबदल म्हणून न पाहता, शेअर बाजारातील बदलता जागतिक गुंतवणूक प्रवाह समजून घेण्याचा महत्त्वाचा संदर्भ म्हणून पाहावे.

कौस्तुभ खोरवाल

Read About : Mumbai Goa Highway Delay : अशी ही बिकट वाट…
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.