मान्सूनची लवकर माघार, निरभ्र आकाश आणि वाढते तापमान यांचा परिणाम; शेती, पाणी आणि आरोग्याची काळजी घेण्याची गरज
पुणे : October Heat 2026 सध्या घराबाहेर पडल्यावर काय वाटतंय? ऑक्टोबर महिना चालू आहे की मे महिन्याचा उन्हाळा? घामाच्या धारा, अंगाची लाहीलाही आणि कडक ऊन यामुळे सर्वजण त्रस्त झाले आहेत. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये थोडी उष्णता असते, त्याला आपण ‘ऑक्टोबर हिट’ म्हणतो. पण यंदाचा ऑक्टोबर मागच्या काही वर्षांपेक्षा खूप जास्त उष्ण आहे. रात्रीही गरम होतंय आणि पंखे-एसी पूर्ण वेगाने चालवावे लागत आहेत. निसर्ग अचानक असा का बदलला? आपण काय चुका करतोय आणि आता काय काळजी घेतली पाहिजे? वाचा हा स्पेशल रिपोर्ट..
मित्रांनो, यंदा तापमान वाढण्यामागे मुख्य कारण म्हणजे ‘अल निनो’चा प्रभाव आणि जागतिक तापमानवाढ. यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतातील अनेक शहरांचे तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. महाराष्ट्रातही तेच चित्र आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाचे तापमान ३ ते ४ अंशांनी जास्त आहे. २०२३-२०२४ मध्ये सरासरी तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस होते. अधूनमधून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे हवेत थोडा गारवा होता. यंदा (२०२६) मध्ये परतीचा पाऊस खूप लवकर गायब झाला.त्यामुळे आकाश अगदी निरभ्र आहे. थेट पडणारी सूर्यकिरणे जमिनीला भट्टीसारखी तापवत आहेत. यामुळे मागच्या ३ वर्षांच्या सरासरीपेक्षा यंदाचे तापमान तब्बल २ ते ३ अंशांनी जास्त आहे.
ऑक्टोबर मधील हिट पाहिल्यावर अनेकांना प्रश्न पडला आहे येणारा हिवाळा कसा असेल?
हवामान तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबरमधील या अतिउष्णतेमुळे यंदा हिवाळा उशिरा सुरू होऊ शकतो. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत कडक थंडीची शक्यता कमी आहे. पण जेव्हा हिवाळा सुरू होईल, तेव्हा कडाक्याची थंडी पडू शकते. म्हणजेच, हवामानातील तीव्र बदल आपल्याला पाहायला मिळतील.
वाढत्या उष्णतेचा पिके, माणसं आणि निसर्गावर काय परिणाम होत आहे.
सुरुवातीला पिकांवर परिणाम पाहू: हा काळ खरीप पिकांच्या काढणीचा आणि रब्बीच्या पेरणीचा असतो. अति उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा संपत आहे. आधीच पावसाअभावी खरिपाची पिके अनेक ठिकाणी जळाली आहेत. जिथे थोडेफार पाणी शिल्लक आहे, तेथील सोयाबीन, कापूस या पिकांना ऑक्टोबर हिटचा फटका बसतोय. ऑक्टोबर संपल्यानंतर ही हिट कमी झाली नाही तर नवीन पेरलेले रब्बीच्या पिकांचे अंकुर जळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
माणसांवर परिणाम: उष्णतेमुळे डिहायड्रेशन, उष्माघात, चक्कर येणे आणि त्वचेचे आजार वाढले आहेत. सतत येणाऱ्या घामामुळे अनेकांना थकवा जाणवतो आहे.
निसर्गावर परिणाम: आधीच पाऊस कमी झाल्यामुळे अनेक धरणे तलाव पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. त्यात उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.जलस्रोत वेगाने आटत आहेत. पक्षी आणि प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. झाडांची पाने अकाली गळू लागली आहेत.
अनेक जण याला निसर्गाचा कोप म्हणतील. पण प्रत्यक्षात निसर्ग स्वतःहून बदललेला नाही, त्याला आपण बदलण्यास भाग पाडले आहे. आपल्या काही मोठ्या चुका आपल्याला नडल्या आहेत.
आपण झाडे तोडून सिमेंटचे रस्ते आणि इमारती उभ्या केल्या. सिमेंट उष्णता शोषून घेते आणि परिसर जास्त तापतो. गाड्या आणि कारखान्यांचा धूर हवेत कार्बन डायऑक्साइड वाढवत आहे.घरात थंडावा मिळवण्यासाठी आपण जे एसी वापरतो, ते बाहेरच्या वातावरणात प्रचंड उष्णता सोडतात.
या उष्णतेपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही गोष्टी नक्की करा.सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अत्यंत महत्त्वाचे काम नसेल तर उन्हात जाणे टाळा.शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. लिंबू पाणी, ताक, आणि नारळ पाणी प्या.
सुती आणि सैल कपडे वापरा.
- बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल आणि डोळ्यांवर गॉगल नक्की वापरा.
- मित्रांनो केवळ स्वतःची काळजी घेऊन जमणार नाही, पृथ्वीलाही वाचवावे लागेल.
- त्यासाठी झाडे लावा: आपल्या घराभोवती, गावात, शहरात जास्तीत जास्त झाडे लावा आणि सर्वात महत्त्वाचे ती जगवा.
- पाणी वाचवा: पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरा.ऊर्जा बचत: गरज नसताना पंखे, दिवे आणि एसी बंद ठेवा. सार्वजनिक वाहनांचा वापर करा.
- वाढलेली ‘ऑक्टोबर हिट’ आपल्याला एकच गंभीर इशारा देत आहे,जर आपण आताच सुधारलो नाही, तर येणारा काळ याहून भयानक असेल. निसर्ग आपल्याला सुधारण्याची संधी देत आहे. आज आपण निसर्गाचा आदर केला, तरच निसर्ग उद्या आपले रक्षण करेल. विचार करा, आपण आपल्या येणाऱ्या पिढीला काय देणार आहोत,उष्णतेची भट्टी की हिरवीगार पृथ्वी? निर्णय आपला आहे.
Read About : Nepal Landslide Video : काही सेकंदांत संपूर्ण डोंगरकडा कोसळला; झाडे आणि घरे ढिगाऱ्यात
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.