Ad Advertisement Ad Advertisement

Why Humans Swear : शिव्यांची लाखोली

Why Humans Swear : मानवी उत्क्रांतीमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे भाषा विकसित झाल्या तसे दुसऱ्या कुणावर शस्त्र फेकून मारण्याऐवजी ‘शब्द फेकून’ मारण्याची अटकळ मानवाला समजली आणि शब्द हे शस्त्रापेक्षा जास्त जखमी करू शकतात याचा बोध झाला.

कागा कासो लेत है? कोयल कासो देत?
तुलसी मिठे वचनसे जग अपनो करी लेत


असे हे संत तुलसीदासांचे वचन सांगते की, कावळ्याने बिचाऱ्याने कुणाकडून काही घेतले नि ते परत वगैरे केले असे काहीच झाले नाही तरी देखील तो बिचारा लोकांची नाराजी सहन करतो, त्या उलट कोकिळा कुणाला मदत करत नाहीच, कुणाला काही देतदेखील नाही, परंतु ती मात्र सगळ्यांच्या प्रशंसेस नेहमी पात्र ठरते. केवळ वाणीतील गोडवा हेच त्यामागचे कारण असते असे संत तुलसीदास आपल्या दोह्यातून स्पष्ट करतात.

असाच एक प्रसंग आठवतो.
सन ६०६ मध्ये जन्मलेले संस्कृत महाकवि बाणभट्ट म्हणजे उणीपुरी ४१ वर्षांची यशोगाथा. त्याला वैयाकरण आणि पुलिन्द भट्ट लाभले. आपला अंत:काळ जवळ आल्याची जाणीव झाली आणि अर्धा पूर्ण झालेला ‘कादंबरी’ नावाचा आपला ग्रंथ अपूर्ण राहील की काय अशी काळजी त्यास वाटू लागली. त्यावेळी त्याच्या पत्नीने त्यास हे कार्य त्याचे पुत्र पूर्ण करतील याची ग्वाही दिली. कोणत्या पुत्राची यासाठी निवड करावी या विचारात असताना घरासमोर उन्मळून पडलेल्या एका झाडाकडे त्याचे लक्ष गेले. दोन्ही पुत्रांना एकत्र बोलावून त्याने त्या झाडाचे वर्णन कमीत कमी शब्दांत करायला सांगितले.

त्यावर वैयाकरण याने लिहिले – शुष्को काष्ठं स्तिष्ठत्यग्रे। (वाळलेले लाकूड तिष्ठत पडलेले आहे). तर दुसरा पुत्र पुलिन्द भट्ट लिहितो – नीरस तरुरिह विलसति पुरत:। (नीरस म्हणजे ज्यातून रस निघून गेलेला आहे, असा तरुवर जणू विलासमान होऊन विराजीत झालेला आहे)

दोन्ही वाक्यांचे अर्थ जवळजवळ सारखेच, परंतु त्यातले सौंदर्य सौष्ठव मात्र अगदीच भिन्न. एक वस्तुस्थितीचे जशास तसे वर्णन, तर दुसरे वाक्य मात्र केवळ कानालाच नव्हे तर मनालादेखील प्रफुल्लित करणारे. भाषेची विशेषत: शब्द निवडण्यातली सूचकता त्या वाङ्मयास उंचीवर नेतात. अर्थातच, हे सर्व समजून उमजून बाणभट्टाचा ‘कादंबरी’ हा त्याच्या कोणत्या पुत्राने पूर्ण केला हे सुजाण वाचकहो तुम्हीच सांगा.
वाणीचे माधुर्य कसे टिकवावे आणि रागावर नियंत्रण कसे आणावे याच्या अनेक गोष्टी संत एकनाथांचे चरित्र वाचताना समजतात. परंतु, हे सर्वांनाच साधते असे नाही. रागावर नियंत्रण राहिले नाही की त्याचे प्रकटीकरण वाणीतून निपजते आणि मुखावाटे शिव्यांची लाखोली सुरू होते.
प्राणी व वनस्पती यांचीदेखील भाषा असते परस्पर संवादासाठी, ते आनंदून जातात, दु:खीदेखील होतात; हे सर्व विज्ञानानेदेखील सिद्ध झाले आहे. हे वैज्ञानिक तथ्य भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी १९०१ मध्येच यंत्राद्वारे मांडले.

तर मग माणसे आणि इतर म्हणजे प्राणी, वनस्पती यांच्यात फरक तो कोणता? माझ्या मते ‘शिव्यांची अभिव्यक्ती’ हा एकच फरक आढळतो. माणसे शिव्या का देतात आणि माणसांनी शिव्या द्यायला नेमकी केव्हा सुरुवात केली यावर मानववंशशास्त्रज्ञ काय म्हणतात? हा प्रश्न मी एआयला विचारला. त्यावर उत्तर आले की, ‘मानववंशशास्त्रज्ञ (Anthropologists) आणि भाषाशास्त्रज्ञांचे (Linguists) मत आहे की, शिव्यांची सुरुवात मानवी भाषेच्या निर्मितीसोबतच, म्हणजेच लाखो वर्षांपूर्वी झाली असावी.’ याशिवाय ‘शिव्या हा माणसाच्या उत्क्रांतीचा (Evolution) एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो,’ अशी टिपण्णीदेखील खाली दिली गेली. परंतु, हे खरे की मानवी उत्क्रांतीमधला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे भाषा विकसित झाल्या तसे दुसऱ्या कुणावर शस्त्र फेकून मारण्याऐवजी ‘शब्द फेकून’ मारण्याची अटकळ मानवाला समजली आणि शब्द हे शस्त्रापेक्षा जास्त जखमी करू शकतात याचा बोध झाला. शिव्यांची उत्पत्ती याच जाणिवेच्या साक्षात्कारातून बहरली.

माझा वर्गमित्र कल्याणहून पुण्यात शिकण्यास आला तेव्हा सुरुवातीला कुठे भांडण होताना दिसले की त्याला ते पाहण्यात खूप मजा वाटे. परंतु, अवघ्या काही वेळात तो कंटाळून जाई, ‘छे, पुण्यातले लोक नुसते तोंडाने भांडतात, मारामारी काही पहायलाच मिळत नाही.’ मुंबईतली धावपळ तिथे तशीच टाकून शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या त्याला पुण्यातले जीवन असे अळणी वाटू लागले, त्यावर त्याने पंधरवड्यातून एकदा मुंबईत जाऊन यायचे असा पर्याय शोधला.

शारीरिक झोंबाझोंबी तटस्थपणे दुरून पाहायला तशी करमणूकप्रधान. परंतु, मारामारी करण्यापर्यंत वेळच येवू न देण्याची सोय शाब्दिक शिव्या करतात. मेंदूचे दोन भाग, डावा आणि उजवा. डावा भाग जास्त संस्कारित मानला जातो, तर उजवा भाग म्हणजे उपजत भावभावनांचे भरगच्च कोठार. डाव्या भागातील सेरेब्रल कॉर्टेक्समुळे वागण्यात तारतम्य येत भावभावना संतुलित राहतात; तर उजव्या भागातील लिंबिक स्रोत (Limbic System) भावनांवरचे नियंत्रण सोडून तत्क्षणी कृती घडवून आणतात. हे करतानादेखील त्या विशिष्ट क्षणी हाती असलेली आयुधे व त्यांचा वापर याचे भान मात्र मेंदूतील हा उजवा भाग व्यवस्थित करतो. शिव्या देण्याचा क्षण मेंदूतील उजव्या भागाची जबाबदारी ठरते, त्यामुळे पृथ्वीतलावर भाषा कोणतीही असो, शिव्यांची लाखोली हे हत्यार म्हणून सर्व मानवजात वापरते हे खरे. लंडनमध्ये नोकरी करत असताना माझ्या सहकारी असलेल्या आणि गुजराती भारतीय आडनावे असलेल्या दोन अधिकारी स्त्रिया बोलताना त्यांच्या प्रत्येक वाक्यात ‘फ’ तथा ‘भ’काराच्या किमान दोन शिव्या तरी वापरत. त्यातल्या एकीची बदली झाली म्हणून सर्वांनी तिला निरोप देताना ‘ओह *** वुई आर लिव्हिंग यू’ अशा शीर्षकाची तसवीर भेट म्हणून दिली.

शिव्या देणे ही क्रिया फलदायी कसे हे पुढील भागात पाहू यात.

देवेंद्र रमेश राक्षे
संपर्क : ८३०८३०२४००

Read About : Trump Tariffs, Dollar Dominance and the Global Shift Toward Gold : डॉलर आणि अमेरिका, बायबाय?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.