इजिप्तमध्ये बस अपघातात १६ जण ठार, २८ जखमी

कैरो : इजिप्तमधील दक्षिण सिनाई भागात बस उलटल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २८ जण गंभीर जखमी झाले आहेत. दहाब-नुवेबा मार्गावर ही दुर्घटना घडली, अशी माहिती इजिप्तच्या आरोग्य आणि लोकसंख्या मंत्रालयाने दिली आहे.

ही बस नुवेबाच्या दिशेने जात असताना ‘अल-साडा’ परिसराजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलत घटनास्थळी तब्बल २० रुग्णवाहिका रवाना केल्या. जखमींना तातडीने प्रथमोपचार देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इजिप्तमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण वेगाने वाढत असून, याआधीही ऑगस्ट महिन्यात इस्माइलिया प्रांतामध्ये दोन वाहनांच्या धडकेत १८ ठार आणि ३० जण जखमी झाले होते.

सरकारी आकडेवारीनुसार, २०२५ या एका वर्षात इजिप्तमध्ये रस्ते अपघातांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत १०.८ टक्क्यांनी वाढ होऊन मृतांचा आकडा ५,८२९ वर पोहोचला आहे, तर ८४ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये १५ वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण सर्वाधिक असून, २०२५ मध्ये अपघातात १५८० मुलांचा जीव गेला आहे. वेगावर नियंत्रण नसणे आणि रस्ते सुरक्षेच्या अभावामुळे इजिप्तमधील रस्ते वाहतूक प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनत चालली आहे.