अन्य दोन जण गंभीर जखमी
गुवाहाटी : आसाममधील कामरूप जिल्हयात पोलीस चौकीत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच सहकाऱ्यांवर एके-४७ रायफलमधून अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेत आसाम पोलिसांच्या दोन जवानांचा मृत्यू झाला असून, अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बोको पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गामेरीमुरा पोलीस चौकीत घडला.
मृत पोलिसांची ओळख फजरुल अली आणि इंद्रजीत बोरा अशी झाली असून, इंद्रजीत हे चौकीचे प्रभारी अधिकारी होते. चिरंजीव चौधरी नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने हा गोळीबार केला. गोळीबाराचे नेमके कारण आणि त्यामागचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. पोलीस अधिकारी प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील तपास करत आहे.
यापूर्वी ४ ऑगस्ट रोजी आसामच्या नगाव जल्ह्यिातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कॅम्पमध्येही अशीच घटना घडली होती. तिथे एका सहायक उपनिरीक्षकाने अंधाधुंध गोळीबार करून दोन जवानांची हत्या केली होती आणि नंतर स्वतःवरही गोळी झाडून घेतली होती.
