Ad Advertisement Ad Advertisement

एका पायावर ४०० मीटरचा प्रवास रागिणीची शाळेसाठी जिद्द

डीएम अंकल, मला तीनचाकी सायकल द्या, मला शाळेत जायचंय, सात वर्षांच्या चिमुकलीची हृदयस्पर्शी साद

बलिया : शाळेत जाण्यासाठी सात वर्षांची रागिणी रोज एका पायावर उड्या मारत तब्बल ४०० मीटरचा प्रवास करते. उत्तर प्रदेशातील बलिया येथील या चिमुकलीची शिक्षणासाठीची जिद्द सध्या अनेकांच्या मनाला भिडत आहे.

रागिणी अवघी सहा महिन्यांची असताना एका अपघातात तिच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी अनेक ठिकाणी उपचार केले, मात्र आर्थिक अडचणींमुळे तिचा पाय वाचवता आला नाही. तिचे वडील रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे पुढील उपचार, कृत्रिम पाय किंवा इतर आवश्यक साधनांची व्यवस्था करणे कुटुंबासाठी कठीण झाले.


रागिणी मोठी होत असताना घरासमोरून दप्तर घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांना पाहून तिलाही शाळेत जाण्याची इच्छा व्हायची. ती आईकडे रडत म्हणायची, ‘मलाही शिकायचं आहे.’अखेर तिची शाळेत जाण्याची इच्छा पूर्ण झाली, पण घरापासून शाळेपर्यंतचा ४०० मीटरचा रस्ता तिच्यासाठी रोजची कठीण परीक्षा ठरला. कधी घरातील एखादी व्यक्ती तिच्यासोबत असते, तर अनेकदा रागिणी एकटीच एका पायावर उड्या मारत शाळेत जाते. थकवा आला की ती थोडावेळ थांबते, पण शिक्षणाची वाट सोडत नाही.

तिच्या या संघर्षाची माहिती लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर रागिणीने प्रशासनाकडे एक साधी, पण हृदयस्पर्शी मागणी केली, डीएम अंकल, मला एक ट्रायसायकल द्या. मी त्यावरून शाळेत जाईन. तिची कहाणी व्हायरल होताच मदतीसाठी हात पुढे आले. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी आर्थिक मदत केली, तर पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी रागिणीला तीनचाकी सायकल भेट दिली.

एका पायाची साथ नसली तरी रागिणीच्या शिक्षणाच्या स्वप्नाला मात्र तिची जिद्द खंबीरपणे पुढे घेऊन जात आहे. तिच्या छोट्याशा प्रवासाने मोठा संदेश दिला आहे, शिकण्याची इच्छा असेल, तर अडचणीही मार्ग रोखू शकत नाहीत.

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.