प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय
अयोध्या : श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अयोध्येतील राम मंदिराच्या प्रशासनासाठी निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अधिकृत नियुक्ती केली आहे. दानधर्माच्या पैशांत झालेल्या कथित अनियमिततेच्या वादानंतर प्रशासनात पारदर्शकता आणि व्यावसायिकता आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी ५,५८५ हून अधिक अर्ज आले होते. न्यायमूर्ती (निवृत्त) प्रमोद कोहली यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ऑनलाइन मुलाखतींनंतर १११ जणांची निवड केली आणि अंतिम फेरीसाठी अयोध्येत १६ उमेदवारांना बोलावले. त्यातून ३ नावे ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दास यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा हे भारतीय हवाई दलातील वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख राहिलेले असून, त्यांना ‘सर्वोत्तम युद्ध सेवा पदक’, ‘अति विशिष्ट सेवा पदक’आणि ‘विशिष्ट सेवा पदक’ यांसारख्या सर्वोच्च लष्करी सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
ट्रस्टच्या नियमावलीमध्ये बदल करून नवीन उएड कडे मंदिर संस्थेचे वैधानिक, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार सोपवण्यात आले आहेत.
पारदर्शकता आणि समन्वय
मुख्य कार्यकारी अधिकारी हे सरकारचा कोणताही थेट हस्तक्षेप नसताना थेट ट्रस्टच्या सरचिटणीसांना रिपोर्ट करतील. मंदिराची सुरक्षा, आर्थिक व्यवहार आणि भविष्यातील विकासाच्या योजना हाताळण्याची मुख्य जबाबदारी त्यांच्यावर असेल.
ट्रस्टने मंदिराच्या सुरक्षेसाठी सरचिटणीसांच्या देखरेखीखाली एक कायमस्वरूपी ‘स्थानिक सुरक्षा समन्वय समिती’ स्थापन करण्याचा आणि अधिकृत वृत्तप्रवक्ता नियुक्त करण्याचाही निर्णय घेतला आहे.
मंदिरात येणाऱ्या देणग्यांमध्ये चोरी झाल्याचा आरोप झाल्यानंतर आणि २६ जून रोजी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय व विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्रस्टच्या कामकाजाची पुनर्रचना करणे गरजेचे बनले होते. सध्या या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक करत असून, त्या प्रकरणाची समीक्षा देखील आजच्या बैठकीत करण्यात आली.
