Advertisement Advertisement

Street Crime: गुंडाला जेलमधून सोडविण्यासाठी पोलिसांची ५ हजारांची लाच

छत्रपती संभाजीनगर : जेलमध्ये असलेल्या गुंडाला सोडविण्यास मदत करण्यासाठी लाच घेणाऱ्या उपनिरीक्षकासह त्याच्या मदतनीस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गजाआड केले. जर पोलिसच गुंडांच्या मदतीला धावले तर मुकुंदवाडीसारख्या भागात स्ट्रीट क्राईम कसे रोखणार?, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. जीवघेणा हल्ल्याचे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या मुकुंदवाडीतील गुंडांचा हैदोस न थांबण्याचे हे एक कारण आहे का?, अशीही चर्चा या आता सुरू झाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात छापा मारून पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर (४१), अंमलदार सुभाष राठोड (३६) या दोघांना ५ हजार रुपयांची लाच घेताना पकडले. विशेष म्हणजे, त्यांनी दोन्ही हातांची दहा बोटे दाखवून १० हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती त्यातील ५ हजार रुपये स्वीकारताना त्यांना पकडण्यात आले. दरम्यान, मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातीलच सहायक पोलीस निरीक्षक संजय बहुरे आणि अंमलदार गोकुळ खटावकर यांना १० हजारांची लाच घेताना ५ जून रोजी पकडले होते. नूतन ठाणेदारांच्या नियुक्तीनंतर तीन महिन्यांतच लाचेच्या दोन घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

नेमके प्रकरण काय?

एक गुन्हेगार सिडको उड्डाणपुलाखाली नाश्त्याचा गाडा लावतो. काही महिन्यांपूर्वी रिक्षाचालक ग्राहक रात्री तेथे पोहे खाण्यासाठी गेला. पोह्यात मीठ कमी असल्याचे सांगताच या गुन्हेगाराने थेट जीवघेणा हल्ला करून बेदम मारहाण केली होती. सिडको चौकात मोठा राडा झाला होता. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यातील आरोपीला अटक झाली होती. त्यात जामिनावर येताच त्याने घराशेजारीच एकावर थेट तलवारीने हल्ला केला होता. त्यात त्या गुन्हेगार मुलासोबतच त्याचा भाऊ आणि आई यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास उपनिरीक्षक पासलकरकडे होता.

लाचेतील दोन्ही आरोपींना तीन दिवस कोठडी

एसीबीच्या अधीक्षक माधुरी केदार-कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, पोलीस निरीक्षक संतोष तिगोटे, अंमलदार साईनाथ तोडकर, राजेंद्र सिनकर यांच्या पथकाने अटक केलेला उपनिरीक्षक प्रशांत पासलकर आणि अंमलदार सुभाष राठोड या दोघांनाही बुधवारी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास पोलीस निरीक्षक वाल्मिक कोरे करीत आहेत.