छत्रपती संभाजीनगर : खुनाच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये वाँटेड असलेल्या दोन सख्ख्या भावांना गुन्हे शाखेने गजाआड केले. पडेगावात छापा मारून घरातूनच त्यांच्या मुसक्या आवळल्या. सय्यद मोसीन सय्यद मोईनोद्दीन (वय ३८) आणि सय्यद मुजीब सय्यद मोईनोद्दीन ऊर्फ मुजीब डॉन (वय ४५, दोघे रा. अन्सार कॉलनी, पॉवर हाऊसजवळ, पडेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर अनुक्रमे सातारा आणि शिल्लेगाव पोलीस ठाण्यात खुनाचे स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
सातारा ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील वाँटेड आरोपी सय्यद मोसीन हा पडेगाव येथील घरात बसलेला असल्याची माहिती सोमवारी (दि. ७) गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविना आघाव, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गंभीरराव, उपनिरीक्षक अर्जुन कदम, हवालदार संतोष पारधे, संदीप तायडे, कैलास काकड, श्रीकांत काळे, राजेंद्र साळुंके, मनोहर गिते, मनोज विखणकर, विजय निकम, मनोहर त्रिभूवन, विक्रम खंडागळे, शिल्पा तेलोरे, पूनम पारधी यांच्यासह विशेष पथकाने छापा मारला. तेथे घरातील एका खोलीत दोन इसम बसलेले आढळले. चौकशी केली असता त्यांची नावे सय्यद मोसीन आणि सय्यद मुजीब ऊर्फ मुजीब डॉन अशी असल्याचे समोर आले. तेव्हा दोन मोठे मासे गळाला लागल्याचे स्पष्ट झाले.
सातारा, शिल्लेगाव ठाण्यात खुनाचे गुन्हे
सय्यद मोसीन हा २ ऑक्टोबर २०२५ रोजी सादातनगर, रेल्वे ब्रिजखाली सय्यद इमरान सय्यद शकील (३८, रा. सादातनगर) यांचा खून करून फरार झाला होता. त्याच्यावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर, त्याचा सख्खा भाऊ सय्यद मुजीब ऊर्फ मुजीब डॉन हा २१ जुलै २०२६ रोजी रांजणगाव पोळ (ता. गंगापूर) येथे घडलेल्या घटनेत फरार होता. त्याच्यावर शिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.पोलिसांनी दोन्ही भावांना बेड्या ठोकून संबंधित पोलिसांच्या ताब्यात दिले, असे पोलीस निरीक्षक आघाव यांनी स्पष्ट केले.
१५ दिवसांपूर्वी घातला होता गोंधळ
मुजीब डॉन हा पडेगाव येथे घरी असल्याची खबर मिळाल्यावर १५ दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांचे एक पथक मध्यरात्री तेथे धडकले होते. मात्र, तेव्हा महिलांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळे पोलिसांना माघारी परतावे लागले होते. स्थानिक पोलिसांकडून अपुरी मदत मिळाल्याने पोलिसांचा नाईलाज झाला होता. त्यामुळे यावेळी शहर पोलिसांनी तीन अधिकारी आणि २५ पोलिसांचा फौजफाटा घेऊन छापा मारून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.
