Advertisement Advertisement

Michael Faraday : विज्ञानातील एकलव्य फॅराडे!

गरिबी ज्ञानार्जनाच्या आड पूर्वीही येत नव्हती आणि आज तर नाहीच नाही. आज अनेक शासकीय योजनांतून शिक्षणासाठी सहाय्य मिळते. मात्र, पूर्वी अशा योजना नसताना आणि कोणी मदतीला आलेले नसताना, केवळ अंतरीची ओढ असल्याने सहावी शिकलेला मुलगा पुढे रॉयल सोसायटीमध्ये गेला. इतका मोठा झाला की जगाच्या इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले. धारिता म्हणजेच कॅपॅसिटन्स या भौतिक राशीच्या एककाच्या रूपाने त्याने अढळ स्थान प्राप्त केले. दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यालाही त्याचे नाव माहीत आहे. आईनस्टाईनलाही या संशोधकाचा फोटो आपल्या दालनात लावावा वाटावे, असा संशोधक म्हणजे मायकल फॅराडे. (Michael Faraday)

लंडनमध्ये इंग्लंडमधील नेविंग्टन बट भागातून वर्षभरापूर्वीच स्थलांतरीत झालेल्या, अत्यंत गरीब कुटुंबात मायकल यांचा २२ सप्टेंबर १७९१ रोजी जन्म झाला. ते चार भावंडातील तिसरे अपत्य. त्यांचे वडील जेम्स हे एका कार्यशाळेत लोहाराचे काम करत. घरच्या गरिबीमुळे मायकलना अत्यंत सुमार दर्जाच्या शाळेत घातले. तेथे केवळ अक्षरओळख झाली. त्यानंतर सहावीत असतानाच त्यांची शाळा सुटली. केवळ तेरा वर्षांचे असताना, एका पुस्तकबांधणीच्या दुकानात उमेदवारी सुरू केली. स्थानिक पुस्तक विक्रेते जॉर्ज रिबू यांच्या मालकीचे ते दुकान होते. पुस्तकबांधणी करता करता, त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. रिबूही त्यांच्या वाचनाच्या आवडी आड आले नाहीत. उलट ते मायकलना वाचनासाठी प्रोत्साहन देत राहिले. त्याचबरोबर ते दररोज कामावरून परतताना अनेक मान्यवरांच्या घरी पुस्तके आणि वर्तमानपत्रे पोहोचवत. नंतर दुसऱ्या दिवशी कामावर येताना परत घेऊन येत. विशेषत: विज्ञानाची पुस्तके वाचनावर मायकल यांचा भर होता. त्यातही रसायनशास्त्राकडे त्यांचे मन आकर्षित झाले. मायकल आयुष्याच्या अखेरपर्यंत या जॉर्ज रिबू यांचे ऋण मानत होते.

मायकल ज्यांच्या घरी पुस्तके आणि वर्तमानपत्रे पोहोचवत, त्यातील एक गृहस्थ होते विल्यम डान्स. त्यांना मायकल यांच्या वाचनाची माहिती होती. पूर्वी थोर संशोधकांची व्याख्याने तिकिटे ठेऊन आयोजित करत. अशा व्याख्यानाचे काही मान्यवरांना मोफत पास देत. एकदा त्यांच्याकडे हंफ्रे डेव्हींच्या व्याख्यानाचे असेच पास आले. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने ते जाऊ शकणार नव्हते, त्यामुळे त्यांनी ते पास मायकलना दिले आणि मायकलना जाण्यास सांगितले. तेथे जाऊन काय करायचे हे माहीत नसलेले मायकल एक वही घेऊन गेले. एखाद्या आदर्श विद्यार्थ्यासारख्या, व्याख्यानाच्या नोटस त्यांनी वहीत लिहून काढल्या. लोकाग्रहास्तव हंफ्रे डेव्ही यांची व्याख्याने आणखी दोन दिवस वाढवण्यात आली. मायकलना व्याख्यानाची तिकिटे खरेदी करणे शक्यच नव्हते. मात्र, विल्यम डान्संनी ही तिकिटेही मायकलना दिली. सहा व्याख्यानांच्या नोटसनी मायकल यांची तीनशे पानांची वही भरून गेली. या वहीचे काय करायचे असा मायकल यांच्यासमोर प्रश्न पडला. त्यांनी सरळ ती वही हंफ्रे डेव्हींना पाठवून दिली. डेव्ही यांना ती वही पाहून मोठे आश्चर्य वाटले.

त्याच काळात डेव्ही यांचा प्रयोगावेळी अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांच्या डोळ्याला इजा पोहोचली, त्यामुळे रॉयल सोसायटीने डेव्ही यांना एक सहाय्यक नेमण्यास परवानगी दिली होती. त्याचवेळी मायकल यांनी पाठवलेली वही डेव्हींना मिळाली. आपल्या सहा व्याख्यानाच्या तीनशे पानांच्या नोटस काढणाऱ्या मुलासच आपला सहाय्यक नेमण्याचे डेव्हींनी ठरवले. त्यांनी मायकलना बोलावून घेतले आणि आपला रसायन सहाय्यक म्हणून नेमले. आजवर एकलव्याप्रमाणे विज्ञान अभ्यासणाऱ्या मायकल यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. पुस्तकांची बांधणी करणारा मुलगा अचानक जगातील सर्वांत प्रतिष्ठित संस्थेतील, त्या काळातील सर्वांत मोठ्या संशोधकाच्या प्रयोगशाळेत काम करू लागला. १ मार्च १८१३ पासून ते रॉयल सोसायटीत रूजू झाले.

लगेचच हंफ्रे डेव्ही यांना युरोप दौऱ्यासाठी परवानगी देण्यात आली. या काळात त्यांना एक सहाय्यक आणि एक शिपाई बरोबर नेण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, त्यांच्याबरोबर जाण्यास कोणीच शिपाई तयार नव्हता. अखेर मायकल यांनीच दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडाव्यात असे ठरले आणि प्रवास सुरू झाला. डेव्ही मायकलना सन्मानाने वागवत, मात्र त्यांच्या पत्नीला एका शिपायाला बरोबरीने वागवणे रूचत नव्हते. त्या मायकलना बोगीच्या बाहेर बसायला लावत. अत्यंत अवमानकारक वागणूक देत. त्या इतका अपमान करत की दौरा अर्ध्यावर सोडावा, विज्ञानाचाही नाद सोडावा, असा मायकल यांच्या मनात अनेकदा विचार आला. मात्र, या दौऱ्यात अनेक मान्यवर संशोधकांना भेटण्याची संधी मिळणार असल्याने त्यांनी अपमानाचे विष पचवत दौरा पूर्ण केला.

या अठरा महिन्याच्या दौऱ्यात त्यांनी फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड आणि जर्मनीमधील अनेक प्रयोगशाळांना भेटी दिल्या. या दौऱ्यात आंद्रे मारी ॲम्पिअर, चार्ल्स गास्पार्ड, आर्थर ऑगस्ट डी ला राईव्ह, आलेस्सांद्रो व्होल्टा या संशोधकांच्या प्रयोगशाळा पाहता आल्या. त्यांच्याशी चर्चा करता आली. त्याचवेळी नेपोलियनच्या साम्राज्याचा अंत सुरू झाला आणि त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. या काळात जोसेफ प्रिस्टले यांनी त्यांना सर्वाधिक प्रभावित केले. प्रिस्टले यांच्यापासून खऱ्या अर्थाने मायकलना संशोधनाची प्रेरणा मिळाली. अपमानाच्या कटू घोटांसोबत मायकलना ही मोठी भेट मिळाली.

त्यांनी स्वतंत्र संशोधनही सुरू केले. क्लोरिनच्या अनेक संयुगांचा शोध लावला. कार्बन हेक्झाक्लोराईड आणि कार्बन टेट्राक्लोराईड ही दोन संयुगे शोधली. त्यांनी वायुच्या विसरणावरही मोठे संशोधन केले. चुंबकीय काचेचा शोध लावला. प्रयोगशाळेत वापरण्यासाठी सुरक्षित बर्नर बनवले. तसेच क्लोरीनचे द्रवीकरण करण्याचे तंत्रही शोधले. वायूरूप असलेल्या पदार्थांचा उत्कलनांक कमी असतो आणि त्यांचे तापमान आणखी कमी केल्यास त्यांचे घनरूप मिळू शकते हेही मायकल यांनी सांगितले. त्यांनी विद्युत अपघटनाचा सिद्धांत मांडला. ॲनोड, कॅथोड, इलेक्ट्रोड, आयन हे शब्द त्यांनीच प्रथम वापरले. सुवर्ण कलिलांचा अभ्यास करून नॅनोपार्टिकल्सचा शोध लावला.

त्यांनी विद्युत-चुंबकीय क्षेत्रातही मोठे संशोधन केले. मात्र, या क्षेत्रात संशोधन करण्यास त्यांच्यावर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. डेव्ही यांच्या कल्पनेतील एकादिष्ट विद्युत धारेवर चालणारी मोटर मायकल यांनी बनवली. मात्र, या विषयीच्या शोधनिबंधात डेव्हींचा उल्लेख न केल्याने ही बंदी घालण्यात आली. डेव्हींच्या निधनानंतर त्यांनी विद्युत-चुंबकीय प्रवर्तनाचा सिद्धांत मांडला. या नियमावरच मॅक्सवेल यांचे एक सूत्र आधारित आहे. त्यांनी प्राणी विद्युत, विद्युत अपघटन, विद्युत निर्मिती, विद्युत आणि चुंबकीय बले इत्यादींचा अभ्यास केला. प्रकाश किरणांना चुंबकीय काचांच्या सहाय्याने फिरवले. आपल्या संशोधनाने मानवाचे कष्ट कमी करण्यासाठी अनेक यंत्रांचे तंत्रज्ञान विकसित झाले. गरिबीने मायकल यांचे शिक्षण थांबवले, ज्ञानप्राप्ती मात्र रोखता आली नाही.

डॉ. व्ही. एन. शिंदे
संपर्क : ९६७३७८४४००

Leave a Comment

Leave a Reply