Advertisement Advertisement

Ammy Virk car shooting : कॉन्सर्टनंतर अम्मी विर्कच्या गाडीवर गोळीबार

Ammy Virk Canada concert : सुदैवाने जीवितहानी नाही

ॲबॉट्सफोर्ड, कॅनडा : Ammy Virk car shooting : पंजाबी गायक आणि अभिनेता अम्मी विर्कच्या कॅनडा दौऱ्यात धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ॲबॉट्सफोर्ड येथे कॉन्सर्ट केल्यानंतर अम्मी विर्क ज्या गाडीतून प्रवास करत होता, त्या गाडीवर गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

गाडी बुलेटप्रूफ असल्याचा दावा

रिपोर्टनुसार, ज्या गाडीवर गोळीबार करण्यात आला ती बुलेटप्रूफ होती. गोळीबार झाला त्यावेळी अम्मी विर्क आणि शोचा प्रमोटर गाडीतच होते. बुलेटप्रूफ गाडीमुळेच मोठा धोका टळला असावा, असे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

कॉन्सर्टनंतर अचानक गोळीबार

अम्मी विर्कचा ५ सप्टेंबर रोजी ॲबॉट्सफोर्ड येथे कॉन्सर्ट झाला. कार्यक्रम संपल्यानंतर तो आणि शोचा प्रमोटर एका वाहनातून जात होते. त्याच वेळी गडद रंगाच्या एसयूव्हीमधून काही जणांनी त्यांच्या वाहनावर अनेक गोळ्या झाडल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
ॲबॉट्सफोर्ड पोलिसांनी गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी तपास केला. मात्र, या गोळीबारामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

अम्मी विर्कने अद्याप काहीही सांगितलेले नाही

या घटनेवर अम्मी विर्कने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे, या घटनेनंतरही त्याने सोशल मीडियावर आपल्या कॅनडा दौऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
मंगळवारी त्याने व्हॅन्कुव्हरमधील कॉन्सर्टचे फोटो पोस्ट केले. हा त्याच्या ‘युनिटी टूर’मधील शेवटचा कार्यक्रम होता. चाहत्यांचे आभार मानताना त्याने हा दौरा खूप चांगला गेल्याचे सांगितले.

गोळीबारामागे कोण? तपास सुरू

या गोळीबारामागे कोणाचा हात आहे आणि अम्मी विर्कला लक्ष्य करण्यात आले होते का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घटनेचे नेमके कारण आणि गोळीबार करणाऱ्या व्यक्तींची माहिती तपासातून समोर येण्याची शक्यता आहे.