Advertisement Advertisement

MPSC : एमपीएससीविरोधात विद्यार्थ्यांचा संतापाचा उद्रेक; छत्रपती संभाजीनगरमध्ये हजारोंचा आक्रोश मोर्चा

प्रश्नपत्रिका फुटीचा आरोप, नियोजनाचा अभाव आणि गट ‘ब’ परीक्षेतील गैरप्रकारांचा निषेध; अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर उतरून आक्रोश मोर्चा काढला. हमखास मैदानापासून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले.

‘विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा’; बारा प्रमुख मागण्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकार, परीक्षांच्या नियोजनातील सातत्याचा अभाव तसेच गट ‘ब’ परीक्षेतील गैरप्रकारांची सखोल चौकशी करावी, अशा बारा प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. परीक्षांच्या नियोजनातील गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाया जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. आयोगाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी विद्यार्थ्यांनी केली.

मोर्चामुळे प्रमुख मार्ग बंद

मोर्चाला मोठी गर्दी होणार असल्याने शहर वाहतूक शाखेने वाहतुकीत बदल केले. अण्णाभाऊ साठे चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय तसेच उद्धवराव पाटील चौक परिसरातील प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला.

विद्यार्थ्यांचा सलग तिसरा मोठा एल्गार

छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची ही सलग तिसरी मोठी घटना आहे. यापूर्वी जुलै महिन्यात गट ‘क’ परीक्षा संगणकाद्वारे घेण्याच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला होता. त्याआधी नोव्हेंबरमध्ये एकाच वेळी दोन परीक्षांच्या तारखा आल्याने परीक्षांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आता प्रश्नपत्रिका फुटीच्या गंभीर आरोपांमुळे विद्यार्थ्यांचा संयम सुटला असून, परीक्षांमध्ये पारदर्शकता आणा, नियोजनातील गोंधळ दूर करा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ थांबवा, अशी मागणी करत हजारो विद्यार्थ्यांनी सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Comments 1
Loading comments...