Advertisement Advertisement

American Marathi Mission in Maharashtra : अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील कार्य

American Marathi Mission in Maharashtra : भारतात नेहमीच हिंदू-मुस्लिम किंवा इतर जातीअंतर्गत मतभिन्नता असताना ख्रिश्चन धर्मीय लोकांनी परदेशातून येऊन कुठेही गाजावाजा न करता अनेक लोकोपयोगी कामे करत आपल्या धर्माची पाळेमुळे कधी बळकट केली हे समजलेसुद्धा नाही.

भारतात ब्रिटिशांच्या बॅप्टिस्ट मिशनरी सोसायटी (१७९३) सह ५, अमेरिकेच्या अमेरिकन मराठी मिशनसह ४, जर्मनी ३ तर युरोपातील इतर संस्थांच्या मिळून ३ ख्रिश्चन मिशनरी संस्था कार्यरत असून FCRA म्हणजे विदेशी योगदान नियमन कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या २५००० संस्था व जवळपास २० लाख लोक सक्रियपणे काम करत आहेत. मागासलेल्या भारतीयांचा सर्वांगीण विकास करणे ख्रिश्चन मिशनऱ्यांचे अंतिम ध्येय असून यातील अमेरिकन मराठी मिशन (एएमएम) संस्था आपल्या अवतीभोवती २२५ वर्षांपासून कार्यरत आहेत. संस्थेचा प्रवास थक्क करणारा आहे. डेव्हिड टिळक, जोसफ गवंडी, एलिझाबेथ शेळके, सॅम्युएल वाघमारे ही मराठी मंडळी परंपरेला कुठेही हात न लावता मिशनची अपत्ये झाली.

अमेरिकेतील प्रोटेस्टंट पंथाचे गॉर्डन हॉल, सॅम्युएल नॉट, रॉक्सना नॉट अशा तीन मिशनऱ्यांनी १३ फेब्रुवारी १८१३ ला मुंबई बंदरात पाय ठेवला. २१ जुलै १८१३ ला धर्म प्रसाराचा कायदा केल्याने मुंबई या ठिकाणी अमेरिकन मराठी मिशनची स्थापना झाली. We can, if we will (आपली इच्छा असेल तर आपण करू शकतो.) हे घोषवाक्य घेऊन सुरुवातीची १८ वर्षे मिशनने मुंबई आणि कोकणात समाजोपयोगी कामे केली. पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर याप्रमाणे मिशनचा विस्तार वाढल्याने १८३१ ला मिशनचे मुख्यालय अहिल्यानगरला हलवण्यात आले. २० डिसेंबर १८३२ ला पहिले चर्च काढून मिशनने अहिल्यानगर आणि परिसरातील राहुरी, पारनेर, शेवगाव, नेवासा, पाथर्डी, मिरजगाव, केडगांव आणि शिरुर पुणे असा विस्तार केला. सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, सोलापूर जिल्ह्यातील बाळे, केगाव, उळे, कुंभारी, मंद्रूप, बार्शी, वैराग, उपळे, मोहोळ, पांगरी, कारी, गौडगाव यांसारख्या गावात पाय रोवले.

मिशनने शैक्षणिक क्षेत्रात अतिशय भरीव कामगिरी केली. त्यानुसार पुणे जिल्ह्यात शिरूरला औद्योगिक तांत्रिक शाळा, केडगाव पंडिता रमाबाईच्या नेतृत्वाखाली मुक्ती मिशन, लोणावळा व खंडाळा विश्रामगृह, दुष्काळ निवारण केंद्र, प्राथमिक शाळा, कोल्हापूर एस्तेर पॅटन हायस्कूल ज्यामध्ये भारतातील पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी शिकल्या, ईवीन हायस्कूल, मेरी वानलेस रुग्णालय, मेडिकल आणि नर्सिंग स्कूल, कुष्ठधाम, साताऱ्यात चर्च आणि वाईमध्ये आनंदीबाई जोशी प्राथमिक शाळा आणि विधवांसाठी अबॉट होम, पाचगणी आणि महाबळेश्वर या ठिकाणी मिशनरी, विशिष्ट पर्यटक, क्षय किंवा इतर रोगासाठी हवापालट केंद्र आणि मुलींची शाळा, अहिल्यानगर ह्युम हायस्कूल, अमेरिकन मिशन गर्ल्स हायस्कूल, युनियन ट्रेनिंग कॉलेज, अहमदनगर कॉलेज, मिस फरार मुलींची शाळा (याच शाळेला भेट दिल्यानंतर महात्मा फुलेंनी पुण्यात शाळा काढली.), राहुरी, पारनेरसह नगरमधील सर्वच तालुक्यांत मिशनने खूप मोठे शैक्षणिक काम केले.

सोलापूरमध्ये १८६१ पासून सोलापूर मिशन हायस्कूल, मेरी बी हार्डिंग किंडर गार्डन ट्रेनिंग स्कूल (बालवाडी शिक्षिका प्रशिक्षण), वोरोनोको गर्ल्स स्कूल, रॉजर्स बॉइज स्कूल, अंध, अपंगांसाठी विशेष शाळा. याशिवाय बार्शी, कुर्डूवाडी, सांगोला, दक्षिण सोलापूर या तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावात पालावरच्या शाळा काढून साक्षर केले. १८७१ ला इंग्रजांनी महाराष्ट्रातील पारधी, वडार, कैकाडी अशा १४ जातींना गुन्हेगार घोषित करून त्यांना एका वसाहतीत बंद करून त्यांच्याभोवती तारेचेकूंपण घातले. दिवसातून चार वेळा हजेरी अनिवार्य केली. महाराष्ट्रातील ५२ पैकी सोलापूर सेटलमेंट त्याचाच एक भाग होती, त्यांची जबाबदारी याच मिशनकडे होती. शालेय उपक्रमासोबतच साहित्यातही मिशनने पुढाकार घेत १८१० साली डॉ. विल्यम कॅरे नावाच्या मिशनरीने मराठी भाषेचा पहिला व्याकरणकोश तयार केला. अतिशय दर्जेदार असलेले ‘ज्ञानोदय’ मासिक आणि ‘निर्णयसागर’ छापखाना याच मिशनने दिले.

१८९९ ला दक्षिण भारतात पडलेल्या भयानक स्वरूपाच्या दुष्काळात मिशनचे काम कौतुकास्पद आहे. छपन्या नावाच्या या दुष्काळात फक्त ११ इंच पाऊस पडल्याने अन्न पाण्याने त्रस्त जनता स्थलांतरित होताना त्यांनी आपली मुले, गुरेढोरे रस्त्यात सोडली. गाव, शेत, रेल्वेस्थानक अशा सार्वजनिक ठिकाणी कित्येक दिवसांची उपाशी मुले अर्धमेली पडलेली असायची. अशांना मिशनने उचलून आपल्या दुष्काळ निवारण केंद्रात ठेवून जीवदान देत पायावर उभे केले. ज्यांच्या पालकांचा शेवटपर्यंत संपर्क होऊ शकला नाही त्यांना दत्तक घेऊन आपल्या धर्मात घेतले. १९११ ला सोलापूर आणि नगर भागात अशा धर्मांतरांची संख्या ३० ते ४० हजारांवर होती. त्यांचे धर्मप्रसाराचे केंद्र असलेल्या गावांत विहिरी खोदल्या, मजुरांना काम, धान्य वाटप, आरोग्य सुविधा पुरवल्या. तेव्हापासूनच अमेरिकेतील मुख्य पीक असणारे मका आणि गहू मोठ्या प्रमाणात इथे खायला सुरुवात झाली. अन्न-पाण्यावाचून तडफडणाऱ्या जीवाला कसला आलाय धर्म! दुष्काळ, प्लेगबरोबर हिंदूंतील जातीव्यवस्था ख्रिश्चन धर्मप्रसारास पोषक ठरली; त्यामुळे सुरुवातीला महार, मांग समाजातील धर्मांतर झपाट्याने झाले. हिंदू जातीतील उच्चनीचता धर्मांतर झाल्यानंतरही काही दिवस कायम होती, काही वेळेला धर्मांतरित लोकांना वाळीत टाकणे, संपत्तीचा हक्क डावलणे यांसारख्या घटना समोर येताच इंग्रजांनी यावर कठोर कायदे केल्याने धर्मांतरास चालना मिळाली.

डॉ. रजनीकांत आरोळ अहिल्यानगरजवळील जामखेड या ठिकाणी केलेले आरोग्यविषयक कार्य ‘पद्मभूषण’ मिळवूनही अधोरेखित झालेले नाही. नारायणराव टिळक यांनी रचलेल्या कविता, भजन यातून लोकांना आकर्षित केले जायचे. यासाठी अमंगळ मूर्तीहून, दूर तुम्ही सदा व्हा, पवित्र लेख यापासून आज्ञा घ्या यांसारखी भजने व्हायची. धर्मांतर झाले तरी मुळचा पोशाख, परंपरा सोडल्या नसल्याने धर्मांतरित लोकांना तेवढ्या सामाजिक अडचणी आल्या नाहीत. ख्रिश्चन धर्मातील मिशन म्हणजे एखाद्या धार्मिक आणि सामाजिक कामासाठी पाठवलेले मंडळ आणि मिशनरी म्हणजे अशा कार्यासाठी वाहून घेतलेले प्रतिनिधी. या धर्मातील धर्मगुरुंना रेव्हरंड पदवीने ओळखले जाते. १८१३ ला अमेरिकेतून सामाजिक कार्यासाठी आलेल्या मिशनने आपले उद्दिष्ट साध्य केले. घरदार सोडून समाजकार्यासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनमधील साधकांचे कौतुकच करावे लागेल. ही मिशन एक उदाहरण असून भारतात अशा हजारो संस्था आणि लाखो उपदेशक काम करत असल्याने तमिळनाडूनंतर महाराष्ट्र धर्मांतराकरिता दुसऱ्या क्रमांकावर असले, तरी एका धर्मगुरूने म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत पंढरीचा पांडुरंग आणि तुकारामाची गाथा आहे, तोवर किती जरी धार्मिक आक्रमणे झाली तरी हिंदू धर्म चिरस्थायी आहे.


प्रा. डॉ. सतीश कदम
संपर्क : ९४२२६५००४४

Comments 2
Loading comments...