पूर आणि भूस्खलनामुळे जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान, आतापर्यंत ५८३ विमा दावे दाखल
मुंबई : Nepal Flood Insurance Loss नेपाळमध्ये गेल्या आठवड्यात आलेल्या विनाशकारी पूर आणि भूस्खलनामुळे विमा कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विम्याअंतर्गत होणारे नुकसान सुमारे १२ अब्ज भारतीय रुपयांपेक्षा (२० अब्ज नेपाळी रुपये) अधिक असू शकते. यातील बहुतांश दावे जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित असल्याचे विमा क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
चीनच्या तिबेट सीमेलगतच्या भागात झालेल्या आपत्तीत ११ जलविद्युत प्रकल्प बाधित झाले आहेत. रसुवागढी, अप्पर त्रिशुली-३ए, चिलिमे आणि देविघाट या प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी प्रकल्पांकडे जाणारे रस्ते आणि जमिनीवरील पायाभूत सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
आतापर्यंत ५८३ विमा दावे
नेपाळ विमा प्राधिकरणाकडे ३१ ऑगस्टपर्यंत पुराशी संबंधित एकूण २५.८७ अब्ज नेपाळी रुपयांचे ५८३ दावे दाखल झाले आहेत. मात्र, हे आकडे अंतिम नुकसानभरपाईचे नसून विमा संरक्षणाखाली असलेल्या संभाव्य नुकसानीचे प्रतिबिंब आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षणानंतर अंतिम रक्कम स्पष्ट होईल.
मृत्यू, जखमींचे दावे वेगळे
मृत्यू, अपघात आणि कामगार नुकसानभरपाईशी संबंधित दावे स्वतंत्रपणे समोर येणार आहेत. दुर्गम भागांमध्ये मृत आणि बेपत्ता व्यक्तींची पडताळणी सुरू असल्याने या दाव्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
हिमालयीन पायाभूत सुविधांचा विमा महागणार?
या आपत्तीमुळे हिमालयीन भागातील जलविद्युत आणि पायाभूत प्रकल्पांच्या विमा जोखमींचा नव्याने आढावा घेतला जाऊ शकतो. भविष्यात विमा कंपन्या जास्त प्रीमियम, कमी संरक्षण आणि कठोर अटी लागू करण्याची शक्यता उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हिमालयीन भागातील मोठ्या प्रकल्पांसाठी विमा खर्च वाढण्याची चिन्हे आहेत.
