Ganeshotsav 2026: Bappa to Stay for 12 Days
यंदा ११ नव्हे तर, १२ दिवस बाप्पांचा मुक्काम
भाविकांना गणरायाच्या आगमनाची उत्सुकता, बाजारपेठेतही संचारले चैतन्य
छत्रपती संभाजीनगर : श्रावणाची सांगता आणि भाद्रपदाची चाहूल लागताच वेध लागतात ते लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे! वर्षभर ज्या दिवसाची गणेशभक्त आतुरतेने वाट पाहतात, त्या गणेशोत्सवाला आता अवघा एक दिवस उरला आहे. यंदा अधिक मासामुळे गणेशोत्सव मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल १९ दिवस उशिराने सुरू होणार आहे. मात्र गणेशभक्तांसाठी सर्वात आनंदाची बाब म्हणजे यंदा गणरायाचा मुक्काम १० किंवा ११ दिवस नसून पुरेसे १२ दिवस असणार आहे.
१४ सप्टेंबरपासून सुरू होणारा हा उत्सव २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाने होईल. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गणरायाच्या आगमनाला अवघा एक दिवस उरल्याने शहरात तसेच ग्रामीण भागात उत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. घरगुती गणपतींच्या प्रतिष्ठापनेसाठी भक्तांकडून तयारी सुरू असून, गणेश मंडळांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा गणेशोत्सवाचे आगमन १९ दिवस उशिरा होत असल्याने गणेशमूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांनाही मूर्ती घडवण्यासाठी आणि नक्षीकामासाठी अतिरिक्त वेळ मिळाला. त्यामुळे विविध आकारांच्या, आकर्षक आणि सुबक मूर्ती तयार करण्याचे काम अधिक वेळ उपलब्ध झाल्याने पूर्ण करता आले. सध्या शहरातील विविध भागांमध्ये गणेशमूर्तींची दुकाने आणि मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये भक्तांची गर्दी वाढताना दिसत आहे. बाप्पाच्या बुकिंगसाठी गणेशभक्तांची लगबग सुरू असून, आपल्या आवडीची मूर्ती निवडण्यासाठी भक्त कार्यशाळांना भेट देत आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक असलेले सजावटीचे साहित्य, रोषणाई, फुलांची सजावट, पूजेचे साहित्य आणि मंडपासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. घरगुती गणपतींच्या प्रतिष्ठापनेसाठी भक्तांकडून तयारी केली जात असून, अनेक घरांमध्ये साफसफाई आणि सजावटीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
दुसरीकडे गणेश मंडळांनीही तयारीला वेग दिला आहे. मंडप उभारणी, सजावट, रोषणाई आणि गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांमध्ये कार्यकर्ते व्यस्त झाले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी मंडळांकडून नियोजन सुरू असून, मंडप उभारणीची कामे अनेक ठिकाणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
गणेशोत्सवातील आकर्षण असलेल्या बँड पथकांनी आणि ढोल-ताशा पथकांनीही सरावाला वेग दिला आहे. बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुकीसाठी तसेच उत्सवातील विविध कार्यक्रमांसाठी पथकांकडून नियमित सराव केला जात आहे. ढोल-ताशांच्या गजराने शहरातील विविध भागांमध्ये उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे. गणरायाच्या आगमनावेळी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यासाठी मंडळांचे कार्यकर्ते तयारीत गुंतले आहेत.
यंदा तब्बल १२ दिवस बाप्पाचा पाहुणचार मिळणार असल्याने गणेशभक्तांमध्ये दुप्पट उत्साह पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतचा हा उत्सव भक्तांसाठी आनंद, श्रद्धा आणि उत्साहाचा काळ असणार आहे. घरगुती गणपती असो किंवा सार्वजनिक गणेश मंडळांचा गणपती, सर्वत्र बाप्पाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे.
अधिक मासामुळे यंदा उशिर
अधिक मासामुळे यंदाचा गणेशोत्सव १९ दिवस उशिराने आला आहे. असे असले तरी त्याची उत्सुकता मात्र कमी झालेली नाही. भाविकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. त्यातच १२ दिवस बाप्पाचा सहवास लाभणार असल्याने गणेशभक्तांसाठी यंदाचा उत्सव अधिक उत्साहपूर्ण ठरणार आहे.
१४ सप्टेंबर रोजी गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पुढील १२ दिवस शहर आणि ग्रामीण भागात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाला भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात येईल. त्यामुळे आता अवघ्या एक दिवसावर आलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने उत्सवाला सुरुवात होण्याची प्रतीक्षा गणेशभक्तांना लागली आहे.
उत्सवाचे प्रमुख वेळापत्रक
गणेश चतुर्थी (आगमन) : १४ सप्टेंबर
गौरी-गणपती विसर्जन : १९ सप्टेंबर
अनंत चतुर्दशी (महाविसर्जन) : २५ सप्टेंबर
उत्सवाचा कालावधी : तब्बल १२ दिवस

You need an account to post comments.