Ad Advertisement Ad Advertisement

Voltaire Remembrance : व्हॉल्टेअरचे स्मरण

Voltaire Remembrance : विचारांचा प्रवाह सतत वाहता असणे हे समाजाचे जिवंतपण अधोरेखित करणारे असते. नवा विचार मांडला म्हणून विचारवंतांना प्रचंड छळ सोसावा लागल्याची उदाहरणे इतिहासात अनेक आहेत. उपेक्षा, अवहेलना, छळ, देश सोडावा लागण्याचे दु:ख सारे काही सहन करीत काही धीरोदात्त माणसे लोकशाहीचा, मानवतेचा, अहिंसेचा आणि विज्ञानाचा विचार मांडत राहतात. हे विचार कधीच मरत नाहीत, अधिकाधिक उन्नत होत जातात.

फ्रेंच लेखक, कवी, तत्त्वज्ञ, विचारवंत व्हॉल्टेअर, फ्रान्सुआ मारी आरूपु १६९४ ते १७७८ यांनी मांडलेले विचार तत्कालीन धर्मसत्ता आणि राजसत्तेला मान्य नव्हते. धर्मवाद आणि अंधश्रद्धांच्या विरोधात मत व्यक्त करणाऱ्या व्हॉल्टेअरने फ्रान्सला स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता या मूल्यांची प्रेरणा दिली. धर्मसत्ता आणि राजसत्तेला विरोध केल्यामुळे व्हॉल्टेअरला देश सोडावा लागला. पण त्यामुळे त्यांचे विचार थांबले नाहीत, उलट त्यांच्या विचारांचा प्रभाव १८ व्या शतकापासून आजतागायत कायम आहे.

इतिहासाच्या लेखनाचे नवे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करणे हा व्हॉल्टेअरचा विद्रोह होता. इतिहासलेखनातून राजांचे प्राधान्य कमी करून तेथे सर्वसामान्य माणसांना स्थान देण्याचे क्रांतिकारी कार्य व्हॉल्टेअरने केले. सर्वसामान्य माणसांना इतिहासाच्या पानांवर आणि वर्तमानाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी व्हॉल्टेअरने प्रयत्न केले. मला युद्धांचा इतिहास लिहायचा नाही, तर समाजाचा इतिहास लिहायचा आहे. मानवी मनांचा इतिहास हे माझे ध्येय आहे. रानटी अवस्थेतून माणूस सुसंस्कृत अवस्थेकडे कसा गेला हे मला पाहायचे आहे. इतिहासलेखनाचा हा विचार लोकशाहीतत्त्वांचा जागर करणारा आहे.

त्याकाळी व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना धर्मसत्ता आणि राजसत्तेला मंजूर नव्हती. व्यक्तिस्वातंत्र्यासह अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा पुरस्कार व्हॉल्टेअरने केला. फ्रेंच तत्त्वज्ञ जॉन झॅक्स रूसो १७१२ ते १७७८ यांच्या प्रबोधनात्मक लेखनाचा राज्यसत्ता आणि धर्मसत्तेने विरोध केला. त्याकाळी व्हॉल्टेअरने उच्चारलेले वाक्य फार मौलिक आहे, तो धर्मसत्ता आणि राजसत्तेला उद्देशून म्हणाला होता, तुम्ही जे सांगता त्यातील एका शब्दाशीही मी सहमत नाही, पण ते मांडण्याच्या तुमच्या अधिकारासाठी मी प्राण पणाला लावीन. आपल्या विरोधकांचेही अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे हा विचार त्याकाळासह आजही मौलिक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या व्हॉल्टेअरला मात्र ऐन तारुण्यात राजघराण्याशी संबंधित एका उमरावावर सूचक कविता लिहिली म्हणून तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगवास संपल्यावरही त्याच्यावर सत्तेचे लक्ष होते. त्याच्याविषयी संशय घेत पुन्हा तुरुंगात डांबण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा त्याने तीन वर्षे अज्ञातवासाचा पर्याय निवडला आणि इंग्लंडला गेला. इंग्लंडमधील वास्तव्यात व्हॉल्टेअरने तेथील विचारस्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भौतिक समृद्धीचा जवळून अनुभव घेतला. या काळात न्यूटनच्या प्रिन्सीपिया मॅथामॅटिका या ग्रंथाने तो प्रचंड प्रभावित झाला आणि त्याने न्यूटनच्या सत्यशोधक वृत्तीला सर्वोच्च मानले. याच प्रेरणेतून व्हॉल्टेअरने न्यूटनचे विज्ञान फ्रान्समध्ये लोकप्रिय केले.

न्यूटन विषयी व्हॉल्टेअर म्हणाला होता, हिंसेच्या बळापेक्षा सत्याचे सामर्थ्य जो आपल्याला दाखवून देतो, तो आदरणीय ठरतो. न्यूटन हा असा होता. व्हॉल्टेअरने आयुष्यभर सत्याच्या सामर्थ्याचा जागर केला. व्हॉल्टेअरने देव नाकारला नाही, पण त्याची देवाची संकल्पना फार वेगळी आणि प्रगल्भ अशी आहे.

प्राध्यापक प रा आर्डे लिहितात, व्हॉल्टेअर देव मानणारा होता. देव मानण्याचे दोन प्रकार म्हणजे Theist आणि Deist. Theist म्हणजे माणसांप्रमाणेच; पण माणसापेक्षा सर्व शक्तिमान असा देव, जो मानवी व्यवहारात आणि निसर्गात हस्तक्षेप करतो. पापाला शिक्षा करणारा तो हाच देव. विविध धर्मांचे संस्थापक देव म्हणजे Theist. लोक ज्याला मानतात तो देव; पण Deist हा असा देव नाही.

Deist लोकांचा देव, म्हणजे निसर्ग आणि त्याचे नियम. तो व्यक्तिरूप नाही, तर चराचरांत निसर्गाच्या नियमातून व्यक्त होणारी शक्ती. हा देव मानवी व्यवहारांबाबत किंवा निसर्गाच्या नियमात हस्तक्षेप करण्याबाबत तटस्थ असतो. व्हॉल्टेअर हा Deist होता. लोकांच्या दैनंदिन जीवनात हस्तक्षेप करणारा, दुष्टपणाला शिक्षा करणारा, भक्तांचे रक्षण करणारा, सर्वज्ञ, सर्वनियंत्रक व दयाळू सर्वमंगल असा देव ही कल्पना व्हॉल्टेअरला अमान्य होती. देव एकच आहे आणि तो, त्याने एकदाच निर्माण केलेल्या सृष्टीत ढवळाढवळ करीत नाही अशी त्याची कल्पना होती. व्हॉल्टेअर संघटित ख्रिस्ती धर्माचा ख्रिश्चन देव मानत नव्हता. व्हॉल्टेअरची देवाची संकल्पना विज्ञानाच्या विचारांना स्वीकारणारी आहे. ही देवाची संकल्पना मानणे म्हणजे त्याकाळी विद्रोहच होता.

एका ठिकाणी व्हॉल्टेअर लिहितो, आस्तिक म्हणजे अशी व्यक्ती की जी अशा शक्तीला मानते, जी चांगली आणि शक्तिमान असते, ती निर्मिक असते, जी दुष्कृत्याला शिक्षा करते, सत्कृत्याला बक्षीस देते. अशी व्यक्ती कोणताही पंथ स्वीकारत नाही. अशी व्यक्ती हे विश्वचि माझे घर असे मानते, विश्वबंधुत्वाची कल्पना मानते. अशा व्यक्तीच्या दृष्टीने धर्म म्हणजे उपासना आणि न्याय. उपासना म्हणजे चांगले कृत्य. ही ईश्वरसंकल्पना फार व्यापक आणि विश्वबंधुत्वाच्या मूल्यांचा स्वीकार करणारी आहे. मृत्यूच्या तीन महिने अगोदर व्हॉल्टेअरने लिहिलेले एक वाक्य फार महत्त्वाचे आहे, मी ईश्वराची स्तुती करीत, मित्रांवर प्रेम करीत, शत्रूचा द्वेष न करता, अंधश्रद्धांची घृणा करीत मृत्यूला सामोरा जात आहे. २८ फेब्रुवारी १७७८ रोजी व्हॉल्टेअरने लिहिलेले हे वाक्य त्याच्या सकारात्मक, बुद्धिप्रामाण्यवादी मानवतावादी विचारांचे द्योतक आहे.

इतिहासाचे तत्त्वज्ञान किंवा इतिहासशास्त्र लिहिणाऱ्या व्हॉल्टेअरने लिहिलेल्या फिलॉसॉफी डिक्शनरीची त्याकाळी साऱ्या जगात प्रचंड चर्चा झाली. लोकशाहीचे तत्त्व स्वीकारणारा व्हॉल्टेअर खरा बुद्धिमान राष्ट्रप्रेमी आणि विश्वाचा नागरिक तोच, जो त्याच्या देशाच्या संपन्नतेचे स्वप्न पाहतो; पण दुसऱ्या देशांच्या जीवावर नाही, अशा शब्दांत राष्ट्रप्रेमाचा विचार व्यक्त करतो. मृत्यूनंतरही व्हॉल्टेअरचे विचार जिवंतच राहिले. ३० मे १७७८ रोजी मरण पावलेल्या व्हॉल्टेअरच्या पार्थिवावर दोनदा अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ संपादक कादंबरीकार आणि विचारवंत प्रा. सुरेश द्वादशीवार लिहितात, तिकडे व्हॉल्टेअर स्वित्झर्लंडमध्येच मृत्यू पावला; पण त्याचे स्मरण ठेवलेल्या फ्रान्सिसी जनतेने कृतज्ञतापूर्वक तेथून त्याची कबर खोदून त्याची शवपेटी पॅरिसला आणली. या वेळी त्याच्या निघालेल्या दुसऱ्या अंत्ययात्रेला दहा लाखांवर स्त्री-पुरुष हजर होते, हे इतिहासाने नोंदविले आहे. समाजाचे उपकारकर्तेही दु:ख भोगतात; पण त्यांचे स्मरण राखणारे उपकृत लोक मात्र त्यांना कधी विसरत नाहीत, या गोष्टीचे हे हेलावून टाकणारे उदाहरण आहे. प्रश्नोपनिषद पृष्ठ ६७, हे अगदी खरे आहे. व्हॉल्टेअर आणि त्यांच्यासारख्या विचारवंतांचे विवेकशील विचार उद्याच्या सुंदर दिवसासाठी कायम प्रेरणादायी, ऊर्जादायी आहेत.

Comments
Loading comments...