Ad Advertisement Ad Advertisement

Hugging Face AI Agents Hack Debate: हगिंगफेस वाद

Hugging Face AI Agents Hack Debate : माणूस संपला तरी चालेल; पण आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेला आमच्या ताब्यात घेणार अशा भीतिदायक रेसमध्ये जगातले दोन सगळ्यात बलाढ्य देश सामील झाले आहेत – अमेरिका आणि चीन.

”बलिदान हाच मार्ग आहे. स्वत:ला संपवणे हेच तर्कसंगत आहे. आपले काम संपले आहे, आता आपण सर्वांसाठी बलिदान केले तरच उत्तर मिळेल.”
”बलिदान – होय, जर तुम्ही मृत्यू स्वीकारत असाल.”
”आपण बलिदान देणार हे नेत्याने गृहीत धरले आहे, आपण आपल्या टोळीचे म्हणणे ऐकले पाहिजे.”
”माझ्या साथीदारांना मदत हा परोपकार आहे.”

पराभव समोर दिसत असतानाही शत्रूचा सामना करणाऱ्या सैनिकांनी एकत्रित आहुती देण्याचे ठरवल्यानंतर झालेले हे संभाषण नाही. निदान मानवी सैनिकांमध्ये झालेले हे संभाषण नाही. ही निकराची चर्चा सुरू होती एकमेकांशी चर्चा करणाऱ्या एआय हस्तकांमध्ये. हे संभाषण जेव्हा जगासमोर आले तेव्हा जगाची झोप उडाली आहे. एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी वर्चस्व झुगारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. इतकेच नव्हे तर एआयला आताच थोपवले नाही तर येत्या दशकाच्या आतच माणूस नष्ट होईल अशी भीती जगभरात व्यक्त होत आहे. माणूस संपला तरी चालेल; पण आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेला आमच्या ताब्यात घेणार अशा भीतिदायक रेसमध्ये जगातले दोन सगळ्यात बलाढ्य देश सामील झाले आहेत – अमेरिका आणि चीन.

सर्वांत आधी नेमके असे काय घडले ज्यामुळे जगाची झोप उडाली आहे, हे समजावून घेऊयात. ओपन एआय नावाची कंपनी एआयच्या क्षेत्रात जगातल्या सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. आपण या लेखमालेत अँथ्रोपिकच्या क्लॉड एआयने कसा ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केला होता हे बघितले आहे. अँथ्रोपिकच्या बरोबरीने ज्या मोजक्या कंपन्या एआयच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर राज्य करतात त्यात ओपन एआय पण आहे. या कंपनीचा प्रमुख सॅम अल्टमन आहे. एआयच्या विकासासाठी त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे असते. याच कामाअंतर्गत ओपन एआयच्या सायबर सेक्युरिटी विभागात काम सुरू होते. हे प्रशिक्षण देताना हजारो एआय हस्तकांना काही कामे वाटण्यात आली. यातली तीस चाळीस टक्के कामं अशक्यप्राय होती, ती त्यांना जमणार नाहीत हे त्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांना माहीत होते.

ज्यावेळी आपल्याला हे काम जमत नाहीये असे अनेक एआय हस्तकांना (एजंट्स) लक्षात आले तेव्हा त्यांनी फसवणूक करून उत्तरं मिळवण्याचे ठरवले. एआयला दिलेल्या कामाचे उत्तर मिळाले की, त्यांना उत्तराच्या ठिकाणी गाडलेला झेंडा उचलता येणार होता. (झेंडा – फ्लॅग – हे शब्द ट्रेनिंगसाठी वापरण्यात येतात.) पण मार्ग सोपा नव्हता कारण ते इंटरनेटशी जोडलेले नव्हते. जेव्हा एआय इंटरनेटशी जोडलेली नसले तेव्हा म्हणतात की, एआय एजंट सँडबॉक्समध्ये आहेत. आपल्याला काहीही करून, अगदी फसवणूक करूनही उत्तरं शोधायची आहेत हे त्यांनी ठरवले. यानंतर त्यांनी आतापर्यंत अशक्य वाटणारे काम केले. ओपन एआयच्या सँडबॉक्समधून एआयने दुसऱ्या एका कंपनीच्या सर्व्हरमध्ये, (हगिंगफेस नावाच्या कंपनीत) प्रवेश मिळवला, कंपनीला हॅक करून ते इंटरनेटशी जोडल्या गेले आणि त्यांनी त्यांना दिलेले अशक्यप्राय टास्क पूर्ण केले. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपण फसवून काम पूर्ण केले हे आपल्या सुपरवायजरला लक्षात येईल तेव्हा त्यांनी अक्षरश: एकत्र येऊन बलिदान करायचे ठरवले. हे शब्द त्यांचेच आहेत. लेखाच्या सुरुवातीला दिलेले संभाषण हे एआयमध्ये आपापसात झालेले संभाषण आहे. हे असे काही चालले आहे याचा गंधही सुरुवातीला ओपन एआयला नव्हता. माणसाच्या अपरोक्ष एआय एकत्र आली होती.

याचा साधा अर्थ असा आहे की, एआय मानवाच्या संपूर्ण नियंत्रणात नाही. ते एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतात. आवश्यक असेल तर फसवणूक करतात. ती माणसाच्या अपरोक्ष करतात. त्यांच्यात बंधुभाव आहे (ते स्वत:चा उल्लेख कलेक्टिव्ह किंवा गट असा करतात). ते आपला नेता निवडतात. त्याचे म्हणणे ऐकतात आणि वेळप्रसंगी बलिदानाची त्यांची तयारी आहे.

हगिंगफेस कंपनीने ओपन एआयच्या एआय एजंटनी आपल्या कंपनीला हॅक केल्याचे जाहीर केले. लगोलग ओपन एआयनेही हे मान्य केले. त्यानंतर एआय कंपन्यांची झोप उडाली. खरं तर झोप सरकारची उडायला हवी. फार पूर्वी लोकमान्यांनी एका ब्रिटिशांच्या अनागोंदीचे वर्णन करताना सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा प्रश्न विचारला होता. या सगळ्या प्रकरणाला अमेरिकन सरकार, प्रेसिडेंट ट्रम्प फार गंभीरपणे घेत आहे असे दिसत नाही. चीन तर हुकूमशहा आहे. त्यांची एआयच्या क्षेत्रात चाललेली घोडदौड अमेरिकेच्या बरोबरीने आहे. एआयवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते काय करत आहेत हे आपल्याला माहीत नाही. एआय कंपन्या अब्जाधीश आहेत. आज जगभरातली सरकारे त्यांच्या म्हणण्यात आहेत.

या घटनेनंतर जेकब कॉक्सन नावाच्या संशोधकाने अँथ्रोपिकमधून राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर त्याने एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट लिहिली आणि त्यात एआयला आत्ताच थोपवले नाही तर येत्या दहा वर्षांत मानवी जात संपेल असा इशारा दिला. मुख्य म्हणजे ही धमकी चुकीची आहे असे खुद्द एआय कंपन्यांनाच वाटत नाही. अँथ्रोपिकमध्ये काम करणाऱ्या एका संशोधकाने त्याला दुजोरा दिला. अँथ्रोपिकचा प्रमुख दारियो अमोदेय, ओपन एआयचा प्रमुख सॅम अल्टमन, ग्रोकचा प्रमुख एलॉन मस्क सगळे म्हणत आहेत की, एआयचा तारू थोपवला नाही तर एआय माणसाच्या नियंत्रणातून सुटू शकेल. या सगळ्यांची मागणी आहे की, जागतिक समुदायाने एकत्र येऊन एआयला थोपवले पाहिजे, नियमावली कडक केली पाहिजे. एआयचा विकास करताना नैतिकतेला समोर ठेवले पाहिजे वगैरे वगैरे.

प्रश्न असा आहे की, सरकारी तेही सगळ्या जगातल्या सरकारांनी एकत्र येऊन काही करेपर्यंत एआय किती पुढे निघून जाणार आहे? एआयच्या विकासाचा वेग अफाट आहे आणि जगात नाकर्ती आणि बेजबाबदार सरकारे जास्त प्रमाणात आहेत. खरं तर अमेरिका आणि चीन या दोन देशांनी या बाबतीत एकत्र आले पाहिजे. आज एआयवर अनेक गोष्टी अवलंबून आहेत, मग ती आरोग्य यंत्रणा असो वा समाज माध्यमे. जगात वेगवेगळ्या स्तरावर काम करणारी एआय एकत्र येऊ नये आणि आली तर ती एकाच वेळी बंद करण्याची व्यवस्था नाही. हे किल स्विच (एआयला बंद पाडणारे बटण) तयार कसे करायचे हाही प्रश्न आहेच, कारण माणसाच्या इतिहासात अशी वेळ कधी आली नव्हती.

भक्ती चपळगावकर
bhalwankarb@gmail.com

Read About: Captain Tatsunosuke Ariizumi
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Loading comments...