Captain Tatsunosuke Ariizumi : कॅप्टन तात्सुनोसुके अरिझुमी यांनी आय-८ ची कमान स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली ही पाणबुडी क्रूर युद्ध गुन्ह्यांमुळे प्रचंड कुप्रसिद्ध झाली. मालवाहू जहाज बुडवण्याच्या घटनांमध्ये, जहाजांवर टॉर्पेडो हल्ला केल्यानंतर अरिझुमीने त्यावरच्या वाचलेल्या कर्मचाऱ्यांना पाणबुडीच्या डेकवर गोळा करण्याचा आदेश दिला आणि तिथे त्यांना विविध प्रकारे छळण्यात आलं.
ही गोष्ट आहे १९४४ मधली. एसएस टिजिसालाक हे ५,७८७ टन वजनाच्या डच मालवाहू जहाजावर प्रवासी निवासाची सोय होती. टिजिसालाक १९१७ मध्ये जावा-चीन-जपान या दरम्यानच्या प्रवासासाठी बांधलं गेलं होतं. दुसऱ्या महायुद्धादरम्यान मित्र राष्ट्रांनी ऑस्ट्रेलिया व सिलोनदरम्यान हिंद महासागरातून रसद पोहोचवण्यासाठी त्याचा वापर केला होता. एकदा ते पीठ आणि टपालाचा माल घेऊन मेलबर्नहून कोलंबोला प्रवास करत होतं. जहाजावर डच, चिनी, इंग्रज असे ८० खलाशी होते. तसंच चार इंची तोफ चालवणारे रॉयल नेव्हीचे दहा तोफची होते आणि पाच प्रवासी होते. आपले जहाज गमावल्यानंतर भारतात परतणारे २२ तस्कर खलाशी होते. जहाजाचा १९ दिवसांचा प्रवास झाला होता. तेव्हा पर्थहून आलेल्या एका असामान्य वायरलेस संदेशामुळे जहाजाचा कॅप्टन गोंधळला आणि इंधन वाचवण्यासाठी त्याने आपला मार्ग बदलून १० नॉट्स वेगाने प्रवास सुरू केला. पण, हीच चूक ठरली.
६ मार्च १९४४ रोजी सकाळी ५:४५ वाजता जपानी पाणबुडी आय-८ ने सोडलेल्या टॉर्पेडोने तिला धडक दिली. टॉर्पेडो म्हणजे नौदल सुरुंग. हे पाण्याखालील एक दूर पल्ल्याचं शस्त्र असतं. जे पाण्याच्या पृष्ठभागावर किंवा खाली स्वयंचलितपणे लक्ष्याच्या दिशेने प्रक्षेपित केलं जातं. यात एक स्फोटक वॉरहेड असतं. ते लक्ष्याच्या संपर्कात येताच स्फोट घडवण्यासाठी तयार केलेलं असतं.
स्फोटामुळे जहाजावरचा एक प्रवासी जागीच ठार झाला. जहाज डाव्या बाजूला कलायला लागलं. कप्तानानं सर्वांना जहाज सोडण्याचा आदेश दिला. बहुतेक कर्मचाऱ्यांनी आज्ञा पाळली. जहाजातील छोट्या बोटी आणि जीवनरक्षक तराफ्यांमधून ते निघाले. पण, ब्रिटिश तोफचालक आणि डच तोफ कमांडर, सेकंड ऑफिसर डेकर मात्र हल्ला करणारी जपानी पाणबुडी दिसण्याची वाट पाहत जहाजावरच थांबले. त्यांनी पाणबुडीवर गोळीबार सुरू केला, पण आय-८ ने आपल्या डेकगनने त्यांना प्रत्युत्तर दिलं. मग मात्र तोफचींना जहाज सोडावं लागलं. जे जहाजाच्या बोटी आणि जीवनरक्षक तराफ्यांमधून निघाले होते, त्या सगळ्यांना जपानी सैनिकांनी गोळा केलं. त्यांना आय-८ च्या डेकवर ठेवलं. जहाजाच्या कॅप्टन हेनना जपानी कमांडर तात्सुनोसुके अरिझुमी यांच्याशी चर्चा करण्यासाठी कॉनिंग टॉवरमध्ये जाण्याचा आदेश दिला. वाचलेल्यांनी सांगितलं की, हेन ‘नाही, नाही, मला माहीत नाही’ असं ओरडत होते. त्याच क्षणी, एक चिनी खलाशी पाण्यात घसरला. त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. एवढं करून ते थांबले नाहीत.
जपानी सैनिकांनी वाचलेल्यांच्या जोड्या लावल्या आणि त्यांना तसं एकत्र बांधलं. मग त्यांना कॉनिंग टॉवरच्या मागच्या बाजूला नेलं. तिथे त्यांच्यावर विविध शस्त्रांनी हल्ला केला. तसा हल्ला होत असताना चार जणांनी पाणबुडीतून उडी मारली. त्यावेळी कॉनिंग टॉवरच्या मागे तीन जपानी खलाशी अंदाधूंद गोळीबार करत होते. पण, त्यातूनही ते बचावले हे एक आश्चर्य होतं. जपानी सैनिकांनी सुमारे वीस कैद्यांना सोडून बाकी सर्वांना ठार मारलं. त्यांनी उरलेल्यांना एका लांब दोरीने बांधलं. त्यांना जहाजावरून समुद्रात ढकललं आणि बुडवलं. दोरीला लटकलेला तो शेवटचा माणूस स्वत:ला सोडवून घेऊ शकला. वाचलेले लोकं खुल्या महासागरातून अनेक मैल पोहत जहाज बुडलेल्या ठिकाणी परत गेले. तिथे त्यांना एक जीवनरक्षक तराफा सापडला. तीन दिवसांनंतर त्यांना दूरवर एक आकृती दिसली. ती त्यांच्या जवळ येत होती. ते एक अमेरिकन लिबर्टी जहाज होतं. लिबर्टी जहाजावरच्यांनी चुकून त्या वाचलेल्या लोकांवर क्षणभर गोळीबार केला. पण, नंतर लगेच त्यांना ते शत्रू नसल्याची जाणीव झाली. मग मात्र त्यांनी या लोकांना कोलंबोला नेलं.
व्यापारी खलाशी असल्याने, त्जिसलक येथील वाचलेले लोक ब्रिटिश लष्करी आणि नागरी अशा दोन्ही रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी अपात्र होते आणि त्यांना स्वत:च्या खर्चाने राहण्याची सोय करावी लागली. एवढा हल्ला करणारी ही जपानी पाणबुडी आय-८ चं काम शत्रूच्या बंदरांवर हवाई टेहळणी मोहीम राबवण हे होतं. जपान आणि युरोपदरम्यान युद्धकाळात यशस्वीपणे ये-जा करणारी ती एकमेव पाणबुडी ठरली. १९४४ च्या सुरुवातीला हिंद महासागरातून माल वाहून नेणाऱ्या, संरक्षणाशिवाय असलेल्या व्यापारी जहाजांवर टॉर्पेडो हल्ला करून मित्र राष्ट्रांच्या पुरवठा मार्गांमध्ये व्यत्यय आणणं असा त्यांना आदेश होता. कॅप्टन तात्सुनोसुके अरिझुमी यांनी आय-८ ची कमान स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली ही पाणबुडी क्रूर युद्ध गुन्ह्यांमुळे प्रचंड कुप्रसिद्ध झाली. मालवाहू जहाज बुडवण्याच्या घटनांमध्ये, जहाजांवर टॉर्पेडो हल्ला केल्यानंतर अरिझुमीने त्यावरच्या वाचलेल्या कर्मचाऱ्यांना पाणबुडीच्या डेकवर गोळा करण्याचा आदेश दिला आणि तिथे त्यांना छळण्यात आलं. मग गोळ्या घालून वा बुडवून किंवा तलवारीने वार करून त्यांना ठार मारण्यात आलं.
अरिझुमीने हे विकृत हल्ले करण्याचा निर्णय घेतला. पण, हे अत्याचार ही केवळ क्रूर कृत्यं नव्हती तर शत्रूची जहाजं आणि त्यावरील माल बुडवून थांबू नका, शत्रूच्या जहाजावरील खलाशांचाही त्याचवेळी पूर्ण खातमा करा असा लष्करी आदेश होता. टॉर्पेडोने हल्ला केलेल्या जहाजातील प्रत्येक व्यक्तीची हत्या करून अरिझुमीने अशी खात्री करून घेतली की संकटकालीन संदेश प्रसारित करण्यासाठी, पाणबुडीच्या स्थानाची माहिती देण्यासाठी किंवा मित्र राष्ट्रांच्या पाणबुडीविरोधी गस्ती पथकांना गुप्त माहिती पुरवण्यासाठी कोणीही साक्षीदार शिल्लक राहणार नाही. त्यानंतर त्याला पाणबुडी बुडवायची होती. ऑगस्ट १९४५ मध्ये जपानने शरणागती पत्करल्यावर आय-८ वरील आपल्या नोंदवलेल्या युद्ध गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा होईल हे लक्षात आल्यावर पाणबुडी टोकियो खाडीत नांगरण्यापूर्वीच अरिझुमीने आपल्या केबिनमध्ये आत्महत्या केली आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा मृतदेह समुद्रात फेकून दिला. त्यालाही शेवटी तेच मिळालं जे त्याने लोकांना केलं होतं.
स्मिता पोतनिस
संपर्क : ९८२०६११२०६

You need an account to post comments.