सत्यघटनेवर आधारित पर्यावरण आणि उद्योगविश्वाची थरारक कहाणी
मुंबई : Heavy Metal movie : तमिळनाडूतील निसर्गरम्य कोडाइकॅनाल परिसरातील पारा प्रदूषणाच्या गाजलेल्या प्रकरणावर आता रुपेरी पडदा उलगडणार आहे. अबंडैंशिया एंटरटेनमेंट आणि ऑलमाइटी मोशन पिक्चर या दोन निर्मिती संस्थांनी या सत्यघटनेवर आधारित ‘हेवी मेटल’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. पत्रकार-लेखक अमीर शाहुल यांच्या २०२३ मध्ये प्रकाशित झालेल्या शोधपत्रकारितेवरील पुस्तकावर हा चित्रपट आधारित असणार आहे.
‘हेवी मेटल : हाऊ अ ग्लोबल कॉर्पोरेशन पॉइझन्ड कोडाइकॅनाल’ या पुस्तकातून कोडाइकॅनालमधील पारा प्रदूषणाचा इतिहास, त्याचे पर्यावरणीय परिणाम आणि त्याविरोधात स्थानिकांनी दिलेला प्रदीर्घ लढा मांडण्यात आला आहे. याच कथानकाला आता चित्रपटाच्या माध्यमातून व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. हा चित्रपट औद्योगिक संघर्ष आणि पर्यावरणीय संकट यांची सांगड घालणारा शोधक थ्रिलर म्हणून साकारला जाणार आहे.
१९८३ मध्ये सुरू झालेली कहाणी
- या प्रकरणाची सुरुवात १९८३ मध्ये झाली. न्यूयॉर्कमधील पारा थर्मामीटर बनवणारी एक जुनी फॅक्टरी बंद झाली. त्यानंतर तिचे काम तमिळनाडूतील कोडाइकॅनाल येथे हलवण्यात आले. ही फॅक्टरी डोंगराळ भागात सुरू करण्यात आली.
- पुढे ही फॅक्टरी हिंदुस्तान युनिलीव्हर लिमिटेडच्या मालकीची आणि संचालनाखाली होती.
- पर्यावरणीय नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर २००१ मध्ये ही फॅक्टरी बंद करण्यात आली. त्यानंतर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये पारा विषबाधेची लक्षणे आणि त्याचे परिणाम समोर आल्याचा दावा करण्यात आला.
तब्बल १५ वर्षांचा संघर्ष
कारखाना बंद झाल्यानंतरही या प्रकरणाची धग कायम राहिली. स्थानिक नागरिकांनी पर्यावरणीय संघटना, ग्रीनपीस आणि विविध जनहित संस्थांच्या मदतीने कंपनीविरोधात दीर्घकाळ संघर्ष केला. जवळपास १५ वर्षे सुरू असलेल्या या लढ्यानंतर कंपनीने सुमारे ६०० माजी कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई दिल्याचे सांगितले जाते. हा समझोता अघोषित स्वरूपाचा असून, याच संघर्षाची मानवी बाजू ‘हेवी मेटल’मध्ये ठळकपणे मांडली जाणार आहे. केवळ एका कंपनीविरोधातील संघर्ष म्हणून नव्हे, तर औद्योगिक प्रदूषणाचा मानवी जीवनावर, आरोग्यावर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
कलाकार आणि दिग्दर्शकाची घोषणा लवकरच
- ‘हेवी मेटल’साठी कलाकारांची निवड सध्या सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक कोण असतील आणि प्रकल्पाशी संबंधित इतर तपशीलांची घोषणा आगामी काळात करण्यात येणार आहे.
- ऑलमाइटी मोशन पिक्चरच्या आगामी प्रकल्पांमध्ये वास्तविक घटना, व्यक्ती आणि संस्थांपासून प्रेरणा घेतलेल्या कथांचा समावेश आहे. निर्मिती संस्थेने अलीकडेच ‘मेड इन इंडिया : ए टायटन स्टोरी’ या स्ट्रीमिंग मालिकेसाठीही सहकार्य केले होते.
- दरम्यान, अबंडैंशिया एंटरटेनमेंटने ‘एअरलिफ्ट’, ‘शेरनी’, ‘छोरी’ आणि ‘जलसा’ यांसारख्या चित्रपटांसह ‘ब्रीद’ आणि ‘ब्रीद : इनटू द शॅडोज’ यांसारख्या वेबसीरिजची निर्मिती केली आहे.
- कोडाइकॅनालच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमागे दडलेली प्रदूषणाची आणि संघर्षाची ही कहाणी ‘हेवी मेटल’च्या माध्यमातून पडद्यावर कितपत प्रभावीपणे उभी राहते, याकडे आता चित्रपटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Read About : Sonarika Katrina Trolling : कतरिनाच्या ट्रोलिंगवर सोनारिकाचा पलटवार
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.