चहाच्या टपरीत घेतला गळफास
नवी दिल्ली : Surendra Koli Death : २००६ मधील बहुचर्चित निठारी हत्याकांडातील शेवटच्या प्रकरणात निर्दोष मुक्त झालेला सुरेंद्र कोली याने शुक्रवारी हरिद्वारमध्ये आत्महत्या केली. भूपतवाला परिसरातील लालमाता मंदिराजवळील चहाच्या टपरीत त्याचा मृतदेह आढळून आला. गेल्या काही महिन्यांपासून कोली याच परिसरात राहत आणि चहाची टपरी चालवत होता.
पोलिसांना शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीने गळफास घेतल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक आणि न्यायवैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे दिसून येत असले तरी घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडलेली नाही. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा आणि शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
सर्वोच्च न्यायालयातून सुटका होऊन वर्षही झाले नव्हते
- सुरेंद्र कोलीची नोएडातील मुलांच्या आणि तरुण महिलांच्या बेपत्ता होण्याशी संबंधित निठारी प्रकरणात अटक करण्यात आली होती. २००६ मध्ये अटक झाली तेव्हा त्याचे वय ३० वर्षे होते. नोएडातील व्यावसायिक मोनिंदर सिंह पंढेर यांच्या घरात तो घरगुती मदतनीस म्हणून काम करत होता.
- निठारी प्रकरणातील विविध खटल्यांत कोलीला दोषी ठरवून अनेक वेळा मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, पुढील न्यायालयीन प्रक्रियेत त्याच्यावरील दोषसिद्धीला धक्के बसत गेले.
निठारीत मानवी अवशेष सापडल्याने खळबळ
- डिसेंबर २००६ मध्ये नोएडाच्या सेक्टर ३१ मधील डी-५ बंगल्याजवळील नाल्यात मानवी सांगाडे, कवट्या आणि हाडे आढळून आली. परिसरातील अनेक मुले आणि तरुण महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही धक्कादायक माहिती समोर आली होती.
- मानवी अवशेष सापडल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. त्यानंतर सुरेंद्र कोली आणि मोनिंदर सिंह पंढेर यांना अटक करण्यात आली. सुरुवातीचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडून करण्यात आला; त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.
१३ प्रकरणांत दोषी; १२ प्रकरणांत सुटका
खटल्यांच्या सुनावणीदरम्यान कोलीला एकूण १३ प्रकरणांत दोषी ठरवण्यात आले होते. मात्र, ऑक्टोबर २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याची १२ प्रकरणांत निर्दोष मुक्तता केली. याचवेळी पंढेर याचीही दोन प्रकरणांत निर्दोष मुक्तता करण्यात आली. या प्रकरणांमध्ये कोलीच्या कबुलीजबाबासह महत्त्वाच्या पुराव्यांच्या विश्वासार्हतेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले होते. पुढील न्यायालयीन प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयानेही त्याची निर्दोष मुक्तता कायम ठेवली.
२०२५ मध्ये शेवटच्या प्रकरणातूनही दोषमुक्त
निठारी हत्याकांडाशी संबंधित शेवटच्या प्रलंबित प्रकरणात नोव्हेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कोलीची निर्दोष मुक्तता केली आणि त्याच्या सुटकेचे आदेश दिले. जवळपास दोन दशके तुरुंगात राहिल्यानंतर तो तुरुंगाबाहेर आला होता. सर्व प्रकरणांतून न्यायालयीन सुटका झाल्यानंतर काही महिन्यांनीच हरिद्वारमध्ये त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांचा तपास सुरू आहे.
Read About : 30-30 Scam : ३०-३० घोटाळ्यातील आरोपीचे कारमध्ये कोंबून फिल्मी स्टाईल अपहरण!
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.