अजय देवगण उतरला जुहूच्या समुद्रकिनाऱ्यावर, विसर्जनानंतर जुहू बीचवर स्वच्छता मोहीम, अमृता फडणवीससह विद्यार्थी, स्वयंसेवक आणि मुंबईकरांचा सहभाग
मुंबई : Juhu Beach cleanup after Ganpati Visarjan -2026 गणपती बाप्पाला निरोप दिला आणि उत्सवाची लगबग संपली, पण समुद्रकिनाऱ्यावर राहिलेला कचरा मुंबईच्या पर्यावरणापुढे नवा प्रश्न उभा करून गेला. याच प्रश्नाला हात घालण्यासाठी शनिवारी जुहू समुद्रकिनारा गजबजला. अभिनेता अजय देवगण स्वत: स्वच्छता मोहिमेत सहभागी झाला आणि अमृता फडणवीस यांच्यासह अनेकांनी समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी हातभार लावला. दिव्यज फाउंडेशनने मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांच्या सहकार्याने जुहू बीचच्या ‘अ’ प्रवेशद्वाराजवळ ‘समुद्रकिनारा स्वच्छता २०२६’ ही मोठी मोहीम राबवली. गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेला कचरा हटवण्यासोबतच नागरिकांमध्ये समुद्राची स्वच्छता आणि पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचा या मोहिमेचा उद्देश होता.
अभिनेता थेट मैदानात, हातात स्वच्छतेची साधने
चित्रपटाच्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता अजय देवगण यावेळी वेगळ्याच भूमिकेत दिसला. समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी तो प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी झाला. स्वच्छ समुद्रकिनारा ही केवळ एखाद्या संस्था किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्याने सांगितले. लोकांनी एकत्र येऊन काम केले तर बदल घडू शकतो, असा संदेशही त्याने दिला.
‘एक दिवस नाही, सवय हवी’ – अमृता फडणवीस
या मोहिमेच्या प्रमुख अमृता फडणवीस यांनी गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेल्या कचऱ्याकडे लक्ष वेधले. पर्यावरण रक्षण हे केवळ एखाद्या मोहिमेपुरते मर्यादित न राहता रोजच्या जीवनाचा भाग बनले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. विशेषत: तरुणांनी पर्यावरणाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे आणि स्वच्छता मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सांगितले की, आपले सण आणि परंपरा जपतानाच पर्यावरणाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
समुद्र मुंबईची ओळख, स्वच्छ ठेवण्याची जबाबदारीही मुंबईकरांची
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनीही समुद्रकिनारा स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. मुंबईचे सौंदर्य आणि ओळख समुद्राशी जोडलेली आहे. त्यामुळे समुद्र आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे रक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. तरुण पिढीमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश होता.
विद्यार्थी, स्वयंसेवक आणि संस्था एकाच कामासाठी एकत्र
विद्यार्थी, स्वयंसेवक आणि संस्था एकाच कामासाठी एकत्र
या स्वच्छता मोहिमेत शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता करण्यासोबतच ‘कचरा करू नका’ असा संदेश देणारे कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रमही घेण्यात आले. दिव्यज फडणवीस यांनीही या मोहिमेत सहभागी होत शहर आणि समुद्राच्या स्वच्छतेसाठी प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.
फुलांऐवजी रोपांनी सत्कार
पर्यावरणाचा संदेश केवळ भाषणापुरता न ठेवता कार्यक्रमात त्याची अंमलबजावणीही करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा सत्कार फुलांच्या गुच्छांऐवजी हिरवी रोपे देऊन करण्यात आला. आरोग्य आणि पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. मिकी मेहता यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
गणपती विसर्जनानंतर पुन्हा एकदा पर्यावरणाचा मुद्दा
२५ सप्टेंबरला गणपती विसर्जनानंतर दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जुहू समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या या मोहिमेने उत्सव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध पुन्हा अधोरेखित केला.
गणपतीला निरोप दिला, आता समुद्राची काळजी घेऊया
जुहूच्या वाळूत पडलेला कचरा उचलण्यासाठी अनेक हात पुढे आले. काही तासांच्या या स्वच्छता मोहिमेने मात्र एक मोठा संदेश दिला—सण साजरे करणे आपली परंपरा आहे. पण त्या सणानंतर निसर्गाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. समुद्र स्वच्छ ठेवायचा असेल, तर सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करायला हवी.
Read About : IIFA Awards 2027 : अबुधाबीत रंगणार आयफाचा झगमगता सोहळा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.