नेपाळमधील भीषण फ्लॅश फ्लडमध्ये मृतांची संख्या 1,204 वर; सुमारे 3,900 जणांशी अद्याप संपर्क नाही

काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण अचानक पूरस्थितीमुळे मृतांचा आकडा 1,204 वर पोहोचला असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती जोखीम न्यूनीकरण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDRRMA) दिली आहे. बुधवारी काठमांडू येथे झालेल्या पाचव्या दैनंदिन पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लोक बहादूर छेत्री यांनी बचाव आणि मदतकार्याची माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 11,993 जणांची सुटका करण्यात आली असून 1,114 मृतदेह सापडले आहेत. सुमारे 3,900 जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. बेपत्ता व्यक्तींच्या कुटुंबीयांनी ओळख पटविण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक नमुने नेपाळ पोलिस रुग्णालय किंवा जवळच्या जिल्हा पोलिस कार्यालयात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पूरग्रस्तांच्या अंत्यसंस्कारासाठी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था करण्यात येत असून, शोध आणि बचाव मोहीम दिवस-रात्र सुरू असल्याचे छेत्री यांनी सांगितले.

या आपत्तीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही नेपाळला मदत मिळत आहे. भारतातील 19 सदस्यीय फॉरेन्सिक पथक नेपाळ पोलिसांसोबत ओळख पटविण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करत आहे. चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया येथूनही विशेष पथके आणि आवश्यक उपकरणांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नेपाळी सेना, नेपाळ पोलिस आणि सशस्त्र पोलिस दलाचे बचाव पथक विविध भागांमध्ये कार्यरत आहे. भारत, चीन आणि दक्षिण कोरियातील तज्ज्ञांच्या सहकार्याने काही जलविद्युत प्रकल्प परिसरातील चिखल आणि दगड हटविण्याचे काम सुरू आहे. लांगटांग, चिलीमे आणि अपर त्रिशूली या भागांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

आतापर्यंत 300 हून अधिक परदेशी नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. मात्र, 34 देशांतील सुमारे 590 परदेशी नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.

चीनच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कैलास पर्वत यात्रेवरून परतणाऱ्या सुमारे 2,500 यात्रेकरूंच्या स्थलांतराची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. हिल्सा आणि तातोपानी सीमाप्रवेश मार्ग तसेच ल्हासा हवाई मार्गाच्या माध्यमातून या नागरिकांच्या परतीसाठी प्रयत्न करण्यात आले. केरुंग सीमेजवळ अडकलेल्या मालवाहतुकीसह नागरिकांसाठीही आवश्यक व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांनी संसदेत बोलताना 26 ऑगस्ट रोजी भोटेकोशी नदी परिसरात आलेल्या या आपत्तीमुळे हिमालयीन भागातील वाढत्या हवामानविषयक धोक्यांकडे लक्ष वेधले असल्याचे सांगितले. रासुवा, नुवाकोट आणि धादिंग जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक बेपत्ता असल्याने शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.

भारत, चीन, अमेरिका, जपान, आशियाई विकास बँक, जागतिक बँक, युरोपियन युनियन आणि संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या मदतीने नेपाळ सरकारकडून तातडीची मदत, बचावकार्य, बेपत्ता नागरिकांचा शोध आणि दीर्घकालीन पुनर्वसनासाठी सर्व उपलब्ध संसाधने वापरली जात आहेत.