सणासुदीपूर्वी व्यावसायिक गॅस महागला; घरगुती सिलिंडरचे दर मात्र स्थिर
नवी दिल्ली : LPG Price Hike : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने ग्राहक आणि व्यावसायिकांना महागाईचा फटका बसला आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत शहरानुसार ६० ते ७१.५० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत ६२.५० रुपयांनी वाढून २,८१० रुपये झाली आहे. सप्टेंबरमध्येही या सिलिंडरच्या दरात ९.५० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस महागला आहे.
देशातील विविध शहरांमध्ये दरवाढीचे प्रमाण वेगवेगळे आहे. काही शहरांत ६० रुपयांनी, तर काही ठिकाणी ६६ ते ७१.५० रुपयांपर्यंत दर वाढले आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि अन्य व्यावसायिक वापरकर्त्यांना या दरवाढीचा परिणाम जाणवू शकतो.
पाटण्यात सर्वाधिक दरवाढ
१ ऑक्टोबर रोजी प्रमुख शहरांमध्ये पाटणा येथे व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सर्वाधिक ७१.५० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे १९ किलोच्या सिलिंडरची किंमत ३,०२९ रुपयांवरून ३,१००.५० रुपयांवर पोहोचली आहे.
लेहमध्ये सिलिंडर सर्वाधिक महाग
लडाखमधील लेह येथे व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर सर्वाधिक आहेत. येथे १९ किलोच्या सिलिंडरच्या किमतीत ६४.५० रुपयांची वाढ झाली असून, नवीन दर ३,४५० रुपये झाला आहे.
घरगुती सिलिंडरचे दर स्थिर
व्यावसायिक सिलिंडर महागले असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती सिलिंडरचा दर ९४२ रुपये, मुंबईत ९४१.५० रुपये आणि चेन्नईत ९५७.५० रुपये आहे. पाटण्यात १,०३१.५० रुपये, तर लखनौमध्ये ९७९.५० रुपये दर कायम आहेत.
Read About : Whatsapp new rules – 1 ऑक्टोबरपासून व्यावसायिक मेसेजसाठी मोजावे लागणार शुल्क
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.