ह्युमनॉइड रोबोट चालवण्यासाठी तासाला २ ते १० डॉलर खर्चाचा अंदाज; मासिक सबस्क्रिप्शन, दुरुस्ती, चार्जिंग स्टेशन आणि इंटरनेटचा खर्चही महत्त्वाचा.
नवी दिल्ली : Humanoid Robot Cost Per Day मानवाप्रमाणे चालणारे, काम करणारे ह्युमनॉइड रोबोट आता केवळ विज्ञानकथेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. उद्योग आणि घरगुती कामांमध्ये ‘रोबोट घरगड्याचा’ वापर वाढण्याची शक्यता असताना, हे रोबोट दिवसभर चालवण्यासाठी नेमका किती खर्च येतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उपलब्ध उद्योगविषयक अंदाजांनुसार, विजेचा खर्च अत्यंत कमी असला, तरी देखभाल आणि सॉफ्टवेअरचा खर्च धरल्यावर गणित बदलते.
एका ह्युमनॉइड रोबोटला आठ तासांच्या कामाच्या शिफ्टमध्ये साधारण १ ते ३ किलोवॅट प्रति तास वीज लागते. व्यावसायिक वीजदरांनुसार यासाठी दिवसाला सुमारे ०.१२ ते ०.३६ डॉलर म्हणजेच अंदाजे १० ते ३० रुपये खर्च येऊ शकतो. मात्र, हा केवळ वीजेचा खर्च आहे.
तासाला एकूण २ ते १० डॉलरपर्यंत खर्च
देखभाल, सुटे भाग आणि सॉफ्टवेअर यांचा खर्च जोडल्यास २०२६ मधील उद्योगविषयक अंदाजानुसार, रोबोट चालवण्याचा एकत्रित खर्च तासाला २ ते १० डॉलर असू शकतो. प्रत्यक्ष खर्च रोबोटचा प्रकार, कामाचे स्वरूप आणि वापराच्या तीव्रतेवर अवलंबून असेल.
महिन्याच्या सबस्क्रप्शिनवर मिळणार रोबोट
रोबोट खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम खर्च करण्याऐवजी कंपन्या आता ‘रोबोट ॲस अ स र्व्हिस’ (आरएएएस-रास) या मॉडेलकडे वळत आहेत. या पद्धतीत रोबोटचा वापर ठरावीक मासिक शुल्क भरून करता येतो. थोडक्यात म्हणजे तो भाड्याने मिळू शकतो.
‘फिगर एआय’च्या हेवी-ड्युटी रोबोटसाठी महिन्याला सुमारे १,००० डॉलर खर्चाचा अंदाज दिला जातो. म्हणजेच दिवसाला साधारण ३३ डॉलर. तर ‘१ एक्स निओ’ या ह्युमनॉइड रोबोटसाठी महिन्याला ४९९ डॉलरचे सबस्क्रप्शिन नमूद केले आहे. हा खर्च दिवसाला सुमारे १६ डॉलर होतो. भारतीय चलनात तो अंदाजे १,४०० ते २,९०० रुपये प्रतिदिन ठरू शकतो. हे दर आणि उपलब्धता बाजारानुसार बदलू शकतात.
वार्षिक देखभालीचा खर्चही मोठा
रोबोट थेट खरेदी करणाऱ्या कंपन्यांना देखभालीसाठीही मोठी तरतूद करावी लागते. त्यातील ॲक्युएटर्स म्हणजे हालचाली घडवणारी यंत्रणा आणि सेन्सर्स झिजल्यामुळे दुरुस्ती किंवा बदल आवश्यक ठरू शकतात. हार्डवेअरच्या किमतीच्या वार्षिक १० ते १२ टक्के रक्कम देखभालीसाठी लागू शकते, असा अंदाज आहे.
चार्जिंग स्टेशन आणि इंटरनेटची गरज
रोबोट चालवण्यासाठी केवळ मशीन पुरेसे नसते. गोदामांमध्ये विशेष चार्जिंग स्टेशन उभारावे लागू शकतात. एका स्टेशनचा खर्च २,००० डॉलरपर्यंत जाऊ शकतो. याशिवाय रोबोटकडून सतत मिळणारी माहिती पाठवण्यासाठी सक्षम वाय-फाय नेटवर्कचीही गरज असते. त्यामुळे सुरुवातीच्या पायाभूत सुविधांचा खर्च वेगळा मोजावा लागतो.
मानवी श्रमांना पर्याय ठरणार?
दिवसाला सुमारे ३३ डॉलर खर्चात औद्योगिक रोबोट चालवता येत असेल, तर काही कंपन्यांसाठी तो आकर्षक पर्याय ठरू शकतो. विशेषत: पुनरावृत्तीची कामे, गोदामांतील हालचाली आणि ठराविक औद्योगिक प्रक्रिया यांत रोबोट उपयुक्त ठरू शकतात. मात्र, मानवी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत प्रत्यक्ष बचत किती होईल, हे कामाचा प्रकार, उत्पादकता, सुरक्षा आणि देखभालीचा खर्च यावर ठरेल. रोबोटला विश्रांतीची गरज नसली, तरी चार्जिंग, दुरुस्ती आणि देखरेखीची आवश्यकता कायम राहते.
एकूणच, ह्युमनॉइड रोबोटची वीज स्वस्त असली, तरी त्यांचा खरा खर्च संपूर्ण यंत्रणा चालवण्यात आहे. तंत्रज्ञान अधिक परवडणारे झाले आणि कार्यक्षमता वाढली, तर भविष्यात उद्योगांमध्ये रोबोटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
Read About : Artificial Cell 2026 : पूर्ण जीवनचक्र असणाऱ्या मानवनिर्मित पेशीची निर्मिती
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.