टाईप १ मधुमेहग्रस्त बालकांसाठी नियमित तपासणी | इन्सुलिन व्यवस्थापन आणि आहारविषयक मार्गदर्शनाची सुविधा
छत्रपती संभाजीनगर : Type 1 Diabetes Clinic टाईप १ मधुमेह असलेल्या बालकांना नियमित वैद्यकीय देखरेख, योग्य उपचार आणि मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे राज्यातील पहिले स्वतंत्र नियमित टाईप १ मधुमेह फॉलो-अप क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. ‘मधु स्नेह’ असे या विशेष क्लिनिकचे नाव असून, गुरुवारी (दि. १५) घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला घाटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, उपअधिष्ठाता डॉ. विनोद मुंदडा, बालरोग विभागप्रमुख डॉ. प्रभा खैरे, डॉ. अर्चना सारडा, डॉ. संपत सारडा, डॉ. सैफुद्दीन अब्बास, कुंदन रॉय यांची प्रमुख उपस्थिती होती.
टाईप १ मधुमेह हा बालकांच्या आरोग्याशी संबंधित दीर्घकालीन आजार असून, त्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी नियमित रक्तातील साखरेचे परीक्षण, इन्सुलिनचा योग्य वापर, संतुलित आहार आणि सातत्यपूर्ण वैद्यकीय देखरेख आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर ‘मधु स्नेह’ क्लिनिकच्या माध्यमातून मधुमेह असलेल्या बालकांना एकाच ठिकाणी नियमित तपासणी आणि आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बालकांसह त्यांच्या पालकांनाही या आजाराचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. ‘मधु स्नेह’ क्लिनिकमध्ये टाईप १ मधुमेह असलेल्या बालकांचे निदान, रक्तातील साखरेचे नियमित परीक्षण, इन्सुलिन व्यवस्थापन आणि आहारविषयक मार्गदर्शन यांवर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय मधुमेहाच्या नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बालकांना मानसिक आधार देणे आणि त्यांच्या दीर्घकालीन आरोग्याची देखरेख करणे यांसारख्या सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
टाईप १ मधुमेह असलेल्या बालकांना दैनंदिन जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे, इन्सुलिनचा योग्य वापर करणे, आहाराचे नियोजन करणे आणि नियमित वैद्यकीय तपासण्या करून घेणे या बाबी त्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असतात. अनेकदा या प्रक्रियेत बालकांसोबतच पालकांनाही मानसिक आणि व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत नियमित फॉलो-अप क्लिनिकमुळे बालकांच्या आरोग्याची सातत्याने देखरेख करणे आणि पालकांच्या शंकांचे निरसन करणे शक्य होणार आहे. बालकांना आणि त्यांच्या पालकांना मधुमेहाच्या स्वव्यवस्थापनासाठी सक्षम करणे, उपचारांबाबत जागरूकता वाढविणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘मधु स्नेह’ हे विशेष फॉलो-अप क्लिनिक दर शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहणार आहे. क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी बालकांमधील अशा प्रकारच्या आजारांसाठी योग्य वैद्यकीय मार्गदर्शन, आरोग्यविषयक शिक्षण आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास घाटी प्रशासन नेहमीच प्राधान्य देत असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा सेवांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
पालकांनी मांडले अनुभव
या कार्यक्रमात टाईप १ मधुमेह असलेल्या बालकाच्या पालक नसीमा शेख यांनी आपले अनुभव कथन केले. मधुमेह असलेल्या बालकांचे संगोपन करताना पालकांना येणाऱ्या विविध अडचणी, बालकांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्याची आवश्यकता आणि उपचारांबाबत सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. बालकांना नियमित वैद्यकीय देखरेख मिळणे, पालकांना उपचारपद्धतीची योग्य माहिती मिळणे आणि दैनंदिन जीवनात मधुमेहाचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘मधु स्नेह’सारख्या स्वतंत्र क्लिनिकमुळे मधुमेह असलेल्या बालकांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो, अशी भावना या अनुभवकथनातून व्यक्त झाली.
Read About : Spices Adulteration Rules : महाराष्ट्रात सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी, पॅकिंगवरील माहिती लपवल्यासही कारवाई
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.