Ad Advertisement Ad Advertisement

West Indies T20 Series to Be Decided Today- वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेचा आज फैसला

भुवनेश्वरचे टीम इंडियात पुनरागमन! दुखापतग्रस्त अर्शदीपच्या स्थानावर खेळणार

बंगळुरू : West Indies T20 Series to Be Decided Today वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेचा फैसला ठरवणाऱ्या शनिवार,17 ऑक्टोबरच्या निर्णायक अंतिम आणि पाचव्या सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. खांद्याच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या अर्शदीप सिंगच्या स्थानावर निवड समितीने त्याची ऐनवेळी निवड केली आहे. ३६ वर्षीय भुवनेश्वरमुळे विंडीजच्या धडाकेबाज फलंदाजांना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रोखले जाऊ शकते.

हैदराबादमध्ये विंडीजविरुद्धच्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजी करताना उसळता चेंडू अर्शदीप सिंगच्या हात आणि बाहूला जाऊन आदळला. चेंडू लागल्यानंतर प्रचंड वेदनेने तो त्रासलेला दिसला आणि त्याला मैदान सोडावे लागले. या दुखापतीमधून सावरण्यासाठी त्याला किमान तीन आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. निवड समितीने या परिस्थितीत मालिकेतील निर्णायक लढतीसाठी भुवनेश्वरला पसंती दर्शवली. न्यूझीलंड दौऱ्यातील क्राइस्टचर्च येथे सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भुवनेश्वरची या अगोदर भारतीय संघात निवड करण्यात आली होती. मात्र, अर्शदीपच्या दुखापतीमुळे निवड समितीने तातडीने त्याचा बंगळुरू येथील सामन्यात समावेश केला.

यामुळे भुवनेश्वरचा चार वर्षांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आहे. या परिस्थितीत भुवनेश्वरच्या समावेशामुळे गोलंदाजांची बाजू वरचढ होऊ शकते, कारण गत चार टी-२० सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची येथेच्छ धुलाई केली आहे. भारतीय व्यवस्थापन बंगळुरूची खेळपट्टी लक्षात घेत फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला संघात परत आणू शकते. भुवनेश्वर आपले सहकारी प्रिन्स यादव, मयंक यादव, नमन धीर आणि नितीश कुमार रेड्डी यांचा आत्मविश्वास वाढवू शकतो. हैदराबादमध्ये पराभव झाल्यास कर्णधार म्हणून श्रेयसच्या प्रतिमेला धक्का बसेल, कारण आयर्लंड आणि इंग्लंडकडून पराभव पत्करल्यानंतर त्याने झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तानला नमवून आत्मविश्वास मिळवला आहे.

भुवनेश्वरची नवीन चेंडूची गोलंदाजी आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळण्याचा त्याचा अनुभव, आक्रमकपणे फलंदाजी करणाऱ्या विंडीजचा कर्णधार शाई होपला रोखण्यासाठी भारताला उपयुक्त ठरू शकतो. होप या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. चार सामन्यांमध्ये दोन शतकांसह त्याने २६१ धावा काढल्या आहेत. पाहुण्या संघाकडून कर्णधार शाई होपनंतर शेर्फेन रदरफोर्ड (२२१ धावा) सातत्य राखले आहे. इंदूरमधील तिसऱ्या टी-२० सामन्याप्रमाणेच भारताला या दोघांनाही पॉवरप्लेमध्ये बाद करावे लागेल.

मधल्या फळीवर दबाव

संजू सॅमसन (१५२ धावा) आणि अभिषेक शर्मा (१३९) यांनी आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावली आहेत; परंतु सलामीची जोडी म्हणून त्यांचे योगदान अनुक्रमे २९, ४२, ७ आणि ६० असे राहिले आहे. हैदराबादमधील ६० धावांच्या भागीदारीत सॅमसनच्या ५६ धावांचा समावेश आहे, तर अभिषेकला केवळ दोन धावांचे योगदान देता आले. एकदा सलामीची जोडी बाद झाली की, मधली फळी डाव सावरू शकत नाही, असे चित्र दिसून आले आहे. मधल्या फळीतील ईशान किशन (१२३), कर्णधार श्रेयस अय्यर (१५९) आणि तिलक वर्मा (११५) या प्रमुख फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.

आयपीएलमध्ये बंगळुरूकडून चमक

उत्तर प्रदेशचा भुवनेश्वर आपला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २२ नोव्हेंबर २०२२ रोजी नेपियर येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. योगायोगाने भुवनेश्वरचे पुनरागमन पदार्पण करणाऱ्या मैदानावर होईल, कारण २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने ४ षटकांत ९ धावा देऊन ३ बळी घेतले होते. भारतीय संघातून दीर्घकाळ दूर राहिल्यानंतर भुवनेश्वरने २०२५, २०२६ च्या आयपीएल हंगामात एक प्रभावी गोलंदाज म्हणून स्वत:ला पुन्हा स्थापित केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (आरसीबी) दोन हंगामांत त्याने ३० सामन्यांमध्ये ४५ बळी घेतले.

खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल

एम. चिन्नास्वामी स्टेडियमची सपाट खेळपट्टी फलंदाजांसाठी स्वर्ग मानली जाते. मात्र, ऑक्टोबर २०२४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीनंतर या मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेलेले नाही. काही आयपीएल सामने वगळता येथे कोणतेही मोठे सामने खेळले गेले नाहीत.

स्थळ : बंगळुरू, वेळ : सायंकाळी ७ वाजात, प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स समूह

    Read About : Asian Games 2026 : ट्रीसा-गायत्रीचा वर्ल्ड नंबर-3 जोडीला धक्का
    E-Paper: Punyanagari E-Paper

    Comments

    Comments will appear here.

    Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.