Ad Advertisement Ad Advertisement

Diwali firecracker restrictions : सर्वे सन्तु निरामया:!

Diwali firecracker restrictions : शांतता आणि सुरक्षितता हे सामान्य समाजाच्या हक्काचे सर्वोच्च प्राधान्याचे मुद्दे आहेत. लोकशाही राष्ट्रात प्रत्येक नागरिकास सुरक्षित जगण्याची हमी मिळाली पाहिजे आणि त्याच्या आश्वस्त जगण्यासाठी शांततेची स्थिती सातत्याने जपली गेली पाहिजे अशी अपेक्षा असते. त्यामुळे या हक्कास कळत किंवा नकळतही धक्का लागत असेल तर त्याविरुद्ध संघर्ष करण्याची मुभा प्रत्येक सामान्य नागरिकास असावयास हवी. ती मुभा आपल्या देशात मिळते, हे या लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. अलीकडेच पार पडलेल्या गणेशोत्सवाच्या काळात त्याची खात्री समाजास पटली. परंपरांचा मुलामा चढविलेल्या काही अनावश्यक प्रथा सण-उत्सवांच्या साजरेपणातून हद्दपार केल्या पाहिजेत, यावर सामाजिक मतैक्य झाल्याचे त्या वेळी पाहावयास मिळाले.

गणेशोत्सवकाळात मानसिक आणि शारीरिक आरोग्यास अपायकारक ठरू शकेल अशा कर्णकर्कश ध्वनीच्या गदारोळास आळा घालण्याची हिंमत करून सामान्यांच्या हक्काची व्यापक जाणीव करून देण्याकरिता एक सामान्य नागरिक समोर आला आणि त्याने व्यापक उत्सवप्रियतेस आव्हान देत उत्सवकाळातील आवाजाच्या अतिरेकाविरुद्ध दंडदेखील थोपटले, तेव्हा समाजात त्याचे मोठे कौतुक झाले होते. म्हणजेच अनावश्यक असलेल्या बाबी केवळ प्रथांच्या नावाखाली व परंपरांचा मुलामा देऊन पुढे चालू ठेवाव्यात असे कोणास वाटत नाही हे स्पष्ट झाले. याआधी समाजातील अशा अनेक अनिष्ट प्रथा आणि रूढी पुसून कालसुसंगत पुरोगामीत्वाचा स्वीकार करण्याची मानसिकता असलेल्या बहुसंख्य समाजाने कर्णकर्कश आवाजाचे प्रदूषण थांबविण्यासाठी सकारात्मक सहभाग दर्शवावा हे समाजाच्या जाणिवा प्रगल्भ असल्याचे लक्षण होते.

गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात उमटलेल्या त्या एकट्या आवाजाला साथ देऊन समाजाने त्याचे दर्शन घडविलेदेखील होते. पण, या मागणीला जोडून जेव्हा नवनवी मते पुढे येऊ लागली आणि प्रथा परंपरांना दर्शविला जाणणारा विरोध सण-उत्सवांच्या विरोधापर्यंत जाऊन पोहोचला, तेव्हा मात्र या सुधारणावाद्यालाच विरोध होऊ लागला आणि फारसे काही हाती न लागताच, ध्वनिप्रदूषणाच्या विरोधातील ती मोहीम संथपणे थंडावू गेली. त्या एकाच मुद्द्यावर व्यापक जनमत आणि सहमती तयार होत असताना त्यास नाहक फुटत गेलेले अन्य मतांचे फाटे एका चांगल्या मोहिमेच्या मुळावर आले असेच त्यावरून स्पष्ट झाले असले, तरी समाजहितास घातक किंवा आरोग्य आणि शांततेत अपायकारक असणाऱ्या प्रथा कवटाळून बसण्यात कोणासही फारसा रस नाही यावर मात्र शिक्कामोर्तब झाले होते.

गणेशोत्सवासारख्या उत्सवकाळातील ध्वनिप्रदूषणाबाबत असे व्यापक विचारमंथन सुरू झाल्यामुळेच, आता बदलाच्या प्रक्रियेचे पुढचे पाऊल पडले आहे. कदाचित ध्वनिप्रदूषणाबाबत सामाजिक सहमतीचे संकेत मिळाल्यामुळेच, सण-सोहळ्यांचे निमित्त करून सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यांवर फटाक्यांच्या कर्णकर्कश आतषबाजीला कायमस्वरूपी बंदी आणण्याचा निर्णय समाजाच्या पचनी पडणे आता शक्य आहे.

कारण फटाक्यांची अतिरेकी आतषबाजी हा एकट्या ध्वनिप्रदूषणापुरता मर्यादित मुद्दा नाही, त्यामुळे निर्माण होणाऱ्या विषारी वायूमुळे वातावरण अशुद्ध होऊन त्याच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचे अनेक दाखले याआधी स्पष्ट झालेले आहेत. आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके वाजविणे ही परंपरेने स्वीकारलेली प्रथा असली, तरी काळाच्या ओघात, जेथे लोकसंख्येची घनता तीव्र झाल्यानंतर शुद्ध हवेच्या श्वासाचा पुरेसा वाटादेखील प्रत्येकाच्या वाटणीस अभावानेच येत असेल तेथे अशा विषारी, अपायकारक वायूमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणाम अटळ असतात यावरही आता सामाजिक सहमती होऊ लागली आहे. फटाके वाजवून आनंद व्यक्त करण्यास कोणाचा विरोध नाही, पण आनंदाच्या या उधाणास आवर घालून सार्वजनिक हितास बाधा येणार नाही याची काळजी घेण्याची काळाची गरज मात्र ओळखली पाहिजे, असा नव्या आदेशाचा संकेत नाकारता येणार नाही.

सण-उत्सवांच्या नावाखाली फटाक्यांची आतषबाजी करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याची परवानगी देता येणार नाही, अशी कठोर भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. या भूमिकेचे स्वागतच करावयास हवे. उत्सवकाळातील अशा आतषबाजीमुळे ध्वनि आणि वायूप्रदूषण होत असल्याने या काळात गर्दीने गजबजलेली शहरे राहण्यायोग्य आणि जगण्यायोग्य राहत नसल्याने सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे, त्यामुळे यंदाच्या दिवाळीतील सर्वसामान्य नागरिकांना शांततामय आणि सुरक्षित जगण्याच्या हक्काचा आगळा अनुभव मिळण्याची शक्यता वाढीस लागली आहे.

अर्थात, न्यायालयाने दिलेल्या आदेशाची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांना सामान्यांच्या या हक्काचे भान राखावे लागेल. यामुळे उत्सवांचा आनंद हिरावून घेतला जाणार नाही, तरीही सुरक्षित आणि शांततापूर्ण जगण्याच्या हक्कास बाधादेखील येणार नाही अशा समंजसपणाने या आदेशाची अंमलबजावणी केल्यास केवळ परंपरेच्या नावाखाली जपला गेलेला अनिष्ट पायंडा नष्ट करण्याच्या प्रक्रियेचे प्रारंभ तरी शक्य होईल. फटाके फोडण्याच्या किंवा आनंद व्यक्त करण्याच्या मानसिकतेस कोणाचाही विरोध असण्याची शक्यता नाहीच, पण आनंद व्यक्त करण्याच्या हट्टापायी अन्य कोणाच्या आयुष्यात दु:खाचे प्रसंग येणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज असतेच. हीच गरज ओळखून यंदा या आदेशाचे प्रामाणिक पालन करण्याचा प्रयत्न करावयास काय हरकत आहे? तसे केल्यानंतरही दिवाळी आनंदात साजरी झाली तर ती अधिक निरामय ठरेल.

Read About : India-China Relations : वाघ आणि ड्रॅगन
E-Paper : Punyanagari E-Paperसंपादकीय

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.